Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
·
२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय
अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार-पंतप्रधानांची
घोषणा
·
तृतीयपंथियांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र
तसंच राज्य सरकारांना नोटीस
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत ‘शासन आपल्या दारी’कार्यक्रम
·
खरीप
हंगामासाठी जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणी सोडण्याची कालवा सल्लागार
समितीची शिफारस
·
कर्तव्यात
कसूर प्रकरणी जालना जिल्ह्यात १४ कृषी
सहायकांविरोधात गुन्हा दाखल
·
दृष्टीबाधितांच्या
जागतिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य
आणि
· जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एच. एस.
प्रणॉयला कांस्यपदक
****
२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
आहे. चांद्रयानाच्या चंद्रावर यशस्वी अवतरणाच्या पार्श्वभूमीवर
ते काल बंगळुरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोच्या मुख्यालयात
शास्त्रज्ञांच्या अभिनंदनपर कार्यक्रमात बोलत होते.
विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं
त्या स्थळाचं ‘शिवशक्ती’
असं नामकरण करण्यात येईल तसंच चांद्रयान-दोनचा लॅण्डर चंद्रावर ज्या
ठिकाणी कोसळला, त्या स्थळाचं “तिरंगा
असं नामकरण केलं जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. अपयश
हा शेवट नसून कठोर परिश्रम करत भविष्यात यशस्वी होण्याचा धडा घेण्याची आठवण ‘तिरंगा बिंदू’ आपल्याला करून देत राहील, यातून भावी पिढ्यांना मानवतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध राहण्याची प्रेरणा
मिळेल असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाद्वारे
इस्रोच्या वैज्ञानिकांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली असून त्यांचं समर्पण-जिद्द प्रेरणादायी आहे, या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं
कौतुक केलं.
*****
मन
की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे चारावा भाग असेल. आकाशवाणी - दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, माहिती आणि प्रसारण
मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल.
****
तृतीयपंथी व्यक्तींना सार्वजनिक
शिक्षण संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र
तसंच देशभरातल्या राज्य सरकारांनी उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नोटीस
बजावली आहे. केरळमधल्या एका तृतीयपंथी व्यक्तीनं ही याचिका दाखल केली आहे.
तृतीयपंथी समुदाय हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर मागासलेला असल्यानं त्यांच्या हितासाठी
त्यांना आरक्षण देण्याचा आदेश जारी करावा, अशी मागणी या
याचिकाकर्त्यानं केली आहे.
****
राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारांची
घोषणा करण्यात आली आहे. राज्यातल्या पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सारथी
मोबाईल अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार तर सोलापूरला स्मार्ट सिटी पुरस्कार
मिळाला आहे. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार इंदूर, सुरत आणि आग्रा या शहरांनी मिळवला आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर
प्रदेश या राज्यांना राज्य पुरस्कार मिळाला असून चंडीगड़ला केंद्र शासित प्रदेशांचा
पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येत्या २७ सप्टेंबर रोजी इंदूर
इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
उपस्थितीत होणार आहे.
****
आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या नव्या रुपातल्या संकेतस्थळाचं काल अनावरण
झालं. हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी अधिक सोपं, तसंच अधिक सुलभ
आहे. यावर प्रत्यक्ष कर कायदा, इतर संलग्न कायदे, आयकर विभागाची परिपत्रकं आणि दिशानिर्देश यांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी
नांदेड आणि परभणीच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता नांदेड
इथल्या विमानतळावर त्यांचं आगमन होऊन ते हेलीकॉप्टरने परभणीकडे प्रस्थान करतील. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सकाळी साडे अकरा
वाजता
मुख्यमंत्र्यांचं आगमन
होईल,
शासन
आपल्या
दारी
कार्यक्रमाला
संबोधित
केल्यानंतर
दुपारी दोन वाजेनंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने नांदेडकडे आणि तिथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.
****
काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षात
नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा
चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही सकारात्मक सुरुवात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम
करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात 'इंडिया' आघाडी
म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं पवार सांगितलं. 'इंडिया' आघाडीची दोन दिवसीय बैठक या आठवड्यात मुंबईत
होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांचे मुख्यमंत्री
सहभागी होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
राज्यभरात पावसानं ओढ दिल्यानं तोंडाशी आलेली पिकं
करपत आहेत, आतापर्यंत पंचनामे
सुरू करायला हवे होते, मात्र सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर
नसल्याचं दिसून येतं, अशी टीका शरद पवार यांनी केली. १५
सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचं केंद्राचं धोरण आहे. यानंतर जागतिक
बाजारपेठेतील साखरेचे दर कमी होतील, असा अंदाज पवार यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
आगामी निवडणूका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परीषदेत बोलत
होते. आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होणार असलेल्या जाहीर सभेबाबत तटकरे
यांनी यावेळी माहिती दिली. ही उत्तरदायित्वाची सभा आहे.
आगामी काळात राज्यभर करण्यात येणाऱ्या दौऱ्याची सुरुवात आज बीडच्या सभेनं होत
असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. धर्मनिरपेक्षता ही आमची मूळ विचारधारा आहे. त्या
विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेण्यासाठी महायुती सरकारमध्ये
सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांची आज हिंगोलीत निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. रामलीला मैदानावर दुपारी दोन वाजता ही सभा होणार
आहे.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं
काल मुंबईत निधन झालं, ते ८० वर्षांचे होते.
शंभराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. लाल पत्थर, बाजीगर, हम आपके
हैं कौन, मैंने प्यार किया, आदी चित्रपटांमधील
त्यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. देव कोहली यांच्या
पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
जलशक्ती मंत्रालयानं काल लघुसिंचन योजनांचा सहावा गणना
अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार,
देशात दोन कोटी ३१ लाखांहून अधिक लघुसिंचन योजनांची नोंद झाली आहे.
यामध्ये दोन कोटी १९ लाख भूजल योजना तर १२ लाख १० हजार पृष्ठीय जल योजनांचा
समावेश आहे. देशात सर्वात जास्त लघुसिंचन योजना उत्तर प्रदेशात
असून त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक
आहे. भूजल योजनांसाठी उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. पृष्ठीय जल योजनांसाठी महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कांद्याला हंगामानुसार योग्य
हमीभाव मिळण्यासाठी, तसंच
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं
शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे अन्न, नागरी
पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक
जिल्ह्यातल्या विंचूर उप-बाजार समितीला भुजबळ यांनी काल भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, कांद्याच्या समस्येवर कायमस्वरूपी
तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी, व्यापारी
आणि बाजार समिती संचालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असं ग्रामविकास मंत्री गिरीश
महाजन यांनी सांगितलं आहे. कांदा चाळी वाढवण्याच्या दृष्टीनं छोट्या कांदा
चाळींनासुद्धा अनुदान देण्याचं प्रस्तावित असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.
****
जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून खरीप हंगामासाठी
पाणी सोडण्याची शिफारस कालवा सल्लागार समितीने केली आहे. समितीची काल औरंगाबाद इथं सिंचन भवनात पालकमंत्री
संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पावसाची स्थिती
पाहता, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून दोन आवर्तनं देण्याची तसंच
जायकवाडी प्रकल्पातूनही पाणी देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. पावसाळ्याच्या उर्वरित काळात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहून पुढील आवर्तनांचा
निर्णय घ्यावा, असंही या बैठकीत सांगण्यात आलं.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून, धरणातून ८२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, भंडारदरा प्रकल्पाचे
अभियंता अभिजीत देशमुख यांनी ही माहिती दिली.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष
समारोपानिमित्त संपूर्ण मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घ्यावेत, आणि मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पुढच्या
पिढीपर्यंत पोहोचवा, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे
आर्दड यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात काल या संदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या अंतर्गत आरोग्य
शिबिरं, स्वच्छता अभियान, प्रभात फेरी,
राष्ट्रगीत, राज्यगीत आणि मराठवाडा गीत गायन,
व्याख्यानमाला, काव्यवाचन, कवी संमेलन, मराठवाडा मुक्तीसंग्राम माहितीपट
सादरीकरण आदी उपक्रम राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
या उपक्रमांत शासकीय संस्था, विद्यापीठं, शैक्षणिक
संस्थांना सहभागी करावं. वृक्ष लागवड, पथनाट्य, हुतात्मा स्मारकांसह सर्व शहरांमधील स्मृतीस्थळांचं सुशोभिकरण यांसारखे
उपक्रम राबवण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.
****
जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत विविध
गावांसाठी नियुक्त १४ कृषी सहायकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. वर्ष-२०२२ मध्ये
अतिवष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान झाल्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान
जाहीर केलं होतं, महसूल प्रशासनानं
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर
करण्याचे निर्देश कृषी सहायकांना दिले
मात्र, वारंवार लेखी सूचना तसंच नोटीसा बजावूनही १४
कृषी सहायकांनी १५ गावांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत केल्या
नाहीत. त्यामुळे संबंधीत शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. याची गंभीर दखल घेत
नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या कृषी सहायकांविरुध्द
तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
****
दृष्टीबाधितांसाठीच्या जागतिक टी-ट्वेंटी
क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सुवर्णपदक
पटकावलं. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं झालेल्या या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना
ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी ११५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र
पावसामुळे हा सामना नऊ षटकांचा खेळवण्यात आला आणि विजयी लक्ष्य ४२ धावांचं देण्यात
आलं. भारतानं अवघ्या साडेतीन षटकातच एक बळी गमावून हे लक्ष्य पार केलं आणि विजेतेपदाला
गवसणी घातली.
****
डेन्मार्कमध्ये
कोपनहेगन इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या
एच. एस. प्रणॉयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत प्रणॉयचा
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या के. कुलनावूत व्हिटीड
सर्न यानं पराभव केला. प्रणॉयने पहिला गेम २१-१८ असा जिंकल्यानंतर व्हिटीड सर्न याने पुढच्या दोन गेममध्ये २१-१३, २१-१४ अशा गुणांनी प्रणॉयला
पराभूत केलं.
****
राज्य
शासनानं पिक विम्याची पंचवीस टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करावी
तसंच कांदा पिकावरील चाळीस टक्के निर्यात
शुल्क रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद शाखेनं केली आहे. या मागणीचं निवेदन
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. उस्मानाबाद
जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. खरिपातील सोयाबीन,
उडीद, मूग, मका आदी पिकं
धोक्यात आली असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल पाच जणांचा बुडून मृत्यु झाला. जालना शहरात काल एका नाल्यात दोन तरुणांचे
मृतदेह आढळले. आकाश पाटोळे आणि मुकेश पाखरे अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही
शुक्रवारी सायंकाळपासून घरी परतले नव्हते. काल दुपारी गांधीनगर भागातल्या मोठ्या
नाल्यात त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.
दुसऱ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेने काल आपल्या दोन
मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव इथं ही घटना घडली.
****
संपूर्ण परभणी जिल्हा लम्पी आजाराबाबत सतर्क क्षेत्र
असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ
गावडे यांनी घोषित केलं आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक
जिल्हाधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. लम्पीवर
नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी गोजातीय
प्रजातीची सर्व गुरं, ज्या ठिकाणी पाळली जातात त्या ठिकाणापासून दूर
ठेवावीत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment