Thursday, 4 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  – 04 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑगस्ट २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळं संसदेचं कामकाज विस्कळीत.

·      राज्यातल्या सत्ता संघर्षावर निकालापर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये - सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

·      संजय राऊत यांच्या कोठडीत आठ ऑगस्टपर्यंत वाढ.

आणि

·      औरंगाबाद जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर कराड, जलील यांची गडकरींशी चर्चा.

****

नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयानं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष सदस्यांनी आजही लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळं सदनाचं कामकाज प्रारंभी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत असल्याच्या कारणावरुन काँग्रेस पक्ष आणि द्रमुकचे सदस्य सदनाच्या हौद्यात येऊन परत घोषणाबाजी करु लागले. त्यावरुन लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही या मुद्द्यावर गदारोळ झाला. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकार, विरोधकांना दाबण्यासाठी जाणुनबुजून तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप केला. यावरुन गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. 

****

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवण्यासंदर्भात न्यायालय येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेईल, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. आजच्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी दहाव्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही, असं मत व्यक्त केलं.

****

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी चार दिवस, म्हणजेच आठ ऑगस्टपर्यंत आज वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार राऊत यांना गेल्या ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, तसंच अलीबागमधल्या जमीन व्यवहारांशी संबधीत आणखी काही कागदपत्रं तपासायची आहेत. त्यासाठी दहा ऑगस्ट पर्यंत कोठडी वाढवावी असं संचालनालयानं म्हटलं होतं.

****

येत्या शनिवार आणि रविवारी मराठवाडा आणि विदर्भात तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यभर बहुतांश भागात पाऊस पुन्हा जोरदार हजेरी लावेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेड शहरात आज पहाटे मोठा पाऊस झाला. काल मध्यरात्रीनंतर झालेल्या मोठ्या पावसानंतर औरंगाबाद परिसरात आजही पावसाच्या सरी कोसळल्या.

****

जालना जिल्ह्यातल्या २८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. यामध्ये जालना तालुक्यातल्या सहा, परतूर तालुक्यातल्या एका तसंच बदनापूरमधल्या १९ आणि मंठा तालुक्यातल्या २ ग्रामपंचातींचा समावेश आहे. मतमोजणी उद्या होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या रस्त्यांसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार इम्तियाज जलील यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन चर्चा केली. चिकलठाणा ते वाळूज या एकाच पूर्ण उड्डाणपुलाचं काम लवकर सुरू करावं अशी मागणी प्रामुख्यानं करण्यात आली. अहमदनगर नाका ते दौलताबाद रस्त्याचं रुंदीकरण आणि औरंगाबाद ते शिर्डी रस्ता पूर्ण करण्याची मागणीही डॉ. कराड आणि जलील यांनी केली. सर्व प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्याची माहिती जलील यांनी दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मीना शेळके आणि त्यांचे पती, तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू शेळके यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या शहर कार्यालयात ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी त्यांचं पक्ष प्रवेशावेळी स्वागत केलं. शेळके हे  कुंभेफळ गावचे सरपंच राहिले आहेत.

****

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५० शिक्षकांनी अकरा हजार ३८८ तिरंगा ध्वज खरेदी केले आहेत. त्यांनी त्यासाठी प्रत्येकी १५० रुपये या प्रमाणे जमा केलेले तीन लाख सात हजार ५०० रुपये उपयोगात आणले. या तिरंगा ध्वजाचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आलं. नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी यानिमित्त केलं. ते म्हणाले –

 

हर घर झेंडामध्ये आम्ही ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायतीला आमचे बचत गटामार्फत ते राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देत आहे. प्रत्येक गटविकास अधिकारी आणि बाकीच्या  ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थापन केलेलं आहे याच्याबद्दल. तुम्ही नजिकचे जे ग्रामपंचात ऑफिसर आहे त्यांना कॉन्टक्ट करा. जेंव्हा ते नसतील तेंव्हा मग तालुका ऑफिस किंवा जिल्हा परिषद ऑफिसला पण कॉन्टक्ट करु शकता. सर्व ग्रामपंचायतीला आणि सर्व तालुक्याच्या ऑफिसला शासनाने गाईडलाईन दिलेल्या आहेत की कसा फ्लॅग ठेवायचा आहे. त्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन करा कारण ते आमच्या मानाची गोष्ट आहे. आणि आमचे सौभाग्यची गोष्ट आहे की आमचे घरी आमचे ध्वज फडकावत आहे.

****

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथं कन्नड घाटात मोठा महादेव मंदिराजवळ काल मध्यरात्री मालवाहू ट्रकचा अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. लाकडानं भरलेला हा ट्रक आंध्र प्रदेशकडून चाळीसगावच्या दिशेनं येत होता. ब्रेक निकामी झाल्यानं ट्रक शंभर फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.

****

दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी आणि नांदेड ते तिरुपती दरम्यान दोन विशेष साप्ताहिक रेल्वे सोडणार आहे. नांदेड-हुबळी ही विशेष रेल्वे परवा शनिवारपासून प्रत्येक शनिवारी दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी नांदेडहून सुटणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी हुबळीहून दर रविवारी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार आहे. नांदेड-तिरुपती विशेष साप्ताहिक रेल्वे परवा सहा ऑगस्टपासून नांदेड इथून दुपारी बारा वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती इथून रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि नांदेड इथं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.

****

ग्रामीण भागात वीज पडून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी विजेची माहिती देणारं दामिनी ॲप मोबाईल मध्ये घ्यावं असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे. या माध्यमातून दरवर्षी वीज पडल्यामुळं होणारी मनुष्य, पशू आणि वित्तहानीचं प्रमाण कमी करता येईल, असं ते म्हणाले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...