Sunday, 22 January 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.

****

भारतामध्ये अल्पसंख्यांकांसह प्रत्येक समुदाय सकारात्मकतेच्या भावनेनं पुढं जात असल्याचं कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. देशाच्या बाहेर आणि देशामध्ये चालविण्यात आलेल्या कोणत्याही मोहिमेद्वारे देशाची प्रतिमा मलिन केली जाऊ शकणार नाही, असं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बीबीसीच्या वृत्तचित्राचं उदाहरण देत नमुद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज एक अब्ज ४० कोटी देशवासियांचा आवाज असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून आपल्या संदेशाद्वारे नमुद केलं आहे. देशात आजही काही लोक वसाहतवादी मानसिकेततून बाहेर येऊ शकलेले नाहीत आणि ते बीबीसीला सर्वोच्च न्यायालयापेक्षाही वरचं मानतात, असंही रिजेजू यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्या दिवशीही नवी दिल्ली इथं सुरू अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. देशातले उच्च पदस्थ पोलीस अधिकारी सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर या परिषदेत थेट पंतप्रधानांशी संवाद साधत आहेत. पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यांचं भविष्य, सायबर गुन्हे, पोलीस यंत्रणेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, दहशतवादविरोधी आव्हानं, क्षमता वाढवणं आणि तुरुंगातल्या सुधारणांवर या परिषदेत चर्चा केली जात आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या देशातल्या अकरा बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार आहेत. पुरस्कार विजेत्यांमध्ये सहा मुलं आणि पाच मुली आहेत. पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कला आणि संस्कृती विभागात चार, समाजसेवा आणि शौर्य प्रकारात प्रत्येकी एक, नवोपक्रम दोन आणि क्रीडा प्रकारात तीन मुलांना पारितोषिक देण्यात येणार आहे.

****

भारतीय सैन्यात सशस्त्र दलामधला स्त्रियांचा सहभाग वाढत आहे. यानिमित्त यावर्षी होणाऱ्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमात भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या संचलन तुकडीचं नेतृत्व महिला अधिकारी करणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या संचलन तुकडीचं नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी आणि भारतीय वायुसेना तसंच भारतीय नौदलाच्या १४४ तरुण खलाशांच्या संचलन तुकडीचं नेतृत्व महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत करणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं आज पहाटे चंद्रपुर इथं त्यांच्या राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेप्रमाणं त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार न करता, त्यांचा पार्थिव देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार असल्याची माहिती टेंभुर्डे कुटुंबीयांनी दिली आहे.

****

सरकारनं भारतीय कुस्ती महासंघाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख समिती नियुक्त होईपर्यंत महासंघाच्या सर्व कार्यांना स्थगित केलं आहे. यात क्रमवारी स्पर्थांना स्थगिती तसंच सहभागींकडून घेतलेल्या प्रवेश शुल्काच्या परताव्याचा समावेश आहे. सरकारनं महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांना या पुर्वीच निलंबित केलं आहे. देखरेख समिती महासंघाच्या कार्यकारी समितीवरच्या आरोपांची चौकशी करणार असून चोख व्यवस्थापन सुनिश्चित करणार आहे. 

****

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये आज महिला दुहेरीमधील सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात आलं. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना यांच्या जोडीला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत एन. श्रीराम बालाजी आणि जीवन नेदुंचेझियान या जोडीला जेरेमी चार्डी आणि फॅब्रिस मार्टिन या फ्रेंच जोडीकडून दुसऱ्या फेरीत ६-४, ६-४ असा पराभव पत्करावा लागला.

****

ओडिशा इथं सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भुवनेश्वरच्या कलिंग क्रीडासंकुलामध्ये संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. भारत स्पर्धेच्या `ड` गटामध्ये द्वितीय स्थानावर आहे तर न्यूझीलंड `क` गटामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीसाठीच्या अन्य सामन्यात आज दुपारी साडे चार वाजता मलेशियाची लढत स्पेनविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जीयम, नेदरलँड आणि इंग्लंड संघ या पुर्वीच स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...