Wednesday, 30 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.08.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

गेल्या नऊ वर्षांत देशात सौरऊर्जा क्षमतेत ५४ पटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मिशन नेट झिरो मधल्या प्रगतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. रेल्वे विभागानं ट्विट करुन ही माहिती दिली, त्यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. मार्च २०१४ पर्यंत स्थापित सौर उर्जा क्षमता तीन पूर्णांक ६८ मेगावॅट होती, तर २०१४ ते २०२३ या कालावधीत, २०० पूर्णांक ३१ मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्यात आली, अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे.

हरित भविष्याप्रति आपल्या वचनबद्धतेत प्रशंसनीय प्रगती झाल्याचं निदर्शनास येत असून, केवळ नऊ वर्षात आपण मिशन नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती करत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भारतासाठी उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करणारा  हा प्रवास असाच पुढे चालू ठेवूया, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकार लवकरच औषधनिर्माण क्षेत्रातलं संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी एकंदर पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चाची नवीन योजना सुरू करणार आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. या योजनेचा उद्देश देशातली संशोधन पायाभूत सुविधा मजबूत करून भारतीय औषधनिर्माण क्षेत्राला खर्च-आधारित स्पर्धात्मकतेपासून नवकल्पना-आधारित वाढीकडे रूपांतरित करणं असा असल्याचं, मांडविया यांनी सांगितलं.

****

भावा बहिणीच्या अतूट प्रेमाची साक्ष जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज देशात सर्वत्र साजरा होत आहे. निरनिराळ्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत आहे.

आज नारळी पौर्णिमा देखील साजरी होत आहे. कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात हा सण साजरा करतात. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून, नारळी पौर्णिमेला कृतज्ञता व्यक्त करत समुद्राची पूजा केली जाते.

****

ग्रामविकासातून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तसंच खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्ता आणि प्रमाणीकरणावर लक्ष दिलं पाहिजे, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या ११ ग्रामीण उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कारानं, काल मुंबईत राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मधुमक्षी पालनाला चालना देऊन अधिक मधाची गावं निर्माण करावी, खादीवर आधारित स्टार्टअप सुरु करावेत तसंच खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारण्यात यावा, असंही राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.

****

राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचं विचाराधीन असल्याचं, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं आहे. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांचे रोप येत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, मासोद या पाच ठिकाणी सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सीट्रस इस्टेट उभारण्याबाबत आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करुन द्यावं, कालमर्यादेत हे काम पूर्ण करावं, असे निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर इथल्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत काल पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी रोहिणी खडसेंना नियुक्तीचं पत्र दिलं.

****

सिडकोच्या प्रशासन विभागातला महाव्यवस्थापक जगदीश राठोड याला दहा हजारर रूपये लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागानं सिडको भवन इथं काल ही कारवाई केली. घराच्या फर्स्ट पार्टी डीड ऑफ अग्रिमेंटवर सह्या करण्यासाठी त्याने इस्टेट एजंट कडून ही लाच मागितली होती.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये चार ठिकाणी या स्पर्धेचे सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तानात मुल्तान इथं, पाकिस्तान आणि नेपाळ संघादरम्यान होणार आहे. दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना येत्या शनिवारी पाकिस्तानसोबत होणार आहे.

****

भारतीय पुरुष हॉकी संघानं आशिया हॉकी फाईव्ह एस विश्वचषक पात्रता स्पर्धेत बांग्लादेशचा १५ - एक असा पराभव केला. ओमान मधल्या सलालाह इथं काल झालेल्या सामन्यात भारताच्या मनिंदर सिंगनं चार, मोहम्मद राहीलने तीन, सुखविंदर, गुरजोत सिंह आणि पवन राजभरने प्रत्येकी दोन, तर मनदीप मोर आणि दिपासिंग तिर्की यांनी प्रत्येकी एक गोल केला.

****

No comments: