Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
दूरसंचाराच्या फाईव्ह-जी सेवेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण
·
स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ;शहर सौंदर्यीकरण
आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणा
·
भारतीय रिजर्व्ह बँकेकडून
रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ
·
बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक जाहीर
·
६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान
·
औरंगाबाद इथल्या ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक
·
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर
आणि
·
६३व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची काल तीन सुवर्ण पदकांची कमाई
****
दूरसंचाराच्या फाईव्ह-जी सेवेला
आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू होत असलेल्या सहाव्या भारतीय मोबाईल
काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फाईव्ह जी सेवांचं लोकार्पण होईल.
फाईव्ह जी तंत्रज्ञानामार्फत चांगलं कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह
संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. फाईव्ह जी तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम
सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल. येत्या दोन वर्षांत देशभरात पाईव्ह जी सेवा
पुरवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, यासाठी सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
केली जाईल, असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
****
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त
शहरे ही लोकचळवळ होण्याची गरज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ
महाराष्ट्र नागरी अभियानाचा काल मुंबईत शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या चळवळीत
लोकसहभाग महत्त्वाचा असून इच्छाशक्ती द्वारेच ही कामं साध्य होऊ शकतील, असं मुख्यमंत्री
म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, येणाऱ्या काळात स्वच्छ
आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. स्वच्छता मोहिमेत
खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत शहरे कचरामुक्त करून शहरांचा
पूर्णपणे कायापालट करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच
संधी दिली जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं.
या अभियानांतर्गत शहर सौंदर्यीकरण
आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली. दोन ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या
९० दिवसांच्या कालावधीत, शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात
आला आहे. या कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन शहरांना, अनुक्रमे
१५ कोटी, १० कोटी तसंच पाच कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या कचरामुक्ती अभियानांतर्गत
राज्यातली सर्व शहरं कचरामुक्त करणं अभिप्रेत आहे. त्यानुसार घरोघरी १०० टक्के विलगीकृत
कचरा संकलीत करणं, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करणं,
वैयक्तिक शौचालयांसह, आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची उभारणी, आदी उद्दीष्ट निर्धारित
करण्यात आली आहेत. येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचं अभियानही हाती घेण्यात
आलं आहे.
या अभियानाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी
राज्य शासनाने १२ हजार ४०९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून, या अभियानातंर्गत
शौचाययं उभारणी, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, मल जल नि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प,
घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेनं रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली आहे, रेपो दर आता पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे.
बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर
शक्तिकांत दास यांनी काल पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या
पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्नातली वाढ १३
पूर्णांक पाच टक्के राहिली आहे. ही जागतिक
अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. या वर्षाच्या
दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास
यांनी यावेळी व्यक्त केला.
****
पेट्रोलियम, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स
गुंतवणूक क्षेत्रासाठी नव्यानं मार्गदर्शक सूचना आखण्याचा सरकारचा विचार असल्याचं,
केंद्रीय रसायने, खते तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी सांगितलं
आहे. काल मुंबईत इंडिया केम २०२२ संदर्भात उद्योग मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते
बोलत होते. रसायनं आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्र सातत्यानं प्रगती करत असून, भारताला
पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात या क्षेत्राचं
मोठं योगदान असेल, असं खुबा म्हणाले.
****
पर्यायी इंधनाच्या मदतीने वाहन
उद्योग क्षेत्राचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक
आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते काल पुण्यात चाकण इथं देशात
तयार झालेल्या पहिल्या मर्सिडीज-बेंझ लक्झरी इलेक्ट्रिक कारचं उद्घाटन करताना बोलत
होते. किफायतशीर, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी पर्याय उपलब्ध करणं हे सरकारच महत्त्वाचं
धोरण असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
निवृत्त
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून काल पदभार
स्वीकारला. सरसेनाध्यक्ष चौहान यांनी काल नवी दिल्लीतल्या
राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
काँग्रेसच्या
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, शशी थरुर
आणि के एन त्रिपाठी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्जांची छाननी आज केली जाईल. गरज पडली तर, १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, असं काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री
यांनी सांगितलं.
****
मुंबई शहर आणि परिसरातल्या प्राण्यांसाठी
सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णवाहिका काल दाखल झाल्या. केंद्रीय पशुपालन मंत्री पुरषोत्तम
रुपाला आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं. त्यानंतर
बोलताना राज्यपालांनी, स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य
दृष्टीने शक्तिशाली होताना प्राणिमात्रांच्या कल्याणाचा देखील विचार केला पाहिजे असं
मत व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च
२०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज
करण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या
संकेतस्थळावर भरता येतील. इयत्ता १२ वी परीक्षेचे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार
असल्याने विद्यार्थ्यांनी आपले अर्ज
उच्च माध्यमिक शाळा - कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावेत असं मंडळातर्फे सांगण्यात आलं
आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत,
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय
योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सूराराई पोट्ट्रू या तामिळ चित्रपटाला,
सुधा कोंगारा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून, तर अपर्णा बालामुर्ली यांना सर्वोत्कृष्ट
अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला. मनोरंजनात्मक चित्रपट म्हणून हिन्दी चित्रपट
“तानाजी - द अनसंग वॉरीअर” या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. या
दोन्ही चित्रपटांसाठी अनुक्रमे सूर्या आणि अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून
सन्मानित करण्यात आलं. गोष्ट एका पैठणीची चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ तर सर्वोत्कृष्ट
बालचित्रपट म्हणून ‘सुमी’ चित्रपटाला पारितोषिक
प्रदान करण्यात आला. टक-टक या चित्रपटासाठी अनिश गोसावी, सुमी या चित्रपटातले बालकलाकार आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर यांना
मराठी चित्रपटातले सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘मी वसंतराव’ चित्रपटातल्या गायनासाठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट
पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं.
****
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्लीत शहरी स्वच्छता महोत्सवात स्वच्छ राज्यं आणि शहरांचा
सन्मान करण्यात येणार आहे. विविध श्रेणींमधील १६० हून अधिक पुरस्कार यावेळी प्रदान
केले जाणार आहेत.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे ४५९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २१ हजार
४१३ झाली आहे. काल या संसर्गानं पाच
रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, एक लाख ४८ हजार ३४३ इतकी झाली
असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ५३८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६९ हजार
८७८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
तीन हजार १९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यातील
सर्व आदिवासी, शेतकरी, शेतमजूर यांचे आदिवासी विकास विभागामार्फत
विमा काढून त्यांना सुरक्षित केलं जाईल, असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितलं आहे. नाशिक
इथं काल महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या
४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आदिवासी विकास
महामंडळाकडील कर्जमाफी करण्यासाठीही मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात
येईल, असं अश्वासन गावित यांनी दिलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
विविध अभियानांचं आयोजन करण्यात येत आहे. उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
जयंतीनिमित्तानं वर्धा इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, हॅलो ऐवजी
वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ, तसंच ७५नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ केला जाणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या अत्याधुनिक औद्योगिक
वसाहत ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली असून, आठ हजार
जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ऑरिकचे मुख्य व्यवस्थापक सुरेश काकानी यांनी काल पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. ऑरिक सिटीत आयटी आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी
नोव्हेंबर महिन्यात उद्योजकांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
ऑरिक सिटीत आतापर्यंत १७४ भूखंडांचं वितरण झालं असून ५० उद्योगांचं काम प्रगतीपथावर
असून लवकरचं हे उद्योग सुरु होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार
राजकीय तसंच अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर
झाला आहे. अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट ही माहिती दिली.
मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या
१३ नोव्हेंबरला औरंगाबाद इथं हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
गुजरातमध्ये सुरु असलेल्या ६३व्या
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं काल तीन सुवर्ण पदकांची कमाई केली. नेमबाजीत महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटीलनं काल पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल
गटामध्ये अंतिम फेरीत १७ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावलं.
स्पीड स्केटिंग प्रकारामध्ये सिद्धांत कांबळे यानं सुवर्ण पदक
जिंकलं. त्याने १० किलोमीटरची शर्यत १६
मिनिटांत पूर्ण केली. स्केटिंगमध्येच दुहेरी प्रकारात अरहन जोशी
आणि जिनेशने सुवर्णपदक पटकावलं. याच गटामध्ये दर्श शिंदे आणि
आरेशनं रौप्य पदक जिंकलं.
ॲथलेटिक्समध्ये धावण्याच्या शर्यतीत
प्रणव गुरव, जय शहा आणि
किरण भोसले हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. टेनिसमध्ये पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश
केला आहे. महिला कबड्डी संघ देखील अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्हयात कुठेही लहान
मुले पळवून नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही, असं जिल्हा पोलिस अधिक्षक मनीष
कलवानिया यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वास्तविक
अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुद्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडलेला नाही.
चौकशीअंती या फक्त अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं कलवानिया यांनी सांगितलं. सामाजिक
माध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं
आहे.
****
महाराष्ट्र
शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, जी. के. बिराजदार यांनं काल लातूर इथं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. बिराजदार यांनी माजी
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळात
शिक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनाचं नेतृत्व
केलं होतं. तब्बल ५४ दिवस हे आंदोलन सुरु होतं. बिराजदार यांच्या पार्थिव देहावर काल किल्लारी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर
परिसरात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला काल २९ वर्ष झाली. या भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या
नागरिकांना किल्लारी इथं स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या ४५ गावामंधले १८३ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. काल जिल्हाभरात १७ हजार ४०५ पशुधनांचं लसीकरण करण्यात आलं. लम्पी प्रतिबंधक
लसीकरणासाठी आवश्यकता भासल्यास, ग्रामपंचायतींचाही सहभाग करून घेण्याचे संकेत जिल्हाधिकारी
अभिजित राऊत यांनी दिली आहे. काल नांदेडच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर
राऊत यांनी लम्पी संदर्भात आढावा बैठक घेतली. इतर राज्यांच्या अनुभव लक्षात घेता यासाठी
सर्व पातळीवर तयारी असणं अत्यंत आवश्यक असल्याचं, राऊत यांनी नमूद केलं.
या बैठकीच्या प्रारंभी प्रभारी
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्हाधिकारी राऊत यांचं स्वागत केलं. राऊत हे
२०२० पासून जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना २१२१-२२च्या राजीव गांधी
प्रशासकीय गतिमानता पुरस्कार तसंच भारत सरकारचा बेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कारानंही
सन्मानित करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment