Tuesday, 20 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 20.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २० जून  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

·      बुद्धिवंतांचं स्थलांतर थांबवण्यासाठी विद्यापीठांतले पदव्यूत्तर विभाग आणि संशोधन संस्था बळकट करण्याची गरज-राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस

·      ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं काल कोल्हापूरात वार्धक्यानं निधन

·      मराठवाड्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प वेगानं मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      जालना जिल्ह्यात बनावट खताचा मोठा साठा जप्त

·      नांदेड जिल्ह्यात काल दोन वाहनांच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

आणि

·      आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या भवानी देवीला कांस्य पदक

सविस्तर बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत, मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंजुरी दिली. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या विविध कामामध्ये, १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचं, महालेखापालाच्या विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदवण्याबाबत निवेदन दिलं होतं.

****

शिवसेनेच्या ५७व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या दोन्ही गटांचे काल मुंबईत मेळावे झाले. गोरेगाव इथल्या नेस्को संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी, आमच्यावरच्या आरोपांना कामाने उत्तर देणार असल्याचं सांगितलं. बाळासाहेबांचे आणि ज्वलंत हिंदुत्वाचे विचार सर्वदूर नेण्याचं काम आपण करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजप महायुती म्हणून लढणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

तर मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाच्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सरकारनं सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर जेवढा खर्च केला आहे, तेवढा खर्च शेतकऱ्यांना दिला असता, तरी आपल्या बळीराजाचं संकट दूर झालं असतं, असं ठाकरे  यावेळी म्हणाले.

****

महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सध्याही विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात, मात्र आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, विविध योजनांमुळे मोंदींना जनाधार मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल कल्याण इथं मोदी अ‍ॅट नाईन महा-जनसंपर्क अभियानांतर्गत बोलत होते. देशाला मजबूत करायचं असल्यास महिलांना सक्षम करायची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली.

****

मागासवर्गीय कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये काळानुरूप बदल करण्याबाबत अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी मागासवर्ग आयोगाला नियमितपणे माहिती द्यावी, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी दिले आहेत. ते काल नागपुरात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. मागासवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मंजूर निधीचा विनियोग योजननिहाय प्रभावीपणे तसंच परिणामकारक करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त उद्या २१ जून रोजी विधान भवनाच्या प्रांगणात, 'योगप्रभात विधान भवन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. राज्य विधिमंडळ सदस्यांसह सुमारे दोन हजार योगप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावात, शाळा, महाविद्यालयात, सर्व शासकीय आणि खाजगी आस्थापनामंध्ये योग कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलं आहे.

दरम्यान, कळंब इथं अंध योग शिक्षक शशिकुमार भातलवंडे हे मागील अनेक वर्षांपासून, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांना योगाचे धडे देत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना योगासनांचं महत्त्व सांगत योग हा जीवनशैलीचा भाग बनवण्याचं आवाहन केलं आहे.

 

Byte..

योगात प्रचंड शक्ती आहे. म्हणूनच एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारताने जगाला दिलेली एक अमृतमय भेट आहे. म्हणून नित्य योग करा, प्राणायम करा. नकारात्मकता दूर करा. या देशाची समृद्धी, वैभव म्हणजे या देशातली निरोगी आणि स्वस्थ विचारांची माणसं आहेत. स्वस्थ आणि निरोगी शरीराची माणसं आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी निरोगी रहावं आणि दवाखान्यात जाणारा अमूल्य वेळ आणि पैसा याच्यापासून मुक्ती मिळावी. धन्यवाद.

****

देशातल्या बुद्धिवंतांचं स्थलांतर थांबवण्यासाठी विद्यापीठांमधल्या पदव्यूत्तर विभाग आणि संशोधन संस्था बळकट करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन, राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ - बाटू चा पंचविसावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी विदेशात जातात, यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आय आय टी तील अनेक विद्यार्थी विदेशात स्थायिक होतात हे थांबवण्यासाठी उद्योग आणि विद्यापीठांचं सहकार्य वाढलं पाहिजे असं राज्यपाल म्हणाले.

****

मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं काल कोल्हापूरात वार्धक्यानं निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. तब्बल सात दशकं त्यांनी चंदेरी पडद्यावर चरित्रभूमिका साकारल्या. शांता तांबे यांनी रंगभूमीवरून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केलं. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

****

मृतदेह जाळून किंवा पुरुन नष्ट करण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणं, हे खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य आहे, यासाठी नागरिकांनी देहदानाच्या चळवळीत सहभाग घेण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन, नांदेडचे वैद्यकिय अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी केलं आहे. किनवट तालुक्यातल्या सविता माधव श्रीरामवार यांचा देहदानाचा संकल्प, त्यांच्या कन्या रुपाली श्रीरामवार यांनी काल पूर्ण केला, त्यावेळी डॉ.वाकोडे बोलत होते. समाजातल्या लोकांनी यांचा आदर्श समोर ठेवून देहदानाच्या चळवळीत सहभाग घ्यावा, असं आवाहन डॉ.वाकोडे यांनी यावेळी केलं.

****


मराठवाड्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प वेगानं मार्गी लावण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मराठवाडा तसंच नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पाच्या कामास गती देण्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात आले. कृष्णा मराठवाडा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी निरा खोऱ्यातलं पाणी भिमा नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक ३४१ कोटी रुपये रकमेस मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसंच गोदावरी मराठवाडा प्रदेशातल्या १२५ कोटी ९७ लाख रुपये रकमेचे विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी शासनास सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

****

शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पांजरपोळ मैदानावर येत्या २५ जून रोजी विशेष कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आढावा बैठक घेतली. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या.

****

औरंगाबाद इथं ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं तीन दिवसीय ‘शोध आणि बचाव कार्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात पोलिस दल, महानगरपालिका, अग्निशमन विभाग, तसंच गृहरक्षक दलाच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथं बनावट खताचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तीर्थपुरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट खत विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य मुख्य गुणवत्ता निरीक्षक पी.डी. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पुणे इथल्या पथकानं ही कारवाई केली.

****

नांदेड जिल्ह्यात काल दोन वाहनांच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. नांदेडहून प्रवासी घेऊन भोकरकडे जाणारी जीप आणि मालवाहू टॅम्पो यांच्यात हा अपघात झाला.

****

परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल झालेल्या या निवडणुकीत चंद्रकात कराड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

****

अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या गटानं विजय मिळवला आहे. कारखान्याच्या १९ जागा पैकी १८ जागांवर थोरात यांच्या पॅनलच उमेदवार विजयी झाले असून, एका जागेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ सुजय विखे यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आला आहे.

****

चीनमधल्या वुक्सी इथं सुरु असलेल्या आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या भवानी देवीनं कांस्य पदक जिंकलं. महिला सेबर स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत काल भवानी देवीला उजबेकिस्तानच्या खेळाडूकडून १४ - १५ असा पराभव पत्करावा लागल्यानं, कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

****

लातूर जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प उमेद अंतर्गत जिल्ह्यातील ३५० बचत गटांना नऊ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलं असून, याचे मंजुरी आदेश बचत गटांच्या महिलांना, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काल वितरीत करण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना वैयक्तिक विहीर, जनावरांचा गोठा आदी बाबींचे मंजुरी आदेश, ग्रामीण रस्ते मंजुरी आदेश, आदीचा समावेश आहे.

****

आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारात प्रत्येकानं भरडधान्याचा नियमित वापर करावा, तसंच दररोज पंधरा मिनिटं योगाभ्यास करावा, असं मत, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त, श्रीरामपूर इथं आयोजित मल्टिमिडिया प्रदर्शन आणि विशेष प्रचार कार्यक्रमाचं उद्घाटन काल आमदार कानडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात भरडधान्याचे विविध प्रकार, त्यांचं आरोग्यातलं महत्त्व, तसंच विविध योग प्रकारांविषयी सचित्र माहिती मांडण्यात आली आहे. श्रीरामपूर मधल्या विविध बचतगटांनी भरडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉलही इथं लावण्यात आले आहेत‌.

****

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल उस्मानाबाद शहरात आगमन झालं. नागरिकांनी मोठ्या उत्साहात रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजवून पालखीचं स्वागत केलं. आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करेल.

****

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍‍वर महाराज यांचा पालखी सोहळा लोणंद इथल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज सकाळी तरडगावकडे मार्गस्थ होत आहे. या मार्गावर आज दुपारी चांदोबाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण होणार आहे. उद्या सकाळी तरडगाव येथून पालखी फलटणकडे मुक्कामासाठी मार्गस्‍थ होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...