Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
डिजिटल आर्थिक देवाण घेवाणीमुळं अनेकांचं जीवन सुलभ
आणि आरामदायी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
·
जुन्या सेवानिवृत्ती वेतन योजनेचा अभ्यास सुरू-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
·
आघाडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं
स्वागत - प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
आणि
·
हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर
****
डिजिटल आर्थिक देवाण घेवाणीमुळं अनेकांचं जीवन सुलभ आणि
आरामदायी झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज एका नागरिकाला
सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे उत्तर देताना ही माहिती दिली. याविषयीची अनेक उदाहरणं
आपल्याला आढळतील, असं ते म्हणाले. देशातल्या डिजिटल आर्थिक देवाण घेवाण अंगिकाराबाबत
अन्य एका प्रवासी भारतीयाला उत्तर देताना देताना ते म्हणाले की, देशामध्ये आता हे नेहमीचं
दृश्य बनलं आहे. आपल्या जनतेनं तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा अंगिकार करण्यामध्ये
उल्लेखनीय कुशलता दाखवली आहे.
****
शिक्षकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत शिक्षण विभागाक़डून
अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये
आज ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची
शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी सभा झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह
शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के
आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दावोस इथल्या
परिषदेतल्या गुंतवणुकीसंदर्भात आरोप केले जात आहेत. मात्र, अनेक परदेशी कंपन्या थेट
गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित उपक्रमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात, असं ते म्हणाले.
दावोसमध्ये अनेक उद्योगपती देशातले असले, तरी गुंतवणूक ही परदेशीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी
नमुद केलं. यापूर्वीच्या सरकारनं केलेल्या सामंजस्य कराराचं काय झालं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कितीही आरोप केले
तरी कामानं उत्तर देणारं हे युतीचं सरकार असून आरोपांचा आपण नक्कीच हिशोब देऊ, असं
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
****
वंचित बहुजन आघाडी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत
आघाडीकरताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वागतच करेल, अशी माहिती या
पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते आज अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत
होते. ते म्हणाले...
त्यांना असं वाटतय की, आपण राष्ट्रवादीला ही बरोबर घेतलं
पाहिजे. आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे.
आम्ही त्यांना असं म्हटलय की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत
करु. राष्ट्रवादीलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. ज्या दिवशी त्यांचा निकाल
होईल, बोलणीच्या संदर्भातला सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करु आणि मग
पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतो.
****
केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार
विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला उद्या मुंबईत प्रारंभ
होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. देशभरातून २० राज्यं
आणि केंद्रशासित प्रदेशातले पाचशेहून अधिक प्रतिनिधी यामध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीनं
उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल
सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत
चर्चा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस हे मंगळवारी या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं घेण्यात आलेल्या
आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय
पारितोषिक मिळालं आहे. या कामगिरीबद्दल राज्याचे सांस्कृतिक
कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं
अभिनंदन केलं आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असलेल्या या
स्पर्धेत, महाराष्ट्रानं धनगरी नृत्य या लोककला प्रकारात अप्रतिम
सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतला. प्रथम
क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंड या राज्याला
मिळाला आहे.
****
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा
असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज पुण्यात 'भारतात
उच्च शिक्षणातली धोरण निश्चिती आणि परिवर्तन' या विषयावर आयोजित कार्यशाळेचं उदघाटन
केलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. उच्च शिक्षण
क्षेत्रातले तज्ज्ञ एकत्र आल्यानं नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम
शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल, असं ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात
परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातल्या विद्यापीठांना होईल. आपल्या
देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचं ज्ञान आहे, असं
त्यांनी सांगितलं. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेनं शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी
पुढं यावं, असं आवाहन कोश्यारी यांनी यावेळी केलं.
****
ठाण्याच्या गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा
पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा
अत्रे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र,
शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशाच्या सीमा ओलांडून
भारतीय शास्त्रीय संगीत पोहचवण्याचं काम प्रभा अत्रे यांनी केलं असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले. राज्यातलं सरकार सर्व घटकांचं असून आपलं सरकार कला प्रेमी आहे असंही
त्यांनी नमुद केलं. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं `बांसुरी उत्सव` साजरा करण्यात आला.
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथल्या हॅलो मेडीकल
फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये उत्कृष्ठ काम
करणारे डॉक्टर म्हणुन डॉ. प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती. डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर आणि डॉ. सदानंद राऊत, पुणे यांचा समावेश आहे. तर आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट
काम करणारे पत्रकार म्हणुन दैनिक लोकसत्ताचे ठाणे इथले सहयोगी
संपादक संदीप आचार्य यांना तसंच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून हिंगोलीचे प्रशांत
संभाप्पा तुपकरी यांना गौरवण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी चार
वाजता वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केलं जाणार आहे.
****
मराठवाड्याच्या विकासाची पुनर्रचना करावी लागणार असुन
कलम ३७१ अन्वये आसाम आणि त्रिपुरा या ईशान्य राज्यांना केंद्र सरकारनं जशी विशेष आर्थिक
मदत केली त्याच धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भाला सहा लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी
अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश रत्नपारखी
यांनी केली आहे. त्यांचं आज औरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे अग्रणी
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृती दिनानिमित्त `मराठवाडा विकास` या विषयावर व्याख्यान
झालं, त्यावेळी रत्नपारखी बोलत होते. मराठवाड्यासाठी असणारं वैधानिक विकास मंडळ कमकुवत
असून त्याला सक्षम करणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा संशोधन संस्थेनं हा अभिवादनपर कार्यक्रम घेतला.
****
थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न आणि कोरियाच्या ॲन सेयोउंग
यांनी भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं आज विजेतेपद
पटकावलं. कुनलावूतनं नवी दिल्लीमध्ये जगातला क्रमांक एकचा खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्टर
अक्सेल्सनविरुद्ध २२-२०, १०-२१ आणि २१-१२ असा ६४ मिनिटांमध्ये विजय नोंदवला. महिलांच्या
एकेरीचं विजेतेपद पटकवताना कोरियाच्या आन सियोंगनं अंतिम लढतीमध्ये जपानच्या ए. यामागुशीवर
१५-२१, २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये जागतिक अकरावी क्रमवारी प्राप्त
लिआंग वेई केंग आणि वँग चँग यांची जोडी विजेती ठरली.
****
संयुक्त किसान मोर्चातर्फे येत्या बुधवारी राज्यभर निदर्शनं
आणि सत्याग्रहाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली इथं झालेल्या सत्याग्रहातल्या मागण्या
पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्र शासनानं पूर्ण न केल्यानं हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं
किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितलं. या आंदोलनात ३८ संघटना सहभागी
होणार आहेत. शेती उत्पादनाच्या वस्तू आणि सेवांवरचा कर रद्द करावा, शेतकऱ्यांना सेवानिवृत्ती
योजना द्यावी या मागण्यांसह एक निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार असल्याचं क्षिरसागर
यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment