Monday, 7 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०७ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना आज राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शोक प्रस्तावाचं वाचन केलं. त्यानंतर लता दीदींच्या स्मृतींना अभिवादन म्हणून राज्यसभेचं कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं.

लोकसभेतही दुपारी चार वाजता सभापती ओम बिर्ला शोकसंदेश वाचून एक तासासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाची चर्चा १२ तासांहून जास्त वेळ सुरू होती. गेल्या आठवड्यात राज्यसभेचं शंभर टक्के कामकाज झालं असून, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहानं उपलब्ध वेळेचा पूर्ण उपयोग करून घेतला आहे.

****

कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमधली उपस्थिती आजपासून पूर्ण क्षमतेनं राहणार आहे. केंद्रीय आस्थापना राज्यमंत्री डॉ जितेंद्र प्रसाद यांनी काल ही माहिती दिली. कर्मचारी कोविड प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळतील, याची खबरदारी विभागप्रमुखांनी घेणं आवश्यक असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं काल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सूर्यनमस्कार अभियान राबवण्यात आलं. या अभियानाला शहरातल्या सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, आसन यासंबंधीचे धडे देऊन राष्ट्रगीताने या अभियानाचा समारोप झाला.

****

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं स्वर्गीय प्राचार्य बी.के. सबनीस राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत सांघिक पारितोषिक दिल्ली विद्यापीठाला मिळालं असून, वैयक्तिक गटात प्रथम पारितोषिक पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा पराग बद्रिके यानं पटकावलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...