Monday, 28 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 28.08.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 August 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ ऑगस्ट  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      भारताची चांद्रयान मोहीम ही कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या वृत्तीचं प्रतिक-पंतप्रधानांचं प्रतिपादन 

·      शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आतापर्यंत नागरिकांना सुमारे दीड हजार कोटींच्या लाभाचं वितरण-परभणी इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती

·      केंद्र तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत नाही-हिंगोली इथल्या निर्धार मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका

·      गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे निर्देश

·      राज्यात ३०० महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती;पाऊस खंडामुळे दुबारपेरणी अशक्य  

·      केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर;पुण्याच्या मृणाल शिंदे यांचा समावेश

आणि

·      जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदक

सविस्तर बातम्या

भारताची चांद्रयान मोहीम ही कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या वृत्तीचं प्रतिक बनली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या एकशे चाराव्या भागात ते काल बोलत होते. आपल्या स्वप्नांइतकेच प्रयत्नही मोठे असल्यानेच आपण मोठी झेप घेऊ शकलो, असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम हे नारीशक्तीचं जिवंत उदाहरण असून, जिथे महिलांचं सामर्थ्य जोडलं जातं तिथे अशक्यही शक्य करून दाखवलं जाऊ शकतं असं पंतप्रधानांनी नमूद केलं. यावर्षी भारताकडे असलेलं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद हे देशाच्या नागरिकांचं अध्यक्षपद असून, याअंतर्गत देशभरात होणाऱ्या बैठकांमुळे स्थानिक उत्पादनं आणि पर्यटनाला चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

चीनमध्ये झालेल्या विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी कोल्हापूरची नेमबाज अभिज्ञा पाटील हिच्यासह काही युवा खेळाडूंशीही त्यांनी थेट संवाद साधला.

दरम्यान, सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५ ठिकाणी एकाच वेळी होणार असून, गृह विभागाच्या केंद्रीय सुरक्षा दल, अंमली पदार्थ विरोधी दल आणि दिल्ली पोलिस, या विभागांमधे या नियुक्त्या होणार आहेत.

****

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ४४६ कोटींचा लाभ दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. परभणी इथं काल शासन आपल्या दारी उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, मेघना साकोरे-बोर्डीकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हिताची जलयुक्त शिवार योजना सुरु असून, आता जपानबरोबरही तीन उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,

Byte…

शेतकऱ्यांच्या हिताची जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली. आणि जपानमध्ये या योजनेच्या बद्दल सर्वसामान्य माणसांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जे काही योगदान आपण देतोय, जपानमध्ये जाऊन जायकाकडून आपले तीन चार प्रोजेक्ट जे आहेत, महत्वाकांक्षी त्याला सहाकार्य जपान सरकारकडून मिळवण्याला यश आलंय.

 

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची जास्तीचा दर देण्याची मागणी असून, त्यांना विश्वासात घेऊनच समृद्धी महामार्ग तयार होत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडवण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात अमृतयोजनेतून भूयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,

 

Byte…

परभणी शहरामध्ये अमृत योजनेतून भुयारी गटारी योजना बांधण्याची आवश्यकता आहे. चारशे कोटीची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा जी योजना आहे, त्याला देखील पैशाची आवश्यकता आहे. मला देवेंद्रजी म्हणाले, या भागामध्ये चांगले रस्ते पाहिजे. या परभणीसाठी देखील काँक्रिटच्या रस्त्यासाठी जो निधी आवश्यक आहे, त्या निधीची व्यवस्था देखील केली जाईल. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहील, आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवा निमित्त मंत्रिमंडळाची विशेष बैठक औरंगाबाद इथं होणार असल्याचं सांगितलं. या बैठकीत मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्णय घेतले जाणार असल्याचं ते म्हणाले. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.

मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना आणली असून, यासाठी केंद्र सरकारकडे ३५ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचं, फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले,

Byte…

 

मराठवाड्याला दुष्काळापासनं मुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला. त्यासंदर्भात दोन योजना तयार केल्या. पिण्याच्या पाण्याकरता, शेतीकरता मराठवाडा ग्रीड योजना तयार केली. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली. आम्ही त्यांना सांगितलंय, की आता मराठवाडा ग्रीडचं काम हे तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात तीस पस्तीस हजार कोटी रूपये जलजीवन मिशन मध्ये दिले. आता वीस हजार कोटी रूपये अजून आम्हाला मराठवाडा ग्रीडमध्ये जर तुम्ही दिले तर मराठवाड्याला प्रश्न आम्ही सोडवू शकतो.

 

या कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना विविध वस्तू आणि धनादेशांचं वाटप करण्यात आलं.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह परभणी शहरातल्या राजगोपालचारी उद्यानातल्या हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नजिक योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहात हजेरी लावली. श्री गंगागिरी महाराज यांचं वास्तव्य  असलेल्या सराला बेट या परिसरात पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे यावेळी उपस्थित होते.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बीड इथं सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. मराठवाड्यातल्या सहकारी कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढायचं असेल, तर जिल्हा बँकांमध्ये सुधारणा करणं गरजेचं असल्याचं, पवार यावेळी म्हणाले. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नाला प्राधान्य असेल, असं त्यांनी सांगितलं.

****

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत नसून, शासन आपल्या दारी ही सुद्धा राज्य सरकारची खोटी योजना असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल हिंगोली इथं शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते. शिंदे गटात गेलेले कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर ठाकरे यांनी कडाडून टीका केली.

****

गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे निर्देश, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद विभागात अन्नधान्य वितरणाची सरासरी आकडेवारी लक्षात घेता, आनंदाचा शिधा साठी ३२ लाख ७६ हजार ३८७ शिधाजिन्नस संचाची मागणी नोंदवण्यात आली आहे, विभागातल्या गोदामांच्या सद्यस्थितीबाबत, शिवभोजन देयकांच्या भुजबळ यांनी आढावा घेतला.

****

उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र जागेप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिंगोली इथं काल याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे वैद्यकीय महाविद्यालय सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कार्यरत आहे. महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जमीन संपादन केली जाईल. त्यावर इमारतीचं बांधकाम त्वरीत सुरू करण्यासह आवश्यक मनुष्यबळ भरतीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

****


राज्यात २५ जुलै ते २५ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत ३०० महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती असल्याची माहिती, कृषी विभागानं दिली आहे. जून अखेरपर्यंत पेरणी होऊन जुलैमध्ये पावसात खंड पडला, तर जुलै अखेपर्यंत दुबार पेरणी करता येते. मात्र यंदा पेरण्याच जुलै अखेरीला झाल्यानं दुबार पेरणी शक्य नाही. त्यामुळे ३०० महसूल मंडलांत खरिपाचा हंगाम जवळपास वाया गेल्याची स्थिती आहे. आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाला तर तिथं रब्बी पिकं घेता येतील. मात्र खरिपातल्या पेरणीसाठी केलेला खर्च आणि मेहनत निष्फळ ठरेल, असं कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनय आवटे यांनी सांगितलं आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेपासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर  हानिकाल पाहता येणार आहे.

****

शिक्षक दिनानिमित्त केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ५० शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून, यात पुण्याच्या मृणाल गांजाळे -शिंदे यांचा समावेश आहे.

मृणाल गांजाळे या आंबेगाव तालुक्यातल्या पिंपळगाव महाळुंगे इथं जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचं वितरण आज पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

****


सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत, यश मिळवलेल्या खेळाडूंचा, पिल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पालकांनी मुलांना खेळाविषयी प्रोत्साहन द्यावं तर मुलांनी खेळासोबतच शिक्षणाला महत्त्व देण्याचं आवाहन धनराज पिल्ले यांनी यावेळी केलं. विविध क्रीडा संघटकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

****

हंगेरी मधल्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजनं ८८ पूर्णांक १७ मीटर अंतरावर भाला फेकत ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या अरशद नदीमनं रौप्य, तर झेक प्रजासत्ताकच्या जॅकब वाडलेजनं कांस्य पदक जिंकलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरजनं याआधीच पात्रता मिळवली आहे.

महिलांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भारताची पारुल चौधरी ११ व्या स्थानावर राहिली, ती देखील पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

या स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीची अंतिम फेरी आज होणार असून, यात भारताच्या धावपटूंचा चार बाय चारशे रिले संघ सहभागी होणार आहे.

****

ओमानच्या सलालाह इथं सुरु असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी फाईव्ह एस विश्वचषक पात्रता स्पर्धेत काल भारतानं थायलंडचा पाच - चार असा पराभव केला. एलीट पूल मध्ये भारत अग्रस्थानी आहे.

****

दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागात आजपासून येत्या तीन सप्टेंबरपर्यंत रोलिंग ब्लॉक प्रोग्राम घेण्यात येणार आहे. यामुळे पूर्णा -परळी - पूर्णा ही गाडी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर आदिलाबाद - परळी- आदिलाबाद आणि परळी- अकोला - परळी या गाड्या येत्या तीन तारखेपर्यंत परभणी ते परळीदरम्यान अंशत रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

राज्याचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर राज्य शासनातर्फे विकास कामं सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्य मंदिराचा गाभारा आणि घोड्याचा गाभारा आजपासून पाच ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. भाविकांना गडावर आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी कळवलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर ट्रक आणि परिवहन महामंडळाची बस यांची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर १४ प्रवासी जखमी झाले आहेत. नातेपुतेपासून चार किलोमीटर अंतरावर काल हा अपघात घडला. तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आलं आहे.

****

बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता असल्यानं, राज्यात बांबू उत्पादन वाढीला प्रोत्साहन, आणि त्यापासूनच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, बांबू विकास मंडळानं नियोजन करावं, अशा सूचना, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. काल नागपूर इथं बांबू ऊती संवर्धन अर्थात टिश्यू कल्चर केंद्राचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****


No comments: