Wednesday, 9 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याकडे देशाची वाटचाल सुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      महाराष्ट्र काँग्रेसनं देशभरात कोविड पसरवल्याच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात राज्यात आज काँग्रेस पक्षाची निदर्शनं

·      राज्यात २७ टक्क्यांपेक्षा जास्त इतर मागासवर्गीय असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालास्पष्ट

·      कोविड संसर्गाचे राज्यात सहा हजार १०७ नवे रुग्ण, मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर ४३७ बाधित

·      बीडमध्ये शंभर कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

·      औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव नांदेड जिल्ह्यातील नायगाव तसंच बीड जिल्ह्यातल्या तीन नगर पंचायतींच्या नगराध्यक्षाची बिनविरोध निवड

आणि

·      भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात आज अहमदाबादमध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

****

देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याकडे देशाची वाटचाल सुरू असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना, ते बोलत होते. देशानं कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपायांचं जगभरात कौतुक होतं असल्याचं सांगत पंतप्रधानांनी, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि वैज्ञानिकांच्या कष्टांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

आपण कोणत्या बाजुने आहोत याची पर्वा न करता आपल्याला लोकांसाठी काम करावं लागेल, विरोधी पक्षात राहणं म्हणजे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम थांबवणं, ही मानसिकता चुकीची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आपल्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाहीचा असून, एकाच कुटुंबाचं वर्चस्व असलेले राजकीय पक्ष देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असतात, यामुळे राजकीय प्रतिभेचं नुकसान होत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाला बाधा पोहोचवत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला.

****

पंतप्रधान उत्तर देत असताना, काँग्रेसह काही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद परिसरात याबाबत पत्रकारांशी बोलताना, सरकारच्या विविध योजना तसंच कामकाजावर सदस्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याऐवजी, पंतप्रधानांनी काँग्रेसवर आरोप करण्याला प्राधान्य दिलं, या शब्दांत त्यांनी टीका केली.

****

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरवल्याच्या पंतप्रधानांच्या कथित विधानाचा, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच अन्य नेत्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. तर या विधानाबद्दल मोदींनी माफी मागावी, या मागणीसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात निदर्शनं करणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.

****

राज्यसभेत काल अर्थसंकल्पावरच्या चर्चेला प्रारंभ झाला. काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांनी बेरोजगारीच्या मुद्याकडे लक्ष वेधत, दर वर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकार अयशस्वी झाल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, कोविडमुळे झालेले मृत्यू यासंदर्भात आकडेवारी देण्यातही सरकार अपयशी ठरल्याची टीका चिदंबरम यांनी केली.

भाजपचे अरुणसिंह यांनी, हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षांचं प्रतिबिंब असल्याचं म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक स्थैर्य प्रदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अंतरिम अहवालानुसार राज्यात २७ टक्क्यांपेक्षा जास्त इतर मागासवर्गीय-  ओबीसी असल्याचं स्पष्ट होतं आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांच्या आत ओबीसींना आरक्षण देणारा कायदाही मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यात काही अडचण नाही, असं मत बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात काल या मुद्द्यावर सुनावणी झाली नाही. पुढच्या सुनावणीची तारीख लवकरच कळेल, असंही ते म्हणाले. मागासवर्ग आयोगाला ८७ कोटी रुपयांचा निधी आणि आवश्यक मनुष्यबळ दिलं आहे. अहवालासाठी आवश्यक सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार आयोगानं अंतिम अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ एवढी झालेली असून, यापैकी दोन हजार १३ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे सहा हजार १०७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७ लाख १६ हजार २४३ झाली आहे. काल ५७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल १६ हजार ३५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७५ लाख ७३ हजार ६९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ८९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९६ हजार ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ४३७ कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १५८ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ५६, नांदेड ५४, बीड ५३, जालना ४०, परभणी ३४, हिंगोली २४, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १८ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे पावणे दोन वर्ष वाया गेले असून, हे नुकसान भरुन काढण्यासाठी राज्यातल्या सर्वच शिक्षकांनी शनिवार आणि रविवारी शाळा सुरु ठेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शाळा ऑफलाईन पद्धतीने भरवण्यावर त्यांनी भर दिला.

****

बीड इथं शंभर कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. जिल्हा विकासासाठी ३६० कोटी रुपये मागणीला मंजुरी, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ आणि २० कोटी भागभांडवलासाठी तरतूद, वसतीगृहासाठी निधीची तरतूद, नगर - बीड - परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या वाटेचा अर्धा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं, पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात वाळूच्या खड्डयात बुडून चार बालकांच्या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत. गेवराई तालुक्यातल्या शहजाणपूर चकला इथं ही घटना घडली होती. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातल्या वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करत, वाळू माफियांविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कायदे करुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनानं निधी दिला नसल्यानं, हे काम अपूर्ण असल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला होता. मात्र पालकमंत्री मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, रेल्वेमार्गासाठी राज्यशासनानं दिलेल्या निधीमुळेच या मार्गावर इंजिन धावल्याचं सांगितलं. काल बीड इथं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले....

आजपर्यंत राज्य सरकार आगाऊचा वाटा देत गेली. म्हणून या ठिकाणी आष्टीपर्यंत आज इंजिन हाय स्पीडने धावलं. वस्तूस्थिती ही आहे की राज्य सरकार निधी देतांना केंद्राच्या बरोबरीनं कुठेही कमी पडलेलं नाही. उलटं जास्त निधी देत आला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी, तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा काळे यांची काल बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी काल झालेल्या सभेत तडवी तसंच काळे यांच्याशिवाय इतर कोणाचेही अर्ज आले नाही.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या गीता जाधव यांची एकमतानं निवड करण्यात आली असून, त्यांनी काल अर्ज दाखल केला. जाधव यांचाच एकमेव अर्ज आल्यानं औपचारिक घोषणा बाकी आहे. १४ फेब्रुवारीला अध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या पाच नगर पंचायतींपैकी तीन नगर पंचायतीत नगराध्यक्षाची निवड ही बिनविरोध झाली. तर उर्वरित दोन नगर पंचायतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपापले उमेदवार उभे केले आहेत. आष्टी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाजपाच्या पल्लवी धोंडे यांची, पाटोदा इथं भाजपच्या खतिबाबी अमर शेख, तर केज इथं भाजप आघाडीच्या सीता बनसोड यांची बिनविरोध निवड झाली. वडवणी मध्ये भाजपाच्या मंगला राजाभाऊ मुंडे आणि राष्ट्रवादी कडून वंदना शेषराव जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर शिरूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी, भाजपच्या प्रतिभा रोहिदास गाडेकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शेख शाहिन यांनी अर्ज दाखल केला आहे. येत्या १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.

****

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रं, आजपासून दुपारी एक वाजल्यापासून संबधित कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही प्रवेशपत्रं डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरीत करता येणार असून, त्यासाठी महाविद्यालयांनी कोणतंही वेगळं शुल्क आकारू नये असं मंडळाने परिपत्रकात म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्व पक्षांच्या नेत्यांनीच यादृष्टीने प्रयत्न करावेत, असं ते म्हणाले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...