Monday, 5 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 05.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 05 June 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०५ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आपल्या विकासासाठी इतर क्षेत्रांप्रमाणेच पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला, त्यात ते बोलत होते. केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यावेळी उपस्थित होते. सरकारने गेल्या नऊ वर्षांत हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर भर दिला असून, एकविसाव्या शतकात भारत हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणावर भर देत पुढे जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारतानं हवामान बदलाचा मुद्दा जगासमोर मांडला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

विकास आणि पर्यावरण या दोन्हीचा मेळ साधत भारत वाटचाल करत असल्याचं भुपेंद्र यादव यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात यादव यांनी पर्यावरण जागरूकतेसाठी तयार केलेल्या माय लाईफ या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं.

पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं १९७३ पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखाही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

***

पर्यावरण दिनानिमित्त औरंगाबाद इथं महानगरपालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं, सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थितीत सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची शपथ घेतली.

***

आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यावेळी हा निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी एकत्रित निवडणुका लढवून बहुमताने जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या बैठकीत कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

***

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. सुलोचना यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या होत्या.

***

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

***

हर घर नर्सरीउपक्रमाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सलग दुसऱ्यांदा दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन, विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहिम पार पडली. हा बीज संकलन उपक्रम रेणापूर, लातूर, चाकूर तालुक्याच्या सीमेवर दव्हेली, जानवळ, वडवळ, झरी या परिसरात राबवण्यात आला. यावेळी मासरोहिणी, आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक दुर्मिळ वृक्षांचं बीसंकलन करण्यात आलं.

***

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.

***

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचं महाविद्यालयात आज वाटप करण्यात येत आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळातून महाविद्यालयांना आज सकाळी गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या.

***

हुजुर साहिब नांदेड - संबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस आज नांदेडहून उशिरा सुटणार आहे. ही गाडी आज तिच्या दुपारी साडे चार या नियोजित वेळेऐवजी, रात्री आठ वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

 

//************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...