आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
निवडणूक आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक
पक्षांच्या उमेदवारांना आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांना, प्रचारादरम्यान काळजी घेण्याची,
आपल्या वक्तव्यांमध्ये संयम बाळगण्याची सूचना केली आहे. कर्नाटक विधानसभा
निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं एक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचं पालन करण्याचा आणि नियामक चौकटीनुसार
योग्य ती कारवाई करण्याचा आदेशही आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.
****
जुगार आणि सट्टेबाजीच्या जाहिरातींवर निर्बंध
आणण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रयत्न करावे, असं आवाहन, केंद्र
सरकारनं केलं आहे. सरकारने यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. आर्थिक आणि सामाजिक धोके असल्यानं देशाच्या
बहुतांश भागात सट्टेबाजी आणि जुगारावर निर्बंध असल्याकडे या पत्रातून लक्ष वेधलं आहे.
****
भारताच्या इथेनॉल क्षेत्रामध्ये झालेली
वाढ प्रचंड असून जगासाठी ते एक उदाहरण ठरलं असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी
म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं मक्यापासून इथेनॉलपर्यंत या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.
इथेनॉल निर्मितीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाल्यामुळे ग्रामीण
भागात हजारो रोजगार निर्मितीसोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेत गुणात्मक वाढ झाल्याचं गोयल
यांनी सांगितलं.
****
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बारामती
ते इंदापूर दरम्यान एक हजार पंचवीस वटवृक्ष रोपित केल्याची माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी आणि
मार्च महिन्यात हा प्रकल्प राबवल्याचं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तपदी
जी.श्रीकांत यांची
नेमणूक झाली आहे. महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची श्रीकांत
यांच्या जागी राज्य कर विभागाचे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत
ऑस्ट्रेलियाला मागे टाकून भारतीय क्रिकेट संघ प्रथम क्रमांकाचा कसोटी संघ बनला आहे.
भारताकडे सध्या १२१ गुण आहेत.
****
No comments:
Post a Comment