Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· परभणी शहरातील सर्व प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार, शासन
आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा
आराखडा तयार,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती.
· गद्दारी झाली नसती तर आपल्याला शेतकऱ्यांचं भलं करता आलं असतं, हिंगोलीतील
सभेत उद्धव ठाकरे.
· मिशन चांद्रयाननं देशाची क्षमता केली सिद्ध, 'मन
की बात'
कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
· आनंदाचा शिधा नागरिकांना वेळेत द्या, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन
भुजबळ यांचे औरंगाबादमध्ये निर्देश.
आणि
· महिलांच्या आशियाई हॉकी फाईव्ह एस. विश्वचषक पात्रता स्पर्धेत एलीट पूलमध्ये भारत
अग्रस्थानी,
अखेरच्या साखळी सामन्यात थायलंडला पाच विरुद्ध चार गोलने नमवलं
****
देशाला विकासाच्या मार्गावर पुढं नेण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी केलं आहे. आज परभणी इथं आयोजित 'शासन आपल्या
दारी'
कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
विकासाच्या मुद्यावरच अजित पवारही आपल्यासोबत
आल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची
जास्तीचा दर देण्याची मागणी असून त्यांना विश्वासात घेऊनच समृद्धी महामार्ग तयार होत
असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. परभणी शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असं
शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले -
परभणी
शहरामध्ये अमृत योजनेतून भुयारी गटारी योजना बांधण्याची आवश्यकता आहे. चारशे कोटीची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा जी योजना आहे,
त्याला देखील पैशाची आवश्यकता आहे. मला देवेंद्रजी
म्हणाले, या भागामध्ये चांगले रस्ते पाहिजे. या परभणीसाठी देखील काँक्रिटच्या रस्त्यासाठी जो निधी आवश्यक आहे, त्या निधीची व्यवस्था देखील केली जाईल. हे सरकार शेतकऱ्यांच्या
बाजूने देखील खंबीरपणे उभे राहील, आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी
बोलताना, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू असे सांगितले. फडणवीस म्हणाले -
मराठवाड्याच्या मागच्या पिढ्यांनी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा
लागू नये, म्हणून वाहून जाणार पाणी हे आपल्याला गोदावरीच्या
खोऱ्यात आणायचं आहे. या संदर्भातला पहिला आराखडा एम डब्ल्यू आर
आर ए पर्यंत पोहोचला आहे. पिण्याच्या पाण्याकरता, शेतीकरीता मराठवाडा ग्रीड सारखी योजना तयार केली. की
ज्या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातली धरणं एकमेकांशी जोडून एखाद्या भागात जास्त
पाऊस झाला, तर त्या भागातील पाणी हे आपल्याला वापरता येईल.
तर, अजित पवार यांनी आपल्या भाषणात, मराठवाड्याचा
अनुशेष भरून काढण्यासाठी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्रीमंडळाच्या
विशेष बैठकीचं औरंगाबाद इथं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. या बैठकीत महत्वाचे निर्णय
घेतले जाणार असल्याची माहिती पवार यांनी बोलतांना दिली.
****
राज्यामध्ये आपलं सरकार अतिशय चांगलं काम
करत होतं. मात्र,
पक्षात गद्दारी झाली. गद्दारी झाली नसती तर आम्हाला शेतकऱ्यांचं
भलं करता आलं असतं,
असं प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी
केलं. हिंगोलीतील रामलिला मैदानावर आज दुपारी झालेल्या सभेत ते बोलत होते. केंद्रातल्या
भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर ठाकरे यांनी टिका केली. केंद्र सरकार जनतेची कामे करीत
नाही, त्यामुळेच आम्ही लोकशाही वाचवायला आलो आहोत. राज्य सरकारवरही त्यांनी यावेळी जोरदार
टिका केली.
दरम्यान, या सभेपूर्वी हिंगोली
शहरात आज जोरदार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे सभेला आलेल्या नागरिकांना त्रास सहन
करावा लागला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
****
"संकल्पातील काही सूर्य चंद्रावरही उगवतात हे २३ ऑगस्ट रोजी भारत आणि भारताच्या
चंद्रयानानं सिद्ध केलं." मिशन चांद्रयान हे देशाच्या क्षमतेचं प्रतीक
बनल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या 'मन
की बात'
या कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे चारावा
भाग होता. इस्त्रोनं चांद्रयान - ३ मोहीम यशस्वी केल्याच्या
पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी नव्या भारताच्या सामर्थ्याचं महत्व विषद केलं.
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ
क्रिडा स्पर्धेत २६ पदकं प्राप्त करणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी 'मन
की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुरध्वनीवरुन संवाद साधला. नेमबाजीत पदक प्राप्त
करणाऱ्या कोल्हापुरच्या अभिज्ञा पाटील हिच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.
****
वैश्विक पुरवठा साखळीत भारत आता विश्वासार्ह
आणि सक्षम असा भागिदार देश बनला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. ते आज नवी दिल्ली इथं व्यापार विषयक बीजनेस-ट्वेंटी शिखर संमेलनात बोलत होते.
आर्थिक विकासाला चालना देणं हा या संमेलनाचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. प्रगतीमध्ये
सर्वांना समान भागीदार करून घेणं हाच पुढे जाण्याचा मार्ग असल्याचं मोदी यांनी यावेळी
नमूद केलं. भारत हा औद्योगिक विकासक्रमात डीजिटल क्रांतीचं प्रतिक म्हणून नावारुपाला
आला असल्याचही ते म्हणाले. दरम्यान, ग्राहकांच्या अधिकारांविषयी
बोलतांना ग्राहक हित जपण्यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असून वर्षातील एक दिवस आंतरराष्ट्रीय
ग्राहक सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं आवाहन यावेळी बोलतांना त्यांनी केलं.
****
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या दहा
अग्रणी अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात मजबूत स्थितीत असल्याचं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात
आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं जागतिक स्तरावर उल्लेखनीय समायोजन क्षमता आणि वाढ दर्शवली
आहे. यासंदर्भात भारताच्या वार्षिक जी.डी.पी. अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीच्या
दराशी जगातल्या विविध अर्थव्यवस्थांसोबतची तुलना करणारा आलेख सरकारनं प्रसिद्ध केला
आहे. त्यानुसार भारताचा वार्षिक जीडीपी वृद्धी दर ५ पूर्णांक ९० शतांश टक्के आहे. त्यापाठोपाठ
चीनचा, नंतर अमेरिकेचा,
त्यानंतर कॅनडा आणि जपानचा क्रमांक असल्याचं दर्शवलेलं आहे.
****
गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा
शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि
ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. आज औरंगाबाद इथं भुजबळ यांच्या उपस्थितीत
पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शासनातर्फे
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत देण्यात येणारा हा खाद्यवस्तुंचा संच अर्थात आनंदाचा
शिधा वाटपाचं काटेकोर नियजन करावं असं भुजबळ यावेळी म्हणाले. यासंदर्भात मराठवाड्यातील
आठही जिल्ह्यांसाठीच्या सद्यस्थितीबाबत एकंदर आढावा घेण्यात आला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी विक्रीस
आणलेल्या उसाचं साखर कारखान्यांमध्ये अचूक मोजमाप करण्यासाठी, संबंधीत
संयंत्रात डिजीटल प्रणलीच्या उपयोगासह प्रमाणित संचालन कार्यप्रणालीची या हंगामापासून
अंमलबजावणी करण्याचं भुजबळ यांनी यावेळी सूचित केलं.
****
सातत्य, परिश्रम, जिद्द
आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो त्यामुळे खेळाडूंनी हे गुण अंगी बाळगावे
असं पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं क्रीडा दिनानिमित्त विविध
क्रीडा प्रकारांत,
राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूंचा पिल्ले
यांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते.
खेळाडूंनी आपलं क्रीडा कौशल्य शंभर टक्के
पणाला लावल्यास यश मिळू शकतं आणि हे यश बरंच काही देणार असतं असं सांगून पालकांनी मुलांना
खेळाविषयी प्रोत्साहन द्यावं तर मुलांनी खेळासोबतच शालेय शिक्षणाला महत्त्व देण्याचं
आवाहन पिल्ले यांनी यावेळी केलं. विविध क्रीडा संघटकांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात
आला.
****
महिलांच्या आशियाई हॉकी फाईव्ह एस विश्वचषक
पात्रता स्पर्धेत आज,
भारतानं थायलंडला पाच - चार अशा गोलनी पराभूत केलं. आज दुपारी
ओमानच्या सलालाह इथं हा सामना झाला. भारतानं काल जपानचाही पराभव केला होता. भारताचा
या स्पर्धेतील हा शेवटचा साखळी सामना होता. एलीट पूल मध्ये भारत अग्रस्थानी राहिला आहे.
****
उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
स्वतंत्र जागेप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यात येईल, असं
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. आज, उस्मानाबाद
जिल्ह्यातील शिंगोली इथं याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दोन वर्षांपूर्वी सुरू
झालेलं हे वैद्यकीय महाविद्यालय सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कार्यरत आहे. होत
असलेली गैरसोय पाहता आणि पुढच्या वर्षांसाठी नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे महाविद्यालयास
जागा कमी पडत आहे. महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जमीन संपादन करून त्यावर इमारतीचे
बांधकाम त्वरीत सुरू करण्यासह आवश्यक मनुष्यबळ भरतीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असं
मुश्रीफ म्हणाले.
****
भारताच्या धावपटूंच्या चार बाय चारशे रिले संघानं विक्रमी खेळ करत जागतिक ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली आहे.
****
No comments:
Post a Comment