Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य
एल-वन, या निरीक्षक उपग्रहाचं दोन सप्टेंबरला प्रक्षेपण
·
खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा
दिन म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान;मराठवाड्यातल्या
नऊ खेळाडूंचा गौरव
·
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत
३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी बैठक
·
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीचा मदतनिधी
बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू
·
दहावी-बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक
जाहीर
आणि
·
मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त मराठवाड्याच्या
प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचे
निर्देश
सविस्तर
बातम्या
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी
आदित्य एल-वन,
या पहिल्या
भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या दोन सप्टेंबरला प्रक्षेपण होणार आहे. आंध्रप्रदेशातल्या
श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ स्थानकावरून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी हे प्रक्षेपण केलं
जाईल, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था
- इसरोनं काल ट्विट संदेशाच्या माध्यमातून सांगितलं.
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख
किलोमीटर अंतरावर असलेल्या,
एल-वन लॅग्रेंज
बिंदूच्या भोवती प्रभामंडळ कक्षेत हा उपग्रह सोडला जाईल. तिथपर्यंत पोचायला त्याला
चार महिने लागतील. या कक्षेमुळे आदित्य एल -वन ला अवकाशातल्या ग्रहणासारख्या कोणत्याही
घडामोडींचा अडथळा न येता सौर घडामोडींचं निरीक्षण करणं शक्य होईल. सौर वारे आणि सूर्याच्या
वातावरणाचा अभ्यासही हा उपग्रह करणार आहे. फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर, तसंच कोरोना या सूर्याच्या बाह्यस्तराचं निरीक्षण करण्यासाठी
आदित्य एल-वन वर सात पेलोड्स असतील,
असं इस्रोनं
दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
****
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू
खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची
घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यातल्या बालेवाडी इथं काल शिवछत्रपती
राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
महाराष्ट्रातल्या मातीतला हा सुपुत्र ऑलिम्पिक वीर स्वर्गीय
खाशाबा जाधव
ज्यांनी १९५२ मधे हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं,
त्यांचा जन्म दिन १५ जानेवारी आहे. १५ जानेवारी हा दिन महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा
दिन म्हणून मी या ठिकाणी घोषीत करतो.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची रक्कम तीन लाखांवरून
वाढवून, पाच लाख रुपये केल्याची घोषणाही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यातल्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये चांगलं यश मिळावं, यासाठी सर्व सहकार्य करू, खेळाडूंनी राज्याचा लौकीक आंतरराष्ट्रीय
पातळीवर असाच उंचवावा,
असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय
बनसोडे यावेळी उपस्थित होते.
भारत २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं
यजमानपद भूषविण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करत असून, राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारात आपली बलस्थानं आणि
कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
२०१९-२०, २०-२१ आणि २१-२२ या तीन वर्षांसाठीचे
विविध पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये औरंगाबाद इथले जिम्नॅस्ट
मार्गदर्शक आदित्य जोशी,
जिम्नॅस्ट
सिद्धार्थ कदम,
ऋग्वेद जोशी, तलवारबाजीत वैदेही लोहिया, अभय शिंदे आणि त्यांचे मार्गदर्शक
विनय साबळे, बीड इथल्या कुस्तीपटू सोनाली
तोडकर, उस्मानबाद इथल्या आट्यापाटा
खेळाडू शीतल ओव्हळ आणि शीतल शिंदे या नऊ जणांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या दुष्काळग्रस्त
भागांना पाणी पुरवणाऱ्या प्रकल्पांना केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली आहे. ते काल गुजरातमधे गांधीनगर इथं, पश्चिम विभागीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय
गृह आणि सहकार मंत्री अमित शहा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. नदी जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड, आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणाऱ्या
पाण्याचा योग्य वापर,
यासाठी केंद्राकडून
मदत हवी, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रांची
संख्या वाढवावी,
तसंच मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पायाभूत सुविधा, खनीकर्म, पाणीपुरवठा, पर्यावरण आणि वन, तसंच विभागीय आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या
इतर मुद्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री, तसंच दादरा - नगर हवेली, आणि दमण - दीव या केंद्रशासित प्रदेशांचे
प्रशासक उपस्थित होते.
****
महाराष्ट्र विदेशी प्रत्यक्ष
गुंतवणुकीमध्ये पहिल्या पसंतीचं राज्य ठरलं असून, राज्यात गुंतवणूक वाढत असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सांगितलं आहे. ते काल रात्री नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. २०२२-२३ या आर्थिक
वर्षांत एक लाख १८ हजार कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर
असलेला महाराष्ट्र,
२०२३-२४
या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर असल्याचं फडणवीस
यांनी सांगितलं.
****
विविध आजारांचं वाढतं प्रमाण
तसंच वाढती व्यसनाधीनता या पार्श्वभूमीवर योगविद्येचा प्रसार अधिक महत्त्वाचा असल्याचं, राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे.
ते काल लोणावळा इथं,
कैवल्यधाम
योगसंस्थेच्या,
‘स्वामी कुवलयानंद
योग पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, आणि स्वामी रित्वन भारती यांना राज्यपालांच्या
हस्ते कुवलयानंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची
तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या
बोधचिन्हाचं अनावरण केलं जाईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले
यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएमधले काही पक्षही इंडिया आघाडीत
सहभागी होऊ शकतात,
असं त्यांनी
सांगितलं.
****
राज्यात गेल्या तीन वर्षांपासून
रखडलेली आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असून, १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार
असल्याचं आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गात विविध ६० प्रकारच्या पदांचा समावेश आहे. ही संपूर्ण
भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस - टीसीएस मार्फत राबवली जाणार असल्याचं, सावंत यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या तीन लाख शेतकऱ्यांसाठी
मदतीचा २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी,
शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली. मदत आणि पुनर्वसन मंत्री
अनिल पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून, निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली. गेल्या पावसाळी हंगामात
सततच्या पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शासनानं विशेष बाब म्हणून, पंधराशे कोटी रुपये निधी मंजूर केला
आहे. ई - केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया
सुरु झाली आहे. पुढील शुक्रवारपर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १७८
कोटी २५ लाख रुपये इतका निधी जमा केला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी तसंच दहावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक
जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान तर दहावीची
परीक्षा एक ते २२ मार्चदरम्यान होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक
जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा
निकाल काल जाहीर झाला. बारावीचा निकाल ३२ पूर्णांक १३ शतांश टक्के, तर दहावीचा निकाल २९ पूर्णांक ८६
शतांश टक्के लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी काल ही माहिती
दिली.
****
मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त
मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करून, मुक्तीसंग्रामाची माहिती सर्वांपर्यंत
पोहोचवावी, असे निर्देश, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी दिले आहेत. मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा काल
मुंबईत आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुक्तीसंग्राम केंद्रभागी ठेवून विविध
स्पर्धा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम
तसंच माहितीपट तयार करण्याची सूचना,
मुनगंटीवार
यांनी केली. मुक्तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होता यावं
यासाठी २६ जानेवारी पर्यंत मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये, प्रभातफेरी, व्याख्याने, विविध गटांच्या मॅरेथॉन स्पर्धा, लोककला, चित्रकला, निबंधस्पर्धा, महानाट्य स्पर्धा, प्रबोधनकार-कीर्तनकार परिषद, आदी कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना
त्यांनी केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारण्यासंदर्भातही मुनगंटीवार यांनी
उपयुक्त सूचना केल्या.
****
सांस्कृतिक कार्य विभागाच्या
वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय, सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार
यांनी जाहीर केला आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कारांच्या निवड समित्यांची बैठक काल मुंबईत
झाली, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली.
विभागाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या विविध जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने, तर राज्य सांस्कृतिक कार्य पुरस्कारांच्या
रकमेत तिपटीने वाढ करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं आपल्या
शाळेतल्या विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिक या खेळाचं विनाशुल्क प्रशिक्षण देण्याचा निर्णय
घेतला आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या निर्णयावर, आज राष्ट्रीय क्रीडा दिनापासून अंमलबजावणी
केली जाणार आहे. जिम्नॅस्टिक या प्रकारात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी
कॅच देम यंग,
या नावाने
अनोखं अभियान औरंगाबाद महापालिका सुरू करत आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार
प्राप्त खेळाडू या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या ४९ महसूल
मंडळांपैकी ३३ महसूल मंडळांमध्ये,
पावसात २७
दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे खरीपातल्या सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला
आहे. वाढीच्या अवस्थेत असलेली मका,
बाजरी, तूर ही पिकंही पावसाअभावी सुकू लागली
आहे. जिल्ह्यातल्या लघू आणि मध्यम प्रकल्पांमधल्या जलसाठ्यात घट झाली असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कृषी विभागाला पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल
सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३३
महसूल मंडळात पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत पंचवीस
टक्के अग्रीम विमा देण्यासाठी ही महसूल मंडळं पात्र झाली आहेत. उर्वरित २४ महसूल मंडळात
२८ ऑगस्टपर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे, तसंच ऑगस्टमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे, अग्रीम विम्यासाठी पंचनामे सुरू करण्यासाठी
शासनाने परवानगी द्यावी,
अशी मागणी, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे
यांनी शासनाकडे केली आहे.
****
महिला आयोग आपल्या दारी या
उपक्रमांतर्गत,
राज्यातल्या
२८ जिल्ह्यात जवळपास १८ हजार प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून दिला असल्याचं, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर
यांनी सांगितलं आहे. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत, काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात
घेतलेल्या जनसुनावणीत,
त्या बोलत
होत्या. महिलांच्या न्यायासाठी शासनानी केलेले कायदे महिलांपर्यंत पोहोचावेत, महिलांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न
करावा, असंही चाकणकर म्हणाल्या. लातूर
इथं काल ९३ प्रकरणं दाखल झाली. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेवून
निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
****
भारतीय महिला हॉकी संघानं आशियाई
हॉकी फाईव्ह एस विश्वचषक पात्रता स्पर्धा जिंकली आहे. ओमान मधल्या सलालाह इथं काल झालेल्या
अंतिम सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा सात - दोन असा पराभव केला. हॉकी विश्वचषक स्पर्धा
पुढच्या वर्षी होणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या हर्सूल कारागृहात
काही कैद्यांनी एकत्र येऊन तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना
मारहाण केली. कारागृहातलं पथक कैद्यांची झडती घेत असताना हा हल्ला करण्यात आला. या
प्रकरणी ९ कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं
नागनाथ ज्योर्तिलिंगाचं दर्शन घेण्यासाठी काल दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी प्रचंड
गर्दी केली होती. कावड पताका घेऊन आलेल्या भाविकांनी रात्रीपासूनच मंदिराबाहेर रांगा
लावल्या होत्या. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
****
औरंगाबाद इथल्या आदर्श पतसंस्थेत
घोटाळा करणाऱ्या आरोपींना जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ, ठेवीदारांसह खासदार इम्तियाज जलिल
यांनी, काल जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था कार्यालयासमोर,
थाळीनाद
आंदोलन केलं. येत्या दोन दिवसात पोलिस महासंचालकांची भेट घेऊन या घोटाळ्याची चौकशी
विशेष पथकामार्फत करण्याची मागणी करणार असल्याचं, खासदार जलिल यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वीज महावितरणच्या
बिडकीन इथल्या ३३ केव्ही उपकेंद्राला आय एस ओ 9001 : 2015 हे मानांकन मिळालं आहे. असं
मानांकन मिळवणारं हे मराठवाड्यातलं पहिलं तर राज्यातलं दुसरं केंद्र आहे.
****
No comments:
Post a Comment