Thursday, 31 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी प्रमुख नेते मुंबईत दाखल.

·      मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये पंधरा ते सतरा सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रम - मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.

·      श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित.

आणि

·      लातूर इथं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत राखी पोर्णिना साजरी.

****

मुंबई इथं आजपासून इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीमध्ये संघटनेचे प्रतिनिधी, झेंडा तसंच संयोजक या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. उद्योजक अदानींच्या गुंतवणुकींसंदर्भात राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा विविध प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरं द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.   

****

इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्तानं एकत्र आलेल्या पक्षांसमोर कोणताही कार्यक्रम नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही आघाडी झाली असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

****

मुंबईमध्ये आज सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही होत आहे. आघाडीच्या पुढल्या रणनितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.  

****

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचं एकूण देशांतर्गत उत्पन्न सात पूर्णांक आठ दशांश टक्के झालं असल्याची माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे. या आधीच्या तिमाहीत हे उत्पन्न सहा पूर्णांक एक दशांश टक्के इतकं होतं, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

संसदेचं विशेष अधिवेशन अठरा ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून दिली. या अधिवेशनामध्ये पाच बैठका होणार आहेत. अमृत काळा दरम्यानच्या या अधिवेशनात सरकार फलदायी चर्चा आणि वादविवाद करू इच्छिते असंही जोशी यांनी म्हटलं आहे.

****

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ते आज औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रम होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले -

१५, १६, १७ या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या मुक्तिसंग्रामामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन सोळा तारखेला चार वाजता करण्यात आलं आहे. त्यासाठी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेबांना या बाबतीतलं निमंत्रण मी स्वतःही दिलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांनी भेट देऊन हे निमंत्रण दिलेलं आहे.

 

 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची माहिती देणारं भव्य स्मारक औरंगाबाद इथं उभारलं जाणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपये निधी यापूर्वीच मंजूर केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. सुमारे साडे चार एकर जागेवर उभारलं जाणारं हे स्मारक ज्ञानवर्धक तसंच राष्ट्रीय वैभवात भर घालणारं असेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

****

उस्मानाबाद कलाविष्कारचे डॉ. पद्मसिंह पाटील पुरस्कृत श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. श.मा.पाटील स्मृती पुरस्कार पद्य विभागामध्ये सोलापूरचे डॉ शिवाजी शिंदे लिखित 'अंतस्थ हुंकार' काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे. त्रिंबकदादा शेळके स्मृती पुरस्कार यंदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाची सोय करणाऱ्या उस्मानाबादच्या अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला जाहीर झाला आहे. पुरस्कारांचं वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी दिली आहे.

****

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेत साईंबाबांची पाद्य पूजा केली. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. संस्‍थानचे मुख्‍य  कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.  

****

लखनौ विभागात वाराणसी रेल्वे स्थानकावर तांत्रिक काम करण्याकरता `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यानुसार जालना ते छपरा ही विशेष रेल्वे २० आणि २७ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासातली छपरा ते जालना ही विशेष रेल्वेही २२ आणि २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

लातूर इथल्या `ग्रीन लातूर वृक्ष टीम` या सामाजिक संघटनेनं यंदा रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला. या संघटनेनं तुळशीच्या बियांच्या राख्या तयार केल्या होत्या. यासंदर्भात संघटनेचे समन्वयक डॉ पवन लड्डा यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले -

राखी पोर्णिमेचा सण आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पारंपारिक राख्यांसोबत आम्ही तुळसी बियांपासून बनवलेल्या आकर्षक राख्या तयार केल्या. यामध्ये शंभर एक तुळशी बिया कागदाच्या पुड्यामध्ये बांधून त्यांला मोळी बांधली. आणि सुंदर अशी राखी तयार केली. शेवटचा उद्देश हा होता की जेव्हा ही राखी मातीमध्ये, कुंड्यामध्ये टाकल्या जातील सोबत बियासुद्धा पडल्या जातील त्याच्या. आणि त्यानंतर त्याच्यातून जी तुळशीची रोपं उगवतील, प्रत्येक घरामध्ये या पद्धतीनं दोन, तीन, चार तुळशीची रोपं उगवायला लागतील. पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा हा छोटासा प्रयत्न ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून केला आहे.

****

लातूर जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळांपैकी ३१ मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्यानं त्याचा परिणाम पीक वाढीवर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचं सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट झाल्याचं दिसून आल्यास विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत विमा कंपनीला कळवण्यात येईल, असं जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी कळवलं आहे.

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडन पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे अलेक्जांडर बुकीक आणि क्रिस्तोफर ओकोनेल यांच्या जोडीला पहिल्या फेरीत ६-४, ६-२ असं पराभूत केलं. महिला एकेरीमध्ये प्रथम मानांकित पोलंडची इगा स्वियातेक तिसऱ्या फेरीत दाखल झाली आहे. पुरुष एकेरीमध्ये तीन वेळचा विजेता सर्बीयाचा नोवाक जोकोविचनं स्पेनच्या बर्नाबे मिरालेसला पराभूत करुन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केलं. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

धुळे शहरासह जिल्हाभर पाणी टंचाईच्या अनुषंगानं धोंडी धोंडी पाणी देम्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मिरवणुकीनं वरुणराजाला साकडं घातलं. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत २५ टक्केही पाऊस झाला नाही. यामुळं धुळे महापालिकेनं पाण्याचं योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

****

कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आले आहेत. शेतकरी, गट, संस्था आणि व्यक्ती यांनी या संदर्भात आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दहा सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक एस. व्ही. लाडके यांनी केलं आहे.

****

रोटरी क्लबचे महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमधले शल्यचिकित्सक आणि स्वयंसेवक असे एकूण पस्तीस जण येत्या तीन ते १३ सप्टेंबर दरम्यान काश्मीर खोऱ्यातल्या अनंतनाग, पुलवामा, शोपीयान आणि कुलगाम या ठिकाणी विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणार आहेत.

****

No comments: