Thursday, 31 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.08.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

महेंद्रगिरी या युद्धनौकेचं उद्या मुंबईत जलावतरण करण्यात येणार आहे. याची निर्मिती मुंबईतल्या माजगाव गोदीत करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे जलावतरण करण्यात येईल. भारतीय नौदलाच्या विशेष प्रकल्पा अंतर्गत निर्मीत ही सातवी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत युद्धनौका आहे.

****

येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशमंडळांना पुरस्कृत करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. या पुरस्कारांसाठी मुंबई, मुंबई उपनगरीय क्षेत्र, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून प्रत्येकी तीन तर इतर जिल्ह्यांमधून प्रत्येकी एका गणेशमंडळाची निवड करण्यात येणार आहे. यात प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, द्वितीय अडीच लाख रुपये तर तृतीय पुरस्कार एक लाख रुपयांचा असेल. अन्य ४१ गणेशमंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

****

दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंही प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून अमिट चिन्ह प्रस्थापित केलं असल्याचं मंत्रालयानं आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मिरमधून गेल्या एक जुलै पासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा ६२ दिवसांनंतर आज संपत आहे. देशाच्या विविध भागांमधून आलेल्या जवळपास साडे चार लाख भाविकांनी या ६२ दिवसांच्या कालावधीत अमरनाथ मंदिरात बर्फ शिवलिंगाचं दर्शन घेतलं.

****

कृत्रीम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजंस `ए आय` या विषयावरचं पहिलं जागतिक संमेलन भारतात येत्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित केलं जाणार आहे. इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या संदर्भातली माहिती दिली. या शिखर संमेलनात कृत्रीम बुद्धीमत्तेची पुढील पिढीसाठी उपयुक्तता आणि प्रयोग यावर चर्चा होणार आहे. या तंत्रज्ञानामुळं शिक्षण, आरोग्य सेवा, प्रशासन, इलेक्ट्रीक वाहन आणि आधुनिक संगणक या क्षेत्रांमध्ये परिवर्तनकारी बदल अपेक्षित आहेत. एआय क्षेत्रातले प्रमुख विशेषज्ञ, संधोधक, स्टार्ट अप आणि गुंतवणुकदार यात सहभागी होणार आहेत.

****

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला वाचवण्यासाठी राज्य सरकार हमी देणार आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांचा तोटा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वाचवण्यासाठी या बँकेनच कृती आराखडा तयार करावा असे आदेश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. भाग भांडवल वाढण्यासाठी प्रसंगी राज्य सरकार हमी देखील देईल असंही त्यांनी सांगितलं. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला परवाना रद्द करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नोटीस बजावली असून त्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये सहकार मंत्री पाटील यांनी या सूचना केल्या. या बँकेवर किमान पाच वर्ष प्रशासक ठेवावेत आणि थकबाकीदारांकडून कठोर वसुली करावी अशी सूचना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत केली.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम आदिवासी भागातलं गाव म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यातल्या पळसुंदे गावच्या ग्रामसभेत वैशिष्ट्यपूर्ण ठराव घेण्यात आला आहे. जो मुलगा- मुली आणि सुन आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांना संपत्तीचं वारस होता येणार नाही असं ग्रामसभेनं एकमतानं ठरवलं आहे. सरपंच सुरेश वळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव संमत करण्यात आला. आई वडिलांना सांभाळणाऱ्यांनाच वडिलोपार्जित मालमत्तेत वारस म्हणून हक्क मिळतील. महसूल आणि ग्रामविकास विभागाला या ठरावांची प्रत पाठवली जाणार असून ग्रामपंचायतीची संमती घेऊनच महसूल विभागानं वारस प्रकरणं मंजूर करावीत असं सूचवण्यात आलं असल्याचं वळे यांनी सांगितलं.

****

`घर घर गॅस` योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात पहिला पाईपलाईन मधून मिळणारा घरगुती गॅस श्रीगोंदा शहरात उपलब्ध झाला आहे. श्रीगोंदा शहरातल्या शिवाजी उपनगर परिसरात अजित भोसले यांच्या घरात भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करुन गॅस देण्यास प्रारंभ करण्यात आला.

****

No comments: