Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
लोकसहभागातून स्वच्छता हा इंदूर शहराने राबवलेला प्रयोग देशभर
राबवला जावा; स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचा सल्ला.
·
एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या गटात पाचगणीचा पहिला
तर कराड शहराचा तिसरा क्रमांक.
·
फाईव्ह-G सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश-पंतप्रधान
नरेंद्र मोदी.
·
ई-श्रम योजनेला गती देण्याची केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री
भुपेंद्रसिंग यादव यांची सूचना.
आणि
·
आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर
४१ धावांनी विजय.
****
‘लोकसहभागातून
स्वच्छता’ हा इंदूर शहराने राबवलेला प्रयोग देशभर राबवला जावा, असं सल्ला राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी दिला आहे. आज नवी दिल्लीत २०२२ चे ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार’
राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय गृहनिर्माण
आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेत इंदूर शहरानं एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात सलग
सहाव्यांदा प्रथम पुरस्कार पटकावला. या बद्दल राष्ट्रपतींनी इंदूर शहरवासियांचं अभिनंदन
केलं. याच श्रेणीत नवी मुंबई शहरानं तिसरा क्रमांक पटकावला. एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या
शहरांमध्ये पाचगणीने पहिला क्रमांक तर कराड शहराने तिसऱ्या क्रमांक पटकावला. छोट्या
स्वच्छ राज्यांच्या गटात त्रिपुराने तर मोठ्या स्वच्छ राज्यांमध्ये मध्य प्रदेशानं
अव्वल क्रमांक पटकावला.
****
5G
सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 5G इंटरनेट सेवेचा प्रारंभ करताना बोलत होते.
5G तंत्रज्ञानामुळे देशाच्या गावागावात क्रांती होणार असून शैक्षणिक क्रांतीही होणार
आहे, त्यामुळे या दिवसाची इतिहासात नोंद होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून एक लाख ७५ हजारांहून अधिक
ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोचल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 5G सेवेसाठी
पहिल्या टप्प्यात तेरा शहरांचा समावेश असून मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात 5G सेवा
पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या
कार्यक्रमात व्हर्च्युअल क्लासरुमसाठी राज्यातून रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महापालिकेच्या
सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांशी
पंतप्रधानांनी संवाद साधून तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून दिलं.
पंतप्रधान - विद्यार्थी संवाद
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह
सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असून शाळेचे वर्ग हे स्मार्ट
क्लास होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
राष्ट्रीय
अन्न सुरक्षा कायदा आणि इतर योजनांसाठी धान्याची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय अन्न
महामंडळाकडे पुरेसा धान्यसाठा असल्याचं, संबंधित मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
महामंडळाकडे सध्या २३२ लाख मेट्रिक टन गहू आणि २०९ लाख मेट्रिक टन तांदुळाचा साठा आहे.
एक एप्रिल २०२३ रोजी, सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर, महामंडळाकडे सुमारे ११३ लाख मेट्रिक
टन गहू आणि २३६ लाख मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
नक्षलग्रस्त
भागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली इथं आज वार्ताहारांशी
बोलताना ही माहिती दिली. याबाबतचं परिपत्रक सोमवारी काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
राज्याचे गडचिरोली इथं नव्याने मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय आणि गोंडवाना विद्यापीठासाठी
जमीन अधिग्रहीत करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
****
ऊसतोड
मजूर आणि महिला यांचे प्रश्न समन्वयानं सोडवण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज
झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. ऊसतोड मजूर नोंदणी, त्यांच्या पाल्यांची शिक्षण,
भोजन आणि निवासाची सोय, महिलांचे प्रश्न, ऊसतोड मजुरांचा विमा यांचा डॉ.गोऱ्हे यांनी
यावेळी आढावा घेतला. अवैध गर्भपात आणि गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी जिल्हाधिकारी,
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आरोग्य विभागाची समिती स्थापन करण्याची सूचना गोऱ्हे यांनी
दिली.
****
असंघटीत
क्षेत्रातले मजूर तसंच कामगार वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा
सर्वांगिण विकास घडवण्यासाठी ई-श्रम योजनेला गती द्यावी अशी सूचना केंद्रीय कामगार
आणि रोजगार मंत्री भुपेंद्रसिंग यादव यांनी केली आहे. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात
आज झालेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय वित्त
राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात
राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.
****
राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण ही परिवर्तनाची चळवळ व्हावी, असं मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केलं आहे. उस्मानाबाद इथं आज ‘नवीन राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण-२०२० सक्षमपणे अंमलबजावणी’ या संदर्भात प्राचार्य, समन्वयकांची कार्यशाळा
घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन, स्वायत्त महाविद्यालयांना
प्राधान्य आणि ऑनलाईन शिक्षण ही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्रिसुत्री आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे चांगल्या महाविद्यालयांनी स्वायत्ता घ्यावी, असं आवाहनही
कुलगुरू येवले यांनी यावेळी केलं.
****
आशिया
चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेचा आज ४१ धावांनी पराभव केला.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी
करत २० षटकांत ६ बाद १५० धावा केल्या. श्रीलंकेचा संघ १८ षटकं २ चेंडूत १०९ धावांवर
सर्व बाद झाला. बांगलादेशात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश,
श्रीलंका, थायलंड, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती असे एकूण सात संघ सहभागी झाले आहेत.
****
अहमदाबाद
इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खो खो पुरुष संघानं दिल्ली
संघाचा एक डाव आणि १४ गुणांनी पराभव केला. महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघानं कांस्यपदक
पटकावलं. महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघानं दिल्ली संघाचा ३-१ असा सहज पराभव करुन उपांत्य
फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना उद्या तेलंगणाशी होणार
आहे. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या प्रतिक रानडे आणि अक्षया वारंग या जोडीने
दिल्लीच्या इशान दुग्गल आणि खुशी गुप्ता या जोडीचा २१-१८, १९-२१, २१-१७ असा पराभव केला.
****
शारदीय
नवरात्र महोत्सवात तुळजापूर इथं आज सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार
महापूजा मांडण्यात आली. उद्या भवानी तलवार अलंकार महापूजा होणार आहेत.
दरम्यान,
श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव, कोजागिरी पौर्णिमा या सणाच्या काळात तुळजापूर
इथं वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असेल
असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
****
औरंगाबाद
इथं वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं भानुदासराव चव्हाण सभागृहात वन्यजीव छायाचित्रांच्या
प्रदर्शनाला आज सुरुवात झाली. या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मधुकर वैद्य
यांच्या हस्ते झालं. वन विभाग आणि पर्यावरण विषयक संशोधन आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीनं
हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment