Wednesday, 30 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      बहीण-भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा.

·      पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

·      राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणण्याचं सरकारच्या विचाराधीन.

आणि

·      लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं उद्योग मंत्र्यांचं आश्वासन.

****

बहीण-भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आकर्षक राख्यांनी बाजारपेठा आणि दुकाने सजली आहेत. यंदा पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रक्षाबंधन उत्सवा निमित्त, देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधनाचा उत्सव हा बंधू-भगिनींना बांधून ठेवणारा असून, परस्पर विश्वास आणि बांधिलकीवर टिकणारं हे नातं असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनातला स्नेहभाव आणि सौहार्दाची भावना, या सणाच्या निमित्ताने वृध्दिंगत होवो”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नारळी पौर्णिमेचा सणही आज कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करत आहेत. समुद्राची कृतज्ञता म्हणून, कोळी समाजाकडून या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याचा प्रघात आहे

****

विश्वसंस्कृतदिनम् अर्थात जागतिक संस्कृत दिवस आज साजरा केला जात आहे. 'भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती' असं जिचं वर्णन केलं जातं, त्या देववाणी संस्कृतच्या सन्मानार्थ आणि प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो. मध्यंतरीच्या काळात संस्कृत अध्ययनाचं प्रमाण काहीसं मंदावलेलं असलं, तरी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने संस्कृत भाषाभ्यासाला नवीन गती मिळणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वसुंधरा प्रतिष्ठानच्या उपक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी पिंपळाच्या झाडाला राखी बांधून वृक्षांचं संवर्धन करण्याचा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला. आपण वृक्षारोपण करतो, तसंच मानव आणि निसर्ग यांच्यातलं नातं दृढ होण्यासाठी वृक्षसंवर्धन उपक्रम ही काळाची गरज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना व्यसनापासून मुक्त करावं, यासाठी राज्य नशा बंदी मंडळाचे जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन आज राखी बांधली. जिल्ह्याला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना राखी बांधल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. पूर्वी बहीण भावाला संकट काळी माझे संरक्षण कर म्हणून, राखी बांधत असे. आता महिला सक्षमीकरण झाले आहे. आता ज्या समस्या आहेत त्यांचं निर्मूलन करण्यासाठी रक्षाबंधन करण्याची आवश्यकता बनसोडे यांनी व्यक्त केली.

****

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नॅशनल वेटलॅण्ड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचे सर्वेक्षण केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करावे. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आज मुंबईत महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या पाचव्या बैठकीत बोलत होते. देशात एकूण ७५ रामसर क्षेत्र असून त्यापैकी महाराष्ट्रात नांदूर - मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी या तीन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात सुमारे सव्वा दोन हेक्टर क्षेत्रात २३ हजार पाणथळ जागा असून त्यांचे सर्वेक्षण मान्यता प्राप्त संस्थेकडून करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देत आपल्या जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती संबंधित संस्थेच्या मदतीने वर्षभरात संकलित करावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

संविधानाचं रक्षण या एकमेव उद्दिष्टासाठी आपण एकत्र आल्याचं, इंडिया आघाडीचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीच्या पुर्वसंध्येला ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, केंद्र आणि राज्य सरकार कुठे आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नसून, आघाडीचा सामुहिक कार्यक्रम काय असावा याबाबत मुंबईच्या बैठकीत चर्चा होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं.

****

राज्यात या महिन्याअखेर पर्यंत सरासरीच्या २९% इतका पाऊस ठराविक ठिकाणी झाला असून चालू परिस्थितीत ३२९ महसुली मंडळात, पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे, त्यामुळे राज्यासमोर दुष्काळाचं संकट ओढवलं आहे. या परिस्थितीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

****

राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचं विचाराधीन असल्याचं, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं आहे. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांची रोपं येत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, मासोद या पाच ठिकाणी सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सीट्रस इस्टेट उभारण्याबाबत आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करुन द्यावं, कालमर्यादेत हे काम पूर्ण करावं, असे निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

****

लातूरसह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या औद्योगिरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सामंत यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी सामंत बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी विकासासाठी अत्यावश्यक असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करून विमानतळावरची उर्वरित कामं त्वरीत पूर्ण करण्यात येतील असं आश्वासनही सामंत यांनी दिलं.

****

पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथं आज एका हार्डवेअरच्या दुकानात आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे चारही जण एकाच कुटूंबातले असून, राजस्थानातल्या पाली इथले रहिवासी असल्याचं समजतं. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

****

शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील परळी इथं येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीबाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्यांच्या अनुषंगाने संबधित विभागांना करावयाच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

****.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून, जिल्ह्यातील मध्यम, लघु अशा सर्व पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार यंत्रणेच्या कार्यक्षेत्रातले सर्व पाणी साठे आरक्षित करण्यात आले आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात या महिन्यात पावसाने गैरहजेरी लावली असल्यानं, खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे तातडीने गावनिहाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतील पहिल्या टप्यात २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं औरंगाबाद इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत.  या पार्श्वभूमीवर आज बँकेच्या खातेधारकांनी आपल्या ठेवी परत घेण्यासाठी बँकेत एकच गर्दी केल्याचं दिसून आलं.

****

No comments: