Tuesday, 29 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      घरगुती वापराच्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपये कपात.

·      पूर्णपणे इथॅनॉलवर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या कारचं नवी दिल्लीत अनावरण.

·      एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारकावरच्या पाठाचा समावेश.

आणि

·      औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जिम्नॅस्टिकच्या मोफत प्रशिक्षणाला प्रारंभ.

****

घरगुती वापराच्या गॅसच्या सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपयांनी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या दरकपातीला मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही या निर्णयाबाबत अधिक माहिती दिली. ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेतल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. ते म्हणाले -

आज जब ओणम और रक्षाबंधन का त्यौहार है, तो मुझे कहते हुये प्रसन्नता है, की एक बार देश की लाखो बहनों के लिए फिर प्रधानमंत्री मोदीजी ने बडा तोहफा दिया है की पचहत्तर लाख बहनों के लिये, उज्वला गॅस योजना के अंतर्गत उनको गॅस कनेक्शन मिलेंगे। उनको एक रूपया भी नही देना पडेगा। प्रधानमंत्री मोदीजी ने निर्णय लिया है, की दो सौ रूपया गॅस सिलेंडर के दाम कम किये जायेंगे। सभी उपभोक्ताओं के लिये दो सौ रूपये दाम कम होंगे।

गॅस सिलिंडर दर कपातीच्या या निर्णयाचा लाभ देशभरातल्या सगळ्या गॅसधारकांना मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचाहत्तर लाख महिलांना नवीन गॅस जोडण्या देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, चांद्रयान तीन च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आलं.

****

केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी, पूर्णपणे इथॅनॉलवर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या कारचं आज अनावरण केलं. नवी दिल्लीमध्ये हा कार्यक्रम झाला. भारत स्टेज मानकांसहित फ्लेक्स फ्युएल म्हणजे मिश्रित पेट्रोलवर तसंच विजेवर चालणारं वाहन तयार करून देशानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे, असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. देशाला स्वयंपूर्ण व्ह्यायचं असेल तर इंधन तेलाची आयात शून्यावर आणण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. एकूण प्रदूषणाचा चाळीस टक्के भाग हा वाहतुकीमुळे निर्माण होतो, प्रदूषण कमी करण्यासाठी अशा गाड्यांची आवश्यकता असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात यावर्षीपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकावरचा एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. 'अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स', अर्थात, शूर सैनिकांना आदरांजली, असं या धड्याचं नाव आहे. संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयानं संयुक्तपणे हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि त्याग ही मूल्यं रुजवणं आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणं, हा आहे. या धड्यामध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा इतिहास, महत्त्व आणि संकल्पना यावर प्रकाश टाकण्यात आला असून, सशस्त्र दलातल्या वीरांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या सेवेत दिलेल्या सर्वोच्च बलिदानाविषयी यात माहिती देण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या या आढावा बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार असल्याचं लाड यांनी सांगितलं.

****

मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधांसोबत आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेता यावं, यासंदर्भात नीती आयोगासमवेत बैठक झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक स्वतंत्र पथक यासाठी नेमण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. मुंबईचा जी हब मध्ये समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले. यामुळे मुंबईतमध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

उद्या राखी पौर्णिमेचा सण साजरा होणार आहे. या निमित्तानं विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या असून, यंदा पर्यावरणस्नेही राख्यांची संख्या लक्षणीय आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या निरक्षर महिलांनी बांबूपासून पर्यावरणस्नेही राख्या बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन यावर्षी सुमारे अठ्ठेचाळीस हजार राख्या तयार केल्या आहेत. यातल्या साडेअकरा हजार राख्या पालघरमधून लडाख, सियाचीन, कच्छ तसंच भुजमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना पाठवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद मधल्या महानगरपालिका शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या विनाशुल्क जिम्नॅस्टिक प्रशिक्षणाचा आज शुभारंभ झाला. मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून सुरू झालेल्या कॅच देम यंग अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नारेगाव इथल्या पालिका शाळेत आज जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला. महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडून येईल आणि खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.

****

कावड यात्रेत जनसमुदायासमोर हातात तलवार घेऊन ती फिरवल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतल्या ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत काल आमदार बांगर यांनी हाता तलवार घेऊन हवेत फिरवली होती. तसंच डीजे लावण्यास प्रतिबंध केलेला असतानाही या यात्रेत डीजे लावल्याबद्दल डीजेचालक रवी शेषराव धुळे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं किंवा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यात यावी, या आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातल्या शहागड चौफुली इथे आज मराठा समाजाच्यावतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या मराठा समाजबांधवांसह महिला आणि मुली मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय होत नसून, समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं आणि राष्ट्रगीतानं या मोर्चाची सांगता झाली, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबादमधल्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणनं तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून, या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केलं आहे. गणेश मंडळांनी मंडपात वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही महावितरणनं केलं आहे.

****

जालना महानगरपालिकेतल्या नदीम अब्दुल रहेमान चौधरी या कनिष्ठ लिपिकाला आठशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराचा महापालिकेच्या रिव्हिजन रजिस्टरमधला उतारा देण्यासाठी चौधरीनं एक हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

No comments: