Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशात
साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख
मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश
व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. साखर निदेशालय,
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग यांच्या सहमतीनं ही निर्यात केली जाणार आहे.
येत्या एक जून पासून ३१ ऑक्टोबर पर्यंत हा आदेश लागू असेल,असं या अधिसूचनेत म्हटलं
आहे. या निर्णायामुळे साखर हंगामाच्या अखेरपर्यंत ६० ते ६५ लाख टन साखरेचा साठा
शिल्लक राहील, हा साठा दोन ते तीन महिने घरगुती वापरासाठी उपयोगी होईल, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र
सरकारनं ३१ मार्च २०२४ पर्यंत आयात करण्यात येणाऱ्या कच्चे सोयाबीन आणि सुर्यफूल
तेलावर उत्पादन शुल्क, कृषी आणि विकास कर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक
वर्षी वीस लाख मेट्रीक टन कच्चे सोयाबीन आणि सुर्यफूल तेल देशात आयात करण्यात
येते. या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट होणार असून ग्राहकांना
महागाईत दिलासा मिळणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट
संदेशात म्हटलं आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल
१३ लाख २७ हजार ५४४ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी
६७ लाख ४४ हजार ७६९ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या दोन हजार १२४ कोविड रूग्णांची नोंद झाली, १७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ९७७ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार
९७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी या महिन्याच्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८९ वा भाग असेल. या
कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार उद्यापर्यंत माय जी ओ व्ही ओपन
फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात
आला आहे. तसंच १८०० ११ ७८०० या क्रमांकावर आपला मेसेज रेकॉर्ड करुनही नागरिकांना
विचार मांडता येतील.
****
शिवसेना
नेते यशवंत जाधव यांना सक्तवसुली संचालनालयानं फेमा कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी
समन्स बजावलं आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांची चौकशी केली, यासोबतच कंपनी
व्यवहार मंत्रालयानं त्यांच्या बेनामी कंपनीची चौकशी केली असता, काही मोठी रक्कम
त्यांच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. यासंदर्भात ईडी चौकशी
करणार आहे. आयकर विभागानेही याबाबत यशवंत जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं
आहे.
****
कुख्यात
गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी
अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात सक्तवसुली
संचालनालयानं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी
नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन यांना दोन वेळा तर मुलगा फराज मलिकला पाच वेळा
समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र त्यांच्यापैकी एकही जण चौकशीसाठी हजर राहिलं
नाही, असं ईडीनं या आरोपपत्रात नमूद केलं आहे.
****
शेतकरी
बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक
उत्पादनं तयार करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई इथं राज्यातल्या १२ भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा
शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण
करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण असून,
यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचं ते म्हणाले. सध्या मॅाल
संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्यांची कृषी उत्पादने टिकून
ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
****
राज्यातल्या
ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य महिला
आयोगाच्या वतीनं पुढील महिन्यापासून विशेष अभियान सुरू केलं जाणार आहे. बालविवाह
रोखण्यासाठी राज्य महिला आयोग आग्रही भूमिका घेत असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष
रुपाली चाकणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या २३ बँकांच्या माध्यमातून येत्या एक जून ला जिल्ह्यात ७५ ठिकाणी पीक
कर्ज वाटप शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जाईल. यात पीक
कर्जाचं ४०० कोटी तर बचतगटांसाठी १०० कोटी रुपयांचं कर्ज वाटप होईल अशा विश्वास
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment