Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑगस्ट
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ५१ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र
प्रदान.
· जनधन योजनेमुळे आर्थिक समावेशकतेमध्ये आमुलाग्र बदल-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन.
· औरंगाबाद महानगरपालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिकचं मोफत प्रशिक्षण.
आणि
· जालना जिल्ह्यातल्या ३३ महसूल मंडळांमध्ये पावसाचा २७ दिवसांचा खंड.
****
आजची तरुण पिढी देशाची सेवा करत असून, मातृभाषेचा
सन्मान वाढला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारी नोकरीत नव्यानं
भर्ती झालेल्या,
देशातल्या ५१ हजार उमेदवारांना पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशात
अभिमान आणि आत्मविश्वासाचं वातावरण असताना हा रोजगार मेळावा होत असल्याचं पंतप्रधान
म्हणाले.
हा रोजगार मेळावा देशातल्या ४५ ठिकाणी घेण्यात
आला. गृह विभागाच्या केंद्रीय सुरक्षा दल, अंमली पदार्थ विरोधी दल आणि
दिल्ली पोलिस,
या विभागांमधे या नियुक्त्या झाल्या आहेत.
नागपूर इथं हिंगणा स्थित सीआरपीएफ ग्रूप
सेंटर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या
हस्ते नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तिपत्रं प्रदान करण्यात आली.
पुण्यात तळेगाव दाभाडे इथं केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित
भारताचं अंतिम उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपलं कर्तव्य आणि जबाबदारी
प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे झालेल्या डिजीटल
बदलांमुळे गेल्या नऊ वर्षात देशात आर्थिक समावेशकतेमध्ये आमुलाग्र बदल झाला असल्याचं
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. जनधन योजनेला ९ वर्ष पूर्ण
झाल्याबद्दल त्या बोलत होत्या. या कालावधीत ५० कोटीहून अधिक जनधन खाती उघडून त्यांना
बँकिंग प्रणालीमध्ये आणण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. जनधन खातेधारकांमध्ये
५६ टक्के खाती महिलांची असून यापैकी ६७ टक्के खाती ही ग्रामीण आणि निमशहरी भागातली
आहेत. जनधन खातेधारकांना ३३ कोटीहून अधिक रुपे कार्ड वितरित करण्यात आली आहेत. यातील
६ कोटी २६ लाख लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचे आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यात
जमा करण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
पश्चिम विभागीय परिषदेची २६ वी बैठक, आज
गुजरातमधे गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली
होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल,
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दादरा
नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक या बैठकीला उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत बोलताना, नदी जोड प्रकल्प, मराठवाडा
वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहिनी नद्यांच्या समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर
यासाठी केंद्राने मदत करावी, आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत
निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
****
विविध आजारांचं वाढतं प्रमाण वाढती व्यसनाधीनता
या पार्श्वभूमीवर योगविद्येचा प्रसार अधिक महत्त्वाचा असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी
म्हटलं आहे. ते आज लोणावळा इथं कैवल्यधाम योगसंस्थेच्या ‘स्वामी
कुवलयानंद योग पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. योग ही शरीर, मन
आणि आत्म्याशी संलग्न असलेली प्रक्रिया आहे. ती एक निरोगी जीवन जगण्याची शैली असून
योगसाधनेद्वारे निर्माण होणारा आत्मसंयम आणि सहनशीलता शांततापूर्ण समाजनिर्मितीत उपयुक्त
ठरत असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन आणि स्वामी रित्वन भारती यांना कुवलयानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
****
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी
बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या
बोधचिन्हाचं अनावरण केलं जाईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले
यांनी ही माहिती दिली आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात, असं
पटोले यांनी सांगितलं.
****
राज्यात आगामी निवडणुकीत लोकसभेच्या दोन, आणि
विधानसभेच्या १० ते १२ जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात, अशी
अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे
राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत
बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदार संघातून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही
त्यांनी सांगितलं.
अहमदनगर जिल्ह्यात राहेगाव येथे काही युवकांना
मारहाण केल्याची घटना ही अत्यंत गंभीर असून यातल्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर
कडक कारवाई करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचंही
आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
हंगेरीत बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक
अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला जागतिक अॅथलेटिक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून
देणाऱ्या नीरज चोप्रा याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. नीरज चोप्रा
हा क्रीडा जगतातल्या अतुलनीय गुणवत्तेचं प्रतिक आहे, असं सांगत मोदी यांनी
त्याचा ध्यास आणि अचूकता या गुणांचं कौतुक केलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग
ठाकूर यांनीही नीरज चोप्राचं या नव्या विक्रमाबद्दल अभिनंदन केलं आहे.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे
अध्यक्ष अजित पवार यांनीही नीरजचं अभिनंदन केलं आहे. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमधल्या
सुवर्णपदकानंतर,
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण
कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा
देणारी आहे,
अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राचं कौतुक
करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं आपल्या शाळेतील
विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिक या खेळाचे विनाशुल्क प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला
आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या निर्णयावर उद्या २९
ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. जिम्नॅस्टिक या प्रकारात
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी "CATCH THEM YOUNG" नावाने अनोखं अभियान औरंगाबाद महापालिका सुरू करत आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती
पुरस्कार प्राप्त खेळाडू या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या ४९ महसूल मंडळांपैकी
३३ महसूल मंडळांमध्ये पावसात २७ दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी
या प्रमुख पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. वाढीच्या अवस्थेत असलेली मका, बाजरी, तूर
ही पिकेही पावसाअभावी सुकू लागली आहे. जिल्ह्यातल्या लघू आणि मध्यम प्रकल्पांमधल्या
जलसाठ्यात घट झाली असून,
विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण
पांचाळ यांनी कृषी विभागाला पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले
आहेत.
****
औरंगाबाद इथल्या हर्सूल कारागृहात काही कैद्यांनी
एकत्र येऊन तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना मारहाण
केली. कारागृहातील पथक कैद्यांची झडती घेत असताना हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी
९ कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment