Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 28 August 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ ऑगस्ट
२०२३ दुपारी १.०० वा.
****
आजची तरुण पिढी देशाची सेवा करत असून, मातृभाषेचा सन्मान वाढला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
नियुक्तीपत्रांचं वितरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशात अभिमान आणि आत्मविश्वासाचं वातावरण असताना यंदाच्या
रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आल्याचं ते म्हणाले. देशातल्या पायाभूत सुविधांचा
वेगानं विकास होत असून, जगातल्या बाजारपेठेत भारतीय सामानाला वाढती मागणी आहे, असंही
पंतप्रधान म्हणाले. सरकार मेक इन इंडिया अंतर्गत लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर्सवर अधिक भर
देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हा रोजगार मेळावा देशातल्या ४५ ठिकाणी घेण्यात आला. गृह विभागाच्या केंद्रीय
सुरक्षा दल, अंमली पदार्थ विरोधी दल आणि दिल्ली पोलिस, या विभागांमधे या नियुक्त्या झाल्या आहेत.
नागपूर इथं हिंगणा स्थित सीआरपीएफ ग्रुप सेंटर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना
नियुक्तिपत्रं प्रदान करण्यात आली.
तर पुण्यात तळेगाव दाभाडे इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं.
****
जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण
पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. नीरजनं
आपली सर्वोत्तम गुणवत्ता दाखवून दिली, त्याची समर्पित वृत्ती, अचूक फेक आणि खेळाविषयीचं प्रेम यामुळे तो केवळ एक चॅम्पियनच ठरत नाही तर क्रीडा
विश्वातल्या असामान्य गुणवत्तेचं प्रतीक बनला असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात
म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री जन धन योजनेला आज नऊ वर्ष पूर्ण झाली. गेल्या ९ वर्षांत प्रधानमंत्री
जन धन योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त खाती उघडण्यात आली. या खात्यात
दोन लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम जमा करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
आंतरराज्य सचिव परिषद आणि गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची २६ वी
बैठक आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं सुरु झाली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित
शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह
गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री तसंच दादरा नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक सहभागी झाले आहेत.
****
चांद्रयान तीन मधल्या विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरील तापमानाविषयी
नोंदवलेली पहिली निरीक्षणं भारतीय अंतराळ संस्था - इसरोनं जारी केली आहेत. चंद्राच्या
पृष्ठभागावरील दोन सेंटीमीटरच्या तर पृष्ठभागाखालील आठ सेंटीमीटर पर्यंतच्या नोंदी
या पेलोडने नोंदवल्या आहेत. या नोंदीनुसार चंद्रावरचं तापमानात कमाल ५६ अंशांपर्यंत
तर किमान उणे १० अंशापर्यंत नोंदवलं गेलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या ६३वी वार्षिक परिषद काल पुण्यात
सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या
हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातून आणि राज्याबाहेरून
द्राक्ष उत्पादक सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीपासून
द्राक्ष पिकाचं संरक्षण करणाऱ्या प्लास्टिक आच्छादनासाठी, राज्यातल्या
शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात
आलं.
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसत असून, त्यामुळे
होणाऱ्या नुकसानीपासून द्राक्ष उत्पादकांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने
धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं, शरद पवार यावेळी म्हणाले.
****
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना भेडसावणार्या विविध समस्या नोंदवण्यासाठी
महाराष्ट्र राज्य हौसिंग फेडरेशन आणि सहकार आयुक्तालयानं सहकार संवाद या नवीन संकेतस्थळाची
निर्मिती केली आहे. सभासदांनी आपल्या समस्या घरबसल्या या संकेतस्थळावर मांडल्यास ठराविक
कालावधीमध्ये त्याचं निराकरण होईल. यावर सहकार आयुक्तलयाकडून लक्ष ठेवलं जाणार आहे.
****
कोल्हापुरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून
दर्शन घेता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळता गाभाऱ्यातून दर्शनाची सुविधा पूर्ववत करत
असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितलं. अंबाबाई मंदिर परिसरातल्या विविध
विकास कामांचा शुभारंभ केसरकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि शाहू मिल आंतरराष्ट्रीय
स्मारक आराखड्याचं लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात येणार असल्याचंही केसरकर
यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment