Monday, 2 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 02.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जानेवारी २०२३   सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय योग्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.

·      भारतीय अर्थव्यवस्थेची मंदीच्या काळातही जागतिक पाचव्या क्रमांकावर झेप-भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा.

·      विविध मागण्यांसाठी मार्ड संघटना संपावर; कामावर रुजू होण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं आवाहन.

आणि

·      मराठवाड्यात आयटी पार्क वाढवण्याबाबत सरकारने विचार करावा-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी.

****

केंद्र सरकारने घेतलेला विमुद्रीकरण अर्थात नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात दाखल विविध ५८ याचिकांच्या सुनावणीनंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती बी आर गवई, ए एस बोपण्णा, व्ही राम सुब्रमण्यम यांनी विमुद्रीकरणाचा निर्णय वैध ठरवला, तर न्यायमूर्ती नागरथना यांनी मात्र असहमतीचा निकाल दिला. बहुमताचा निकाल वाचताना न्यायमूर्ती गवई यांनी, काळाबाजार नष्ट करणं आणि दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखणं, यामुळे हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं.

विमुद्रीकरणाच्या अधिसूचनेत कोणतीही त्रुटी आढळून आली नसून, रद्द नोटा भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआय चलनात आणू शकत नाही, असं मतही न्यायालयानं व्यक्त केलं आहे. नोटाबंदीचा निर्णय घेताना अवलंबलेल्या प्रक्रियेत कोणतीही कमतरता नव्हती, त्यामुळे ती अधिसूचना रद्द करण्याची गरज नसल्याचं न्यायालयानं निकाल जाहीर करताना म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाने न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत, नोटबंदीला विरोध करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना, काळ्या पैशाला प्रतिबंध करणारा विमुद्रीकरणाचा निर्णय दहशतवादी कारवायांवरही मोठा प्रहार असल्याचं नमूद केलं. विरोधी पक्षांनी मात्र अर्थव्यवस्थेचं नुकसान करणाऱ्या वर्गाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.

दुसरीकडे काँग्रेस पक्षानं न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना, नोटबंदीची किती उद्दीष्टं साध्य झाली, याबाबत या निर्णयात काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी याबाबत बोलताना, नोटबंदी निर्णयामुळे रोखरहित अर्थव्यवस्था, बनावट नोटांना प्रतिबंध किंवा दहशतवादाच्या उच्चाटनासारखी उद्दीष्टं साध्य होऊ शकली नसल्याचं म्हटलं आहे.

****

भारतीय अर्थव्यवस्थेने मंदीच्या काळातही ब्रिटनला मागे टाकून जागतिक पाचव्या क्रमांकावर झेप घेतल्याचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर इथं बोलत होते. राज्यात १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने प्रचार मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर इथं या मोहिमेचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर तीन लाख कोटींहून अधिक रुपयांची परदेशी थेट गुंतवणूक झाल्याचं नड्डा यांनी आज सांगितलं. चंद्रपूर या आदिवासी भागाचा आमुलाग्र विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. चंद्रपुरात १ लाख चाळीस हजार घरांत नळ जोडणी योजना सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आज औरंगाबाद इथंही नड्डा यांची सभा होत आहे.

****

शतकोत्तर आठवी भारतीय विज्ञान परिषद उद्यापासून नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडे दहा वाजता दूरदृश्य संवाद पद्धतीनं या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही या वर्षीच्या भारतीय विज्ञान परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात शिक्षण आणि संशोधनाच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीनं या परिषदेत विचारमंथन केलं जाणार आहे. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचं योगदान दर्शवणारा एक कार्यक्रमही होणार आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ साली झालेल्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या परळी-गंगाखेड रस्त्यावरच्या धर्मापुरी फाटा इथं राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी आता राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने समन्स बजावलं असून, येत्या १२ जानेवारीला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या पूर्वीही ठाकरे यांना न्यायालयाने दोन वेळा समन्स बजावलं होतं.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभरातून निषेध करण्यात आला. सिंधुदूर्ग, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, बारामती आदी ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

****

आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने आज पासून संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत सकाळपासून डॉक्टरांचं आदोलन सुरु आहे.

कोल्हापूर इथंही शासकीय रुग्णालयात आज निदर्शनं करण्यात आली. मोडकळीस आलेली वसतीगृह दुरुस्ती करावेत, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची पदं तातडीने भरावीत, महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी संप करण्यात आल्याचं संघटनेकडून कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, संघटनेच्या विविध मागण्यांवर विचार सुरू असून, अनेक मागण्या तत्काळ मंजूर करत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. संघटनेनं संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

मराठवाड्यात माहिती तंत्रज्ञान -आयटी पार्क वाढवण्याबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्रात विदर्भ आणि मराठवाडा अतिशय मागे असल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं. मराठवाडयातील प्रश्नांवर विधान परिषदेत आक्रमकपणे भूमिका मांडून मराठवाड्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही दानवे यांनी केला.

****

सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्तानं मुंबईत एका कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते. गेल्या दहा- वीस वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली असल्याचंही कोश्यारी म्हणाले. राज्याचं पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानलं जातं, पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य तसेच देश अधिक सुरक्षित करावा, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. दिनांक २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता, त्यामुळे २ जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो, असं सेठ यांनी सांगितलं. 

****

राज्यात विविध जिल्ह्यात आज पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे.

परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया होत आहे. या जागांसाठी चार हजार ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या सोयीसाठी विविध ठिकाणाहून पोलिस मुख्यालयापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

धुळे जिल्हा पोलिस दलात ४२ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. पोलिस मुख्यालय मैदानावर आज सकाळपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. गोंदिया इथं पोलिस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची भरती आजपासून सुरु झाली असून, ही प्रक्रिया पाच दिवस चालणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस भरतीला आज पहाटेपासून सुरुवात झाली. ३०२ जागांसाठी २६ हजार ३८५ अर्ज प्राप्त झाले आहेत.

****

‘हर घर नर्सरी’ उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. मराठवाड्यावर हरित आच्छादन वाढवण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. येत्या पावसाळ्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वृक्षलागवड करावयाची असल्याचं गोयल यांनी सांगितलं.

****

बीड तालुक्यात झालेल्या १३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी झालेल्या दैनंदिन खर्चाचे हिशोब उमेदवारांनी बीड तहसील कार्यालयातल्या खर्च पथकाकडे सादर करावेत, अशा सूचना बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्‌वारे केल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 6 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...