Sunday, 22 January 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २२ जानेवारी २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

****

·      बीबीसीचा यु ट्यूबवरचा ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’ तसंच त्याच्याशी संबंधित विविध माहितीपट हटवण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्देश

·      समाज माध्यमांवरील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती आणि आभासी माध्यमातून प्रभाव टाकणाऱ्यांसाठी जाहिरात विषयक मार्गदर्शक तत्वं जारी

·      नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आधारित कृषी संशोधनाला चालना मिळाली तर राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास 

·      साखर कारखान्यांनी आता हायड्रोजन निर्मितीकडं लक्ष देण्याचं खासदार शरद पवार यांचं आवाहन

·      शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भाजपमध्ये येऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

·      राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्लूटूथचा वापर करणाऱ्या औरंगाबादच्या परिक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल

·      बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेत १२ शेतकऱ्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये परस्पर गायब केल्याप्रकरणी  शाखाधिकाऱ्यासह तिघे जणनिलंबित

   आणि

·      न्युझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा आठ गडी राखून विजय, मालिकेत विजयी आघाडी

****


आता सविस्तर बातम्या

ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशन- बीबीसीचा यु ट्यूबवरचा ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’ तसंच त्याच्याशी संबंधित विविध माहितीपट हटवण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केले आहेत.  या माहिती पटाचेट्विटरवरचे ५० पेक्षा अधिक संदेशही हटवण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. या यु ट्यूब आणि ट्विटरनं निर्देशांचं पालन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’ या नावानं बीबीसी माहितीपटाचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहितीपटाचं परीक्षण केलं. या माहितीपटात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारावर आणि विश्वासार्हतेवर आक्षेप घेण्याचा, विविध समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचं आढळलं आलं आहे.

बीबीसीनं तयार केलेला हा माहितीपट म्हणजे वस्तुनिष्ठता नसलेला आणि वसाहतवादी मानसिकता असलेला प्रचाराचा भाग" असल्याचं यापूर्वीचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं होतं.

****

समाज माध्यमांवरील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती आणि आभासी माध्यमातून प्रभाव टाकणाऱ्यांसाठी केन्द्र सरकारनं जाहिरात विषयक मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी शुक्रवारी ही मार्गदर्शक तत्व जारी केली.     

एखाद्या उत्पादन किंवा सेवेचं समर्थन करताना या व्यक्तींनी आपल्या प्रेक्षकांची दिशाभूल करू नये. तसंच ग्राहक संरक्षण कायदा, संबंधित नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वांचं ते पालन करतात की नाही यावर देखरेख ठेवणं हा यामागचा उद्देश आहे.

स्वतः योग्य परीक्षण केलेलं नाही किंवा वैयक्तिकरित्या वापरलेलं अथवा अनुभवलेलं नाही अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचं समर्थन करू नये, असे निर्देश या मार्गदर्शक तत्वात म्हटलं आहे. ही मार्गदर्शक तत्त्वं सेलिब्रिटी आणि पुरस्कर्त्यांना देखील लागू आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचं राज्यातील प्रत्येक शाळेत थेट प्रसारण कराण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त रहावं म्हणून पंतप्रधान मोदी विद्यार्थी आणि पालकांबरोबर चर्चा करणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’च्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ जानेवारी रोजी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात यावं. या स्पर्धेचंही नियोजन शिक्षण विभागानं करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, असं केसरकर यांनी सूचित केलं आहे.

****

 

जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कृषि संशोधनाला चालना मिळाली तर राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल असा विश्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. काल पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीनं देण्यात येणाऱ्या पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. इथेनॉलला शासनाचं प्रोत्साहन असून १०६ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातलं सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगत आतापर्यंत १८ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले असल्याचं त्यांनी नमूद केलं. यामुळे अडीच लाख हेक्टर्सपेक्षा जास्त जमीन ओलीताखाली येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –

राज्यातल्या जास्तीत जास्त जमिनी सिंचनाखाली कशा येतील, यासाठी आम्ही सुरवातीपासून काम करतोय. आणि त्यासाठी जवळपास १८ सिंचन प्रकल्प जे आहेत ते आम्ही मार्गी लावलेत. त्यामुळे या राज्यातल्या अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्तीची जमीन ओलीताखाली येईल. आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होईल.

उसाबरोबर कापूस, सोयाबीन, फळबागांचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं. उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढावा यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –

उसाबरोबर खरीपातील कापूस, सोयाबीनचाही फेरा वाढवावा आणि शिवाय फळबाग क्षेत्रदेखील वाढलं पाहिजे यासाठी देखील आपण प्रयत्न करू या. आणि त्याचबरोबर ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढावा यासाठी राज्य सरकारदेखील प्रयत्नशील आहे.

यावेळी बोलतांना शरद पवार यांनी केंद्र सरकारनं राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केलं असून हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आता हायड्रोजन निर्मितीकडं लक्ष द्यावं असं आवाहन केलं. हायड्रोजन हे भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार असून हायड्रोजनवर चालणारे वाहनं डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देत असल्याचं त्यांनी सांगितलं. साखर कारखान्यात बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो असं ते म्हणाले.

या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले काही आमदार भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते भाजपमध्ये येऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल जालना इथं बोलत होते. राज्यातलं सरकार भक्कम असून बहुमत सिध्द करण्याची वेळ आली तर, सरकारला १८४ आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. विकास हा शब्द उद्धव ठाकरे यांच्या रक्तातच नाही. त्यांना गरिबांच्या योजनांचीही माहिती नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

****

पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका महविकास आघाडीनं घेतली असल्याचं विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. वसंतदादा साखर संस्थेत वार्षिक सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पोटनिवडणुकांसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे पण सध्या तरी या दोन्ही मतदार संघात निवडणूक लढवण्याची महाविकास आघाडीची भूमिका असून अंतिम निर्णय पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल असं ते म्हणाले. सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२मध्ये औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या परीक्षेदरम्यान सचिन बागलाने नावाचा उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचं उघडकील आलं असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटद्वारे ही माहिती दिली. काल राज्यातील सहा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेत १२ शेतकऱ्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये परस्पर गायब केल्याप्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह तिघा जणांना निलंबित करण्यात आलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेतर्गंत नियमित कर्जफेड करणाऱ्या १२ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये जमा झाले होते, यासंदर्भातील संदेश संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळाला. मात्र त्यानंतर त्यांच्या खात्यावरुन प्रत्येकी २५ हजार रुपये कोणीतरी काढून घेतले. शाखाधिकाऱ्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार नोंदवली. चौकशीअंती बँकेचे शाखा अधिकारी, लेखपाल आणि तपासणीस अशा तिघाना निलंबित करण्यात आलं.

****

जालना इथल्या सरस्वती भुवन महाविद्यालयात 'परीक्षा पे चर्चा' अभियानांतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचा परीक्षांचा तणाव दूर व्हावा याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं हे अभियान यशस्वी ठरत असून यामुळं विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित होत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी आमदार संतोष दानवे, नारायण कुचे यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पिक विमा द्यावा या मागणीसाठी काल गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. याच मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोरेगाव इथं आमरण उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आज गोरेगावसह हिंगोली आणि सेनगाव इथली बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी उद्यापासून आयोजित गावनिहाय आणि शहरी भागात वॉर्ड निहाय शिबिरात आपलं आयुष्मान कार्ड ई- केवायसी करुन घ्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. यासाढी लाभार्थ्यांनी आपली मूळ शिधा पत्रिका किंवा प्रधानमंत्री यांचे पत्र आणि आधार कार्ड सोबत घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्ह्यात जवळपास ५ लाख २० हजार ६९६ आयुष्मान भारत योजनेचे पात्र लाभार्थी आहेत, त्यापैकी आतापर्यंत एक लाख ५० हजार ५८४ लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड तयार करून घेतलं आहे.

****

मराठवाडा आणि आसपासच्या परिसरातून हज तसंच उमराह यात्रेकरता औरंगाबादहून सौदी अरेबियाला जाण्यासाठी आठवड्यातून एकदा थेट विमान सेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. आमंत्रित केलेल्या बैठकीत खासदार जलील यांनी काल हज आणि उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधासाठी चालवण्यात येणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स धारकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलं. औरंगाबाद शहरात बांधण्यात आलेलं हज हाऊस उमराह तसंच हज यात्रेकरुसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणीही केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

रायपूर इथं काल न्युझीलंडविरूध्द झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं आठ गडी राखून विजय मिळवला. यासोबतच तीन एकदिवसीय क्रिकेट सामान्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्युझीलंडनं प्रथम फलंदाजी करत चौतीस षटकं आणि तीन चेंडुत सर्वबाद १०८ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद शमीनं तीन, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल भारतीय संघानं हे माफक आव्हान २० षटकं आणि एका चेंडुत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना परवा मंगळवारी इंदूर इथं होणार आहे.

****

१९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव अठरा षटकं पाच चेंडूत ८७ धावात आटोपला. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलिया संघानं चौदा षटकात तीन बाद ८८ धावा करत विजय मिळवला.

****

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त एडीएमआय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी संचालक डॉ. सतीश रत्नपारखी यांचं ‘मराठवाड्याचा विकास : वैधानिक विकास मंडळ उपयुक्तता, घटनेतील तरतूद आणि भवितव्य’ या विषयावर आज सकाळी ११ वाजता व्याख्यान होणार आहे. औरंगाबाद शहरातील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात व्याख्यान होईल.

****

औरंगाबाद शहरातील अग्रसेन भवनमध्ये भारतीय योग संस्थानतर्फे आजपासून दोन दिवसीय प्रांतीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडेपाच वाजता हे शिबिर सुरु झालं असून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. संस्थानचे प्रमुख देसराज गुप्ता  हे साधकांना मार्गदर्शन करणार आहेत.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांना या वर्षीचा दिवंगत सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्काराचा आज वित्रन करण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...