Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑगस्ट
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे
यांचे निर्देश.
· कष्टकरी आणि शेतकरी हिताच्या आड येणाऱ्याला आपला पाठींबा नाही - खासदार शरद पवार.
· लातूर जिल्ह्यात लिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश.
आणि
· उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याचं उद्घाटन.
****
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे
सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रशासनास दिले
आहेत. ते आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या पंचनाम्यांसाठी कृषी, महसूल
त्याचबरोबर पिक विमा कंपनीलाही सोबत घ्या, असे निर्देश मुंडे यांनी दिले.
या बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल
पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आरोग्य
मंत्री तानाजी सावंत,
बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार
हमी मंत्री संदिपान भुमरे,
आमदार सतिश चव्हाण, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय
आयुक्त मधुकर राजे आर्दड,
सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे
यांनी, दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरि मदत करेल, अशी
ग्वाही दिली. विभागात पिण्याचं पाणी तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहणार नाही, यासाठी
उपाययोजना हाती घेणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले -
आहे ही परिस्थिती खरंच भयावह
आहे. आपण एकटे नाहीत तर हे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहे. माझ्या मराठवाड्यातील
शेतकरी बांधवांना आणि भगिनींना याठिकाणी विनंती करतो की, अशा संकटाच्या काळात शासन
सर्वतोपरी तुमच्या पाठीमागे आहे. गरज पडली तर वाट्टेल तेवढे पैस खर्च करील पण या सगळ्या
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणाने उभं राहील. आठवड्याला एक बैठक आम्ही कृषी
विभागाचा मंत्री या नात्याने घेणार आहे.
दुष्काळी स्थितीसाठी पावसाचा सलग २१ दिवसांचा
खंडकाळ ग्राह्य धरला जाईल,
यासाठी प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं
कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितलं. शेती कर्जाची वसुली दुष्काळी काळात थांबवावी, अशी
मागणी मंत्रिमंडळ बैठकीत करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. मराठवाड्यातले
सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच औरंगाबाद इथं
मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी
दिली.
****
राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेडची
कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी
ही माहिती दिली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
छगन भुजबळ यांनी कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी गोयल यांच्याकडे केली, त्यावर
गोयल यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उप्तादक शेतकऱ्यांना मोठा
दिलासा मिळाला असल्याचं,
भुजबळ यांनी म्हटलं आहे.
****
मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी
स्थापन समितीच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. या समितीत सागरी जिल्ह्यांतील तसेच भूजलाशयीन जिल्ह्यातले प्रत्येकी
दोन विधानसभा सदस्य आणि एक विधानपरिषद सदस्यांच्या नावांचा समिती सदस्य म्हणून समावेश
करण्यात आला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्य व्यवसाय विकास धोरण तयार होत असून
मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे.
****
कष्टकरी आणि शेतकरी हिताच्या आड येणाऱ्याला
आमचा पाठींबा असणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी
म्हटलं आहे. आज सातारा जिल्ह्यात दहिवडी इथं एका शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी
हितासाठी एकत्र येऊन संघर्ष करण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. जनतेच्या प्रश्नांकडे
केंद्र सरकारचे लक्ष नसून त्याविरोधात एकजुटीनं उभं राहणे
आवश्यक असल्याचं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर सिंधुदुर्ग
इथल्या चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा १ सप्टेंबर पासून नियमित
सुरु करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज यासंदर्भात
झालेल्या बैठकीत दिली. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री
ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट दिल्ली इथं भेट घेतली होती. एअर अलांयन्स आणि इंडीगो
या दोन विमान कंपन्यांमार्फत ही विमान सेवा दर आठवड्याला सुरु करण्याचे निर्देश देण्यात
येणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.
****
'मेरी माटी मेरा देश'
अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे
कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या हस्ते घोरवड इथल्या प्रगाय तीर्थ याठिकाणी वृक्षारोपण
करण्यात आलं तसंच हुतात्मा स्मारकाचे अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात हुतात्मा
सैनिकांच्या कुटूंबीयांचा तसंच सैनिकांचा सत्कारही करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात लिंग निदान प्रतिबंध कायद्याची
प्रभावी अंमलबजावणी करावी आणि जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या भागात संशयित सोनोग्राफी
केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी दिल्या. त्या आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत जिल्ह्यातल्या सर्व
शासकिय कार्यालये,
निमशासकिय कार्यालये आणि सर्व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त ठेवण्याच्या
सूचना दिल्या.
****
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात आज राष्ट्रीय
नेत्रदान पंधरवाड्याचं उद्घाटन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता
डॉ.शिल्पा दोमकुंडवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आर.व्हि.गलांडे यांच्या हस्ते या
कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. नागरिकांमध्ये मरणोत्तर धार्मिक विधीप्रमाणेच मृत
व्यक्तीचे नेत्रदान करण्याबाबतचा वैज्ञानिक विधी रुजवणे आवश्यक असल्याचं मत दोमकुंडवार
यांनी यावेळी व्यक्त केलं. नेत्रदानाच्या चळवळीत सामाजिक संस्था आणि नागरिकांनी स्वेच्छेनं
पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आर.व्हि.गलांडे
यांनी जिल्ह्यातच नेत्रपेढी आणि प्रत्यारोपण केंद्र कार्यान्वित होणं गरजेचं असून त्याबाबतचा
प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले.
****
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती
मताची "व्हाईस ऑफ वोट" या
अंतर्गत जाहिरात निर्मित ध्वनिचित्रफित, भित्तीपत्रक आणि घोषवाक्य या
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालय तसंच
सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं
आवाहन बीड उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज
मंजूर झाले आहेत. परंतु शासनाकडून शिष्यवृत्ती प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे
मूळ शैक्षणिक कागदपत्रांसाठी महाविद्यालयाकडून अडवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास
आले आहे. तरी महाविद्यालयांनी अडवणूक न करता विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे
उपलब्ध करून द्यावेत,
असं आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी
केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बालाजी सरोवर इथं
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते चाळीस शाळांना विविध शालेय साहित्याचं
वाटप करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्या २५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५ शाळांना
पाचशे बाकं,
वीस संगणक, प्रोजेक्टर, डिजिटल
यंत्रणा अशा साहित्याचं वाटप यावेळी ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
आज हिंगोली इथं एकता दौड स्पर्धा घेण्यात
आली. सामाजिक शांतता,
सद्भावनेचा संदेश देण्यासाठी आणि खेळाप्रती समाजात आवड निर्माण
व्हावी या उद्देशानं पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात
आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडा दाखवण्यात
आला.
****
No comments:
Post a Comment