Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑगस्ट
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन'
म्हणून साजरा केला जाणार - पंतप्रधानांची घोषणा.
· राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार जाहीर-पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी मोबाईल अॅपसाठी
उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार तर सोलापूरला स्मार्ट सिटी पुरस्कार.
· हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं मुंबईत निधन.
आणि
· खरीप हंगामासाठी जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणी सोडण्याची कालवा
सल्लागार समितीची शिफारस.
****
२३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय
अंतराळ दिन'
म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केली आहे. चांद्रयानाच्या चंद्रावर यशस्वी अवतरणाच्या पार्श्वभूमीवर ते आज बंगळुरूत
भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोच्या मुख्यालयात शास्त्रज्ञांच्या अभिनंदनपर कार्यक्रमात
बोलत होते.
विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं
त्या स्थळाचं 'शिवशक्ती'
असं नामकरण करण्यात येईल तसंच चांद्रयान-दोनचा लॅण्डर चंद्रावर
ज्या ठिकाणी कोसळला,
त्या स्थळाचं "तिरंगा" असं नामकरण केलं जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. अपयश हा शेवट नसून
कठोर परिश्रम करत भविष्यात यशस्वी होण्याचा धडा घेण्याची आठवण 'तिरंगा
बिंदू'
आपल्याला करून देत राहील, यातून भावी पिढ्यांना
मानवतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध राहण्याची प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन पंतप्रधानांनी
केलं. चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांनी देशासाठी अभिमानास्पद
कामगिरी केली असून त्यांचं समर्पण-जिद्द प्रेरणादायी आहे, या
शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं.
****
राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारांची घोषणा
करण्यात आली आहे. राज्यातल्या पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सारथी मोबाईल अॅपसाठी उत्कृष्ट
प्रशासन पुरस्कार तर सोलापूरला स्मार्ट सिटी पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्मार्ट
सिटी पुरस्कार इंदूर,
सुरत आणि आग्रा या शहरांनी मिळवला आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर
प्रदेश या राज्यांना राज्य पुरस्कार मिळाला असून चंडीगड़ला केंद्र शासित प्रदेशांचा
पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येत्या २७ सप्टेंबर रोजी इंदूर इथं
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in
या नव्या रुपातल्या संकेतस्थळाचं आज अनावरण झालं. हे संकेतस्थळ
वापरकर्त्यांसाठी अधिक सोपं, तसंच अधिक सुलभ आहे. यावर प्रत्यक्ष कर कायदा, इतर
संलग्न कायदे,
आयकर विभागाची परिपत्रकं आणि दिशानिर्देश यांची माहिती एकाच
ठिकाणी मिळेल. विवरणपत्र भरण्यासाठीचे आवश्यक विविध स्त्रोतही संकेतस्थळावर उपलब्ध
आहेत.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव
कोहली यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. शंभराहून अधिक चित्रपटांसाठी
त्यांनी गीतलेखन केलं. लाल पत्थर, बाजीगर, हम आपके हैं कौन, मैंने
प्यार किया
आदी चित्रपटांमधील त्यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. त्यांच्या
पार्थिव देहावर आज सायंकाळी मुंबईत जोगेश्वरी इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
कांद्याला हंगामानुसार योग्य हमीभाव मिळण्यासाठी, तसंच
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर
प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या विंचूर उप-बाजार समितीला आज
भुजबळ यांनी भेट दिली,
त्यावेळी ते बोलत होते. कांद्यासाठी साडेतीनशे रूपये प्रति क्विंटल
अनुदान, दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलं जाईल, असही
भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, कांद्याच्या समस्येवर
कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी, व्यापारी
आणि बाजार समिती संचालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असं
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. कांदा चाळी वाढवण्याच्या दृष्टीनं
छोट्या कांदा चाळींनासुद्धा अनुदान देण्याचं प्रस्तावित असल्याचं महाजन यांनी म्हटलं
आहे
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नांदेड आणि
परभणीच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी साडेदहा वाजता नांदेड इथल्या विमानताळावर
त्यांचं आगमन होऊन ते हेलीकॉप्टरने परभणीकडे प्रस्थान करतील. परभणीत शासन आपल्या दारी
कार्यक्रमानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास नांदेडच्या विमानतळावरुन मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
****
'मन की बात' या आकाशवाणीवरच्या
कार्यक्रमातून,
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे चारावा भाग असेल. आकाशवाणी-दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण
केलं जाईल.
****
जायकवाडी धरणासह नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून
खरीप हंगामासाठी पाणी सोडण्याची शिफारस कालवा सल्लागार समितीने केली आहे. समितीची आज
औरंगाबाद इथं सिंचन भवनात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
पावसाची स्थिती पाहता,
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून दोन आवर्तनं देण्याची तसंच जायकवाडी
प्रकल्पातूनही पाणी देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. पावसाळ्याच्या उर्वरित काळात
पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहून पुढील आवर्तनांचा निर्णय घ्यावा, असंही
या बैठकीत सांगण्यात आलं.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील
भंडारदरा धरण काल पूर्ण क्षमतेनं भरलं असून ८२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरु करण्यात आला आहे,
भंडारदरा प्रकल्पाचे अभियंता अभिजीत देशमुख यांनी ही माहिती
दिली.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष समारोपानिमित्त संपूर्ण मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घ्यावेत आणि मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज या संदर्भात
बैठक झाली. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह
अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसंच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. या अंतर्गत
आरोग्य शिबिरं,
स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, राष्ट्रगीत, राज्यगीत
आणि मराठवाडा गीत गायन,
व्याख्यानमाला, काव्यवाचन, कवी
संमेलन, मराठवाडा मुक्तीसंग्राम माहितीपट सादरीकरण आदी उपक्रम राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
या उपक्रमांत शासकीय संस्था, विद्यापीठं, शैक्षणिक
संस्थांना सहभागी करावं. वृक्ष लागवड, पथनाट्य, हुतात्मा
स्मारकांसह सर्व शहरांमधील स्मृतीस्थळांचं सुशोभिकरण यांसारखे उपक्रम राबवण्याची सूचनाही
आयुक्तांनी केली.
****
जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत
विविध गावांसाठी नियुक्त १४ कृषी सहायकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. वर्ष-२०२२ मध्ये अतिवष्टीमुळं शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं नुकसान
झाल्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केलं होतं, महसूल
प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर
करण्याचे निर्देश कृषी सहायकांना दिले मात्र, वारंवार लेखी सूचना तसंच नोटीसा
बजावूनही १४ कृषी सहायकांनी १५ गावांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत
केल्या नाहीत. त्यामुळे संबंधीत शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. याची गंभीर दखल
घेत नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या कृषी सहायकांविरुध्द
तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
****
डेन्मार्कमध्ये कोपनहेगन इथं सुरु असलेल्या
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज भारताच्या एच.
एस. प्रणॉयचा सामना थायलंडच्या के. कुलनावूत व्हिटीड सर्न याच्यासोबत होणार आहे. प्रणॉयच्या
उपान्त्य फेरीतील पदार्पणातून भारताचं किमान एक पदक निश्चित झालं आहे. या स्पर्धेत
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचं आव्हान उपांत्यपूर्व
फेरीत संपुष्टात आलं आहे.
****
जालना शहरात एका नाल्यात आज दोन तरुणांचे
मृतदेह आढळले. आकाश पाटोळे आणि मुकेश पाखरे अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही काल
सायंकाळपासून घरी परतले नव्हते. आज दुपारी गांधीनगर भागातल्या मोठ्या नाल्यात त्यांचे
मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह पाण्यातून
बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वीज महावितरणच्या दौलताबाद
शाखेतील दहा जणांविरोधात १ लाख ६७ हजार १२१ रुपयांची विद्युत चोरी केल्याप्रकरणी गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. दौलताबाद शाखेचे सहायक अभियंता धनंजय बाणेदार आणि पथकानं वीजचोरीविरोधात
धडक मोहीम राबवून ही कारवाई केली.
****
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं औरंगाबाद
इथं जिल्हा ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं गुणवंत क्रीडापटूंचा सत्कार केला जाणार आहे.
उद्या सकाळी भानुदास चव्हाण सभागृहात होणाऱ्या या सत्कार
सोहळ्यात अर्जुन पुरस्कार विजेते पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या उपस्थितीत साडे तीनशे
क्रीडापटूंना गौरवलं जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment