Wednesday, 25 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.05.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत काल महाराष्ट्रानं उर्जा निर्मितीसाठी रि न्यू पॉवर कंपनीसोबत ५० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. गेल्या तीन दिवसांत या परिषदेत राज्यानं जवळपास ८० हजार कोटी रुपयांचे करार पूर्ण केले आहेत.

****

राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुढील महिन्यापासून विशेष अभियान सुरू केलं जाणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोग आग्रही भूमिका घेत असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.

****

विद्यापीठाच्या स्नातकांनी उन्नत भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत काल जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तीसावा दीक्षांत समारंभ झाला; त्यावेळी ते बोलत होते. २१४ स्नातकांना आचार्य पदवी, तर ९८ विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं.

****

नाशिक इथल्या सहकार क्षेत्रातले तज्ञ आणि नाशिक मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष भास्करराव कोठावदे यांचं काल अल्पशा आजरानं निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. गेल्या चाळीस वर्षांपासून सहकार क्षेत्राशी सबंधीत असलेले कोठवदे हे सुवर्णा नागरी सहकारी पतंसस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या आदिवासी बहुल भागात राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं विद्यार्थी - विद्यार्थींसाठी आठ दिवसीय विज्ञान, छंद आणि साहस शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीराचा समारोप काल झाला. यावेळी शिबीरार्थ्यांनी लेझीम, झांज, एरोबीक्स, देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केलं, सोबतच भारतातील अठरा भाषांमध्ये रचलेले "भारत की संतान" ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातल्या सोनारी गाव परीसरात काल सायंकाळी  वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या भुईमुग, सोयाबीन, ज्वारी, तीळ आदी पिकांचं नुकसान झालं आहे.

****

No comments: