Wednesday, 30 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

बहीण भावाचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आज साजरा होत आहे. निरनिराळ्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत थोड्याशा महाग असल्या तरी पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत आहे. आज नारळी पौर्णिमेचा सणही आहे. कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात हा सण साजरा करत आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधनाचा उत्सव हा बंधू-भगिनींना बांधून ठेवणारा असून, परस्पर विश्वास आणि बांधिलकीवर टिकणारं हे नातं असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

 ****

आज विश्वसंस्कृतदिनम् अर्थात जागतिक संस्कृत दिवस आहे. 'भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती' असं जिचं वर्णन केलं जातं, त्या देववाणी संस्कृतच्या सन्मानार्थ आणि प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो. मध्यंतरीच्या काळात संस्कृत अध्ययनाचं प्रमाण काहीसं मंदावलेलं असलं, तरी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने संस्कृत भाषाभ्यासाला नवीन गती मिळणार आहे.

****

चांद्रयान- ३ कडून आणखी महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर आणि ऑक्सिजन उपलब्ध असल्याचा शोध प्रज्ञान रोव्हरनं लावला आहे.

****

गुजरातच्या राज्य सरकारनं पंचायत, नगरपालिका आणि नागरी महामंडळांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. झवेरी आयोगाच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला असल्याचं गुजरात सरकारमधले मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं.

****


नाशिक जिल्ह्यात जनावरांमधल्या लम्पी चर्मरोगाचा प्रभाव वाढला असून, आतापर्यंत या रोगामुळे तीस जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, नाशिक जिल्हा जनावरांच्या लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात सध्या दिसून येत असलेल्या जनावरांच्या लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर काल धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचं मोफत लसीकरण करण्यात आलं.

****

No comments: