Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 25 August 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ ऑगस्ट
२०२३ दुपारी १.०० वा.
****
सर्व खरेदीसाठी बिले मागणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार
‘मेरा बिल मेरा अधिकार’ या नावाने ‘चालान प्रोत्साहन योजना’ सुरू करत आहे. ही योजना राज्य सरकारांच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. या
योजनेअंतर्गत प्रत्येक तिमाहीत एक कोटी रुपयांचे दोन बंपर पुरस्कार दिले जातील. कमीत
कमी २०० रुपयांची बिलं ‘मेरा बिल मेरा अधिकार’ या मोबाइल अॅपवर किंवा वेब डॉट मेरा बिल डॉट जीएसटी डॉट जीओव्ही डॉट इन या
वेब पोर्टलवर अपलोड करता येतील. प्रायोगिक तत्वावर ही योजना पुदुच्चेरी, दादरा
नगर हवेली, दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशांसह आसाम, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये एक सप्टेंबर पासून राबवली जाणार आहे.
****
कांद्याच्या प्रश्नावर शेतकर्यांचं समाधान होईल, असा तोडगा
काढण्याचं आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी
सुरु असून, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून थेट बाजारात जाऊन कांद्याची करावी, अशी मागणी
केंद्राकडे केल्याचं मुंडे यांनी सांगितलं. मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून, आज यासंदर्भात
बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
परभणी इथं येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन
आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापिठाच्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमातून जिल्ह्यातल्या
किमान ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी
रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थापत्यांची
माहिती देणारं प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या
सर्व नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर आणि धरणगाव या सात तालुक्यातल्या ७८ ठिकाणी, जनावरांमध्ये
सांसर्गिक लम्पी आजाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या तालुक्यातले सर्व जनावरांचे
आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात इतर राज्यामधून पशुधनाची होणारी
वाहतुक बंद ठेवण्यात आली असून, जिल्हा पोलिस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग आंतरराज्य सीमेवर तपासणी
करत आहे. पशुपालकांनी लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून २८ दिवस पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र
सादर केल्यास वाहतुकीस परवानगी मिळेल, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यातल्या येरली इथल्या आदिवासी आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना
जेवणानंतर विषबाधा झाली. काल रात्रीच्या जेवणानंतर सुमारे ३६ विद्यार्थ्यांचा उलटी, मळमळीचा
त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती
स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या २८ ऑगस्ट रोजी लातूर इथं 'महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तक्रारींची जनसुनावणी करण्यात येणार
आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार
असून, अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असं आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी केलं आहे.
****
डेन्मार्कमध्ये कोपनहेगन इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरष
एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉयनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या
सामन्यात प्रणॉयनं सिंगापूरच्या खेळाडुचा २१-१८, १५-२१, २१-१९ असा पराभव केला. लक्ष्य सेनेला मात्र उप - उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा
सामना करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनंही
इंडोनेशियाच्या जोडीचा २१-१५, १९-२१, २१-९ असा पराभव करत, उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. महिला दुहेरीत मात्र त्रिसा जॉली आणि गायत्री
गोपीचंद या भारतीय जोडीला चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
****
हंगेरीमधल्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत
आज भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पात्रता फेरी खेळणार आहे. मनु डीपी
आणि किशोर जेना हे देखील पात्रता फेरीतले सामने खेळणार आहेत. पात्रता फेरीतल्या अव्वल
१२ खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळेल, अंतिम सामना २७ ऑगस्टला होणार आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त
केली आहे.
****
No comments:
Post a Comment