Monday, 23 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      भारतीय औषध निर्माण क्षेत्रानं कोविड काळात केलेलं कार्य अभिनास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

·      दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला, आज मुंबईत प्रारंभ

·      ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार प्रदान

·      शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीबाबत बोलणी पूर्ण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण

·      उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

आणि

·      हॉकी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा भारतावर विजय, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीमधलं सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात

 

सविस्तर बातम्या

भारतीय औषध निर्माण क्षेत्रानं कोविड काळात केलेलं कार्य अभिनास्पद असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर इथं आयोजित केलेल्या, ७२ व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा समारोप, काल फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड साथीत भारतानं ३० कोटी लसी निर्माण करुन त्या १०६ देशांना निर्यात केल्या. औषध निर्माण क्षेत्रातलं हे यश उत्तरोत्तर वाढत गेलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या बैठकांमध्ये झालेले ठराव राज्य सरकारकडे आल्यानंतर त्यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

कर्मचारी निवड आयोग- स्टाफ सिलेक्शन कमिशननं, बिगर - तांत्रिक श्रेणीतील मल्टी-टास्किंग कर्मचारी परीक्षा २०२२, पहिल्यांदाच हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह  उर्दू, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया आणि पंजाबी, या तेरा प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नोकरीसाठी उत्सुक असलेल्या सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देणं, आणि भाषेच्या अडथळ्यामुळे कोणालाही संधी नाकारली जाऊ नये किंवा कोणीही त्यापासून वंचित राहू नये, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी हा निर्णय सुसंगत असल्याचं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी, ठाण्यात आयोजित सभेत ते काल बोलत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार अनुकूल आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दावोस इथल्या परिषदेतल्या गुंतवणुकीसंदर्भात आरोप केले जात आहेत. मात्र, अनेक परदेशी कंपन्या थेट गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित उपक्रमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात, असं ते म्हणाले. दावोसमध्ये अनेक उद्योगपती देशातले असले, तरी गुंतवणूक ही परदेशीच आहे, असं त्यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एका समारंभात ११ बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळणं आवश्यक आहे, अशा बालकांना भारत सरकारतर्फे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पाच ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांना, सहा विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.  पुरस्कार पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधान, नरेंद्र मोदी उद्या संवाद साधतील.

****

केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला, आज मुंबईत प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल. देशभरातून २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले पाचशेहून अधिक प्रतिनिधी, यामध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण, यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

****

ठाण्याच्या गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशाच्या सीमा ओलांडून भारतीय शास्त्रीय संगीत पोहचवण्याचं काम प्रभा अत्रे यांनी केलं असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातलं सरकार सर्व घटकांचं असून आपलं सरकार कला प्रेमी आहे असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं `बांसुरी उत्सव` साजरा करण्यात आला.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आमची युतीबाबत बोलणी झाली असून, याबाबत ठाकरे यांनी घोषणा करावी, असं आम्ही सांगितल्याचं, वंचित बहुजन आघाडीचे नेते, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत चर्चा करत असून, याबाबत एकत्रित घोषणा करावी अशी ठाकरे यांची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. अमरावती पदवीधर मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक अनिल अमलकर यांच्या प्रचारासाठी, अमरावती इथं आले असता, ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास, आमचा विरोध नाही असं स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले…

 

त्यांना असं वाटतय की, आपण राष्ट्रवादीला ही बरोबर घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असं म्हटलय की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. राष्ट्रवादीलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, बोलणीच्या संदर्भातला सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करु आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतो.

 

****

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला, उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ठ काम करणारे डॉक्टर म्हणून, अमरावतीचे डॉ. प्रमोद पोतदार, कोल्हापूरचे डॉ. उमेश कदम तर पुणे इथले डॉ. सदानंद राऊत यांना गौरवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार म्हणून दैनिक लोकसत्ताचे ठाण्याचे सहयोगी संपादक संदीप आचार्य यांना, तसंच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून हिंगोलीचे प्रशांत संभाप्पा तुपकरी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

भारतीय मानक ब्युरोनं सोन्याच्या दागिन्यांवरील बी.आय.एस. चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये नुकतीच विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह, राज्यातल्या सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतलया झवेरी बाजार इथं सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे दिड कोटी रुपयांचे पावणे तीन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ठाणे, पुणे आणि नागपूरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली, त्यात बनावट चिन्हांकित दागिने जप्त करण्यात आले तसंच बी आय एस नं निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई देखील करण्यात आली.

****

मराठवाड्याच्या विकासाची पुनर्रचना करावी लागणार असून, कलम ३७१ अन्वये आसाम आणि त्रिपुरा या ईशान्य राज्यांना केंद्र सरकारनं जशी विशेष आर्थिक मदत केली, त्याच धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भाला सहा लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश रत्नपारखी यांनी केली आहे. औरंगाबाद इथं हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृती दिनानिमित्त, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित, `मराठवाडा विकास` या विषयावरच्या व्याख्यानात ते काल बोलत होते. मराठवाड्यासाठी असणारं वैधानिक विकास मंडळ कमकुवत असून, त्याला सक्षम करणं गरजेचं असल्याचंही रत्नपारखी म्हणाले.

****

परभणीच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनँशनल फाउंडेशनतर्फे काल उपग्रह विषयक कार्यशाळा घेण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेमध्ये आतापर्यंत मोठ्या शहरांची मक्तेदारी होती, ती या कार्यशाळेच्या माध्यमातून मोडीत निघणार असून, परभणीला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करून जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करा, असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी केलं. तामिळनाडूत पट्टीपुरम इथून १९ डिसेंबर २०२३ रोजी एकाचवेळी १५० उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार असून, यात परभणीच्या १५ उपग्रहांचा समावेश असेल, ही परभणीकरांसाठी आनंददायी बाब असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात काल परभणीसह नागपूर आणि पुणे इथं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

****

लोकशाहीला पोखरणारी वाळवी पत्रकारांनी उध्वस्त करावी, असं आवाहन माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केलं आहे. नांदेड इथं काल सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्कार गव्हाणे यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात सर्वसामान्यांची उदरनिर्वाहाची साधने महाग होत असून,अशा वेळी पत्रकारांनी खासगी समूहाचं हित जपायचं की जनहित जपायचं, याचा विचार करणं गरजेचं असल्याचं गव्हाणे म्हणाले. माजी खासदार व्यंकटेश काब्दे यावेळी उपस्थित होते. राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार विलास बडे यांना प्रदान करण्यात आला.

****

ओडिशामध्ये सुरु असलेल्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा काल न्यूझीलंडकडून चार - पाच असा पराभव झाला. दोन्ही संघाचे समान तीन - तीन गोल झाल्यानंतर पेनल्टी शुटआऊट झाला. या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीमधे काल सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात आलं. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना यांच्या जोडीला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत एन. श्रीराम बालाजी आणि जीवन नेदुंचेझियान या जोडीलाही, पराभव पत्करावा लागला.

****

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न यानं पुरुष तर कोरियाच्या ॲन सेयोउंग हिनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. कुनलावूतनं जगातला क्रमांक एकचा खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सेल्सनविरुद्ध २२-२०, १०-२१, २१-१२ असा ६४ मिनिटांमध्ये विजय नोंदवला. महिलांच्या एकेरीचं विजेतेपद पटकवताना कोरियाच्या आन सियोंगनं अंतिम लढतीमध्ये, जपानच्या ए. यामागुशीवर १५-२१, २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये जागतिक अकरावी क्रमवारी प्राप्त लिआंग वेई केंग आणि वँग चँग यांची जोडी विजेती ठरली. 

****

औरंगाबाद शहरालगत रांजणगाव शेणपुंजी इथं बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन काल शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचं काल राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून १९९१ आणि १९९५मध्ये ते आमदार झाले होते. १९९१ ते १९९५ या काळात, ते विधानसभा उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दान करण्यात आला.

****

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा च्या अध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्ह्यातले ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पाटील यांची निवड झाली आहे. कौन्सिलच्या काल पुणे इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या एका कारकुनाने जिल्हाधिकार्यांच्या नावाने असलेल्या विविध योजनांच्या निधीतून सुमारे २२ कोटी ८७ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जलयुक्त शिवाय योजनेतलं देयक जमा न झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर चौकशी केली असता हा गैरप्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारकुनासह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयानं त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

****

पैठणहून दक्षिण जायकवाडीला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरच्या पुलावरून काल एक मोटारगाडी पाण्यात कोसळल्यानं तीन जण जखमी झाले. जखमींना पैठणमधल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...