आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यातली कोविड रुग्ण संख्या कमी झाली असली तरी नियमांचं
पालन करणं गरजेचं असल्याचं मत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी
मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर आज ते बोलत होते.
जिल्ह्यात कोविड लसीकरण पहिला डोस ८३% नागरिकांनी तर दुसरा डोस ६१ पूर्णांक ८०% नागरिकांनी
घेतला आहे.
****
उस्मानाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनाच्या
माहितीच्या दालनाचं उद्घाटन करून या योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी
यासाठी निर्मित माहिती रथाला हिरवा झेंडा दाखवून रथ मार्गस्थ करण्यात आला. तसंच उस्मानाबाद
जिल्ह्याची नव्याने माहिती व्हावी यासाठीच्या पर्यटन पुस्तिकेचं प्रकाशनही आज जिल्हाधिकारी
दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद इथं
जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सभेसाठी राज
ठाकरे काल पुण्याहून औरंगाबाद इथं दाखल झाले.
****
राज्यात अक्षय तृतीया, तुळशी विवाहसारख्या मुहूर्तावर बालविवाह लावण्याच्या
पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात यंत्रणेकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे असं जिल्हाधिकारी
डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलं आहे. असे बालविवाह आढळून आल्यास त्या पालकांचं समुपदेशन
करून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगावेत अशा सूचना जिल्हाधिकारी इटनकर यांनी
आपल्या अधिनस्त यंत्रणेला दिल्या आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे
निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. धुमधडाका, पागलपन, अर्जुन देवा, कुंक़ू झाले
वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं.
अनेक मराठी मालिकांमधून ही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
****
No comments:
Post a Comment