Tuesday, 6 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 06.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 06 June 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटेपासून महाड ते किल्ले रायगड पर्यंत जवळपास २४ किलोमीटर अंतरावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गर्दीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होताच परतावं लागल्यानं, शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रचंड गर्दी पाहून किल्ले रायगड कडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.

****

वीन सहकार धोरणाची सुरुवात पुढील महिन्यात होण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. सर्व संबंधित संस्था, राज्य सरकारं, केंद्रीय मंत्रालयं आणि राष्ट्रीय सहकारी संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच, हे धोरण जाहीर करण्यात येईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर या मसुद्याचं सादरीकरण केलं. देशभरात तळागाळातल्या स्तरावर नवीन सहकार धोरणाला बळकटी देण्यासाठी काय करता येईल, याबाबत अमित शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

आर्थिक सर्वसमावेशनासाठी आंतरदृष्टीय डॅशबोर्डचा प्रारंभ भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते काल झाला. या डॅशबोर्डच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाबाबत प्रगतीचा आढावा घेता येईल, तसंच देशभरात सुरु असलेल्या कामावर देखरेख ठेवता येईल. सद्य:स्थितीत केवळ रिर्जर्व्ह बँकेच्या आंतरिक कामांमध्ये या डॅशबोर्डचा वापर केला जाणार असून, आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.

****

गेल्या नऊ वर्षांत भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची माहिती, केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारताचं अंतराळ क्षेत्र प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रक्षेपणाच्या मूलभूत कार्याशिवाय भारत हा अंतराळ क्षेत्रात, १३० स्टार्टअपच्या माध्यमातून लोकांसाठी वेगवेगळ्य़ा संधी निर्माण करणारा स्त्रोत ठरला असल्याचं, जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

****

नागरी उड्डय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विशिष्ट मार्गावरील विमानसेवेच्या वाढत्य़ा दरांवर चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली इथं झालेल्या विमानसेवेच्या सल्लागार गटाच्या बैठकीत तिकिट दरावर चर्चा करण्यात आली. विमानसेवा कंपन्यांनी स्वत: निश्चित केलेल्या दरावर लक्ष ठेवायला हवं, असं सिंधिया म्हणाले. आपत्तीच्या काळात तिकिट दरात कपात केली जावी, तसंच ओडिशा दूर्घटनेतल्या आपत्तीग्रस्तांना नि:शुल्क वाहतूक सेवा प्रदान करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील आज या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं.   

****

कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार आहे. लंडनच्या ओवल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीत आपला स्थान पक्कं केलं आहे.

****

हवामान

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सात ते नऊ जून दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे.

 

//************//

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...