Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 August 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ ऑगस्ट
२०२३ दुपारी १.०० वा.
****
प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आज राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून
साजरी केली जात आहे. यानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते
नवी दिल्लीत भारतीय खेळांबाबतच्या नव्या उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे.
ठाकुर यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. भारताला क्रीडा ऊर्जा केंद्र बनवण्याबरोबरच क्रीडा
क्षेत्रात यापुढेही नवी उंची गाठण्यासाठी वचनबद्ध राहण्याचं, आवाहन
त्यांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करुन, क्रिडा
दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रानं क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भुमिका नेहमीच घेतली
असून, स्वतंत्र क्रीडा धोरण आखणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं पवार यांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
जनगणना कायदा १९४८ नुसार केवळ केंद्र सरकारला जनगणना करण्याचा अधिकार असल्याचं
केंद्र सरकारने काल सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. केंद्र सरकार वगळता इतर कोणत्याही
संस्थेला जनगणना किंवा जनगणनेसारखी कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार नाही, असं सरकारने
न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींनुसार
अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या प्रगतीसाठी सर्व सकारात्मक कृती करण्यास केंद्र
बांधील आहे. बिहार सरकारनं दिलेल्या जात सर्वेक्षणाचा आदेश कायम ठेवणाऱ्या पाटणा उच्च
न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सुरू आहे. पाटणा उच्च न्यायालयानं सहा जून २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे जात-आधारित
सर्वेक्षणाचा आदेश देण्याचा अधिकार बिहार राज्याकडे नसल्याची वस्तुस्थिती विचरात घेता त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याचं एका याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे.
****
नवी दिल्लीत पुढच्या महिन्यात नऊ आणि दहा तारखेला होणाऱ्या जी-20 शिखर
परिषदेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीबाबत योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याचं
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था - एम्सच्या
रुग्णालयात तसंच आर एम एल रुग्णालयात उपचार आणि अनुषंगिक व्यवस्था करण्यात आली आहे.
परिषदेचं स्थळ; तसंच परदेशी प्रतिनिधी राहत असलेल्या हॉटेल्सच्या जवळ एकंदर पन्नास रुग्णवाहिका
आणि वैद्यकीय पथकं तैनात करण्यात येणार आहेत. परिषदेच्या स्थळाजवळ अतिदक्षता विभागाचीही
स्थापना करण्यात येणार आहे.
****
नवी दिल्लीच्या अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण संसदीय समितीनं काल मुंबईत
इंदू मिल इथं साकार होत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारकाला भेट
देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सदस्यांनी स्मारकाला भेट देण्यापूर्वी चैत्यभूमीला
भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन केलं. प्राध्यापक किरीट
सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या ३० सदस्यीय समितीला बृहन्मुंबई महानगर
विकास प्राधीकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केलं. समितीच्या
सदस्यांनी स्मारकाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, यासाठी
संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्व मोठे, मध्यम, तसंच लघू प्रकल्प, साठवण तलाव, आणि कोल्हापुरी बंधारे यामध्ये सुमारे १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे
विभाग प्रमुखांनी हा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला आहे. या प्रकल्पातून अनाधिकृतपणे
पाणी उपसा होवू नये यासाठी सर्व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय महसूल मंडळ
निहाय भरारी पथक गठीत करण्यात आलं आहे. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांविरुध्द कारवाईचे आदेश
देण्यात आले आहेत.
***
नांदेड इथल्या जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातल्या अंगणवाडी मदतनीसांची
रिक्त पदं सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. भरतीसंदर्भात पात्र अपात्र उमेदवारांना
प्रसिद्ध यादीबाबत काही आक्षेप असल्यास ११ सप्टेंबर पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी
कार्यालयात लेखी पुराव्यासह अर्ज सादर करावेत, असं आवाहन प्रकल्प अधिकारी व्ही.एस. बोराटे यांनी केलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ
डॉ प्रभाकर देव यांचं नांदेड जिल्ह्यात उमरी इथं येत्या एक सप्टेंबर रोजी विशेष व्याख्यान
आयोजित करण्यात आलं आहे. ‘उमरी बँक ॲक्शन आणि लढा स्वातंत्र्याचा’ या विषयावर ते बोलणार आहेत. हा कार्यक्रम उमरी नगर परिषदेच्या गिरीशभाऊ गोरठेकर
सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
****
No comments:
Post a Comment