Thursday, 31 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.08.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 August 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ ऑगस्ट  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचं संरक्षण करण्यासाठी प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात

·      राज्यात पावसाची स्थिती पाहता दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

·      लातूरसह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन

·      औरंगाबाद आणि उस्मानबादच्या नामांतराविषयीची अंतिम अधिसूचना अद्याप काढलेली नसल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण

·      रक्षाबंधनाचा सण मराठवाड्यात अनेक ठिकाणी अभिनव पद्धतीने साजरा

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा नेपाळवर २३८ धावांनी विजय, भारताचा पहिला सामना येत्या शनिवारी

सविस्तर बातम्या

राज्यातल्या पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या पाचव्या बैठकीत बोलत होते. नॅशनल वेटलॅण्ड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचं सर्वेक्षण, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करावं, त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशात एकूण ७५ रामसर क्षेत्र असून, त्यापैकी महाराष्ट्रात नांदूर - मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी या तीन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात २३ हजार पाणथळ जागा असून, त्यांचं सर्वेक्षण, मान्यताप्राप्त संस्थेकडून करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देत आपल्या जिल्ह्यातल्या पाणथळ जागांची माहिती संबंधित संस्थेच्या मदतीने वर्षभरात संकलित करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या अकृषी विद्यापीठ क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयं आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी, २०२४ ते २९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या, राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात एक हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालयं सुरु करता येणार आहेत. २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक ठिकाण आराखड्यामध्ये महाविद्यालयांसाठीची १ हजार ५३७ नवीन ठिकाणं प्रस्तावित होती, त्यापैकी १ हजार ४९९ ठिकाणं पात्र ठरली आहेत.

****

संविधानाचं रक्षण या एकमेव उद्दिष्टासाठी आपण एकत्र आल्याचं, इंडिया आघाडीचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे, या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असून, केंद्र आणि राज्य सरकार कुठे आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नसून, आघाडीचा सामुहिक कार्यक्रम काय असावा याबाबत मुंबईच्या बैठकीत चर्चा होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं. या आघाडीत वेगवेगळे पक्ष आहेत, मात्र किमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही पुढे जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात कोणाशी युती अथवा आघाडी करणार नाही, तर सर्वच निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची माहिती, तेलंगणाचे अर्थ मंत्री हरिष राव यांनी दिली आहे. ते काल सोलापुरात बोलत होते. पुढील महिन्यात सोलापूरात भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सोलापूर इथल्या स्थानिक पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या.

****

आदिवासींच्या विकासाच्या कार्ययोजना आखण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकी माहीती उपलब्ध होण्यासाठी, राज्यातल्या १७ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये येत्या मार्च महिन्यापासून बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी ही माहिती दिली. सध्या नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीने प्रायोगिक स्वरुपात बेंचमार्क सर्वेक्षण सुरु करण्यात येत असून, आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केलं जाणार आहे. असं सर्वेक्षण यापूर्वी १९९६-९७ साली झालं होतं. त्यानंतरच्या काळात आदिवासींसाठी राबवण्यात आलेल्या योजनांची फलश्रुती काय आहे, तसंच सध्या राज्यातल्या आदिवासींची रोजगार, शिक्षण, आर्थिक, तसंच सामाजिक स्थिती नेमकी काय आहे, याच अनुषंगानं हे बेंचमार्क सर्वेक्षण करण आवश्यक असल्याचं गावीत यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्यात पावसाची स्थिती पाहता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. खरिपातल्या बहुतांश पिकांचं नुकसान झालं असून, चारा पिकांचं देखील नुकसान झालं आहे, याकडे पाटील यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे. राज्यात या महिन्याअखेर पर्यंत सरासरीच्या २९ टक्के इतका पाऊस ठराविक ठिकाणी झाला असून, चालू परिस्थितीत ३२९ महसुली मंडळात, पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे, त्यामुळे दुष्काळ जाहीर करून आवश्यक त्या उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणीही पाटील यांनी या पत्रातून केली आहे.

****

राज्यात रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचं विचाराधीन असल्याचं, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं आहे. फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांची रोपं येत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, मासोद या पाच ठिकाणी सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सीट्रस इस्टेट उभारण्याबाबत आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, तातडीने उपलब्ध करुन द्यावं, कालमर्यादेत हे काम पूर्ण करावं, असे निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

****

लातूर सह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल सामंत यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी विकासासाठी अत्यावश्यक असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्याच्या दृष्टीनं, आवश्यक असलेल्या जमिनीचं अधिग्रहण करून विमानतळावरची उर्वरित कामं त्वरीत पूर्ण करण्यात येतील असं आश्वासनही सामंत यांनी दिलं.

****

राज्यमंत्रीमंडळाचा लवकर विस्तार करून सामाजिक आणि न्याय मंत्रीपद हे रिपब्लिकन पार्टीला देण्यात यावं अशी मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत दोन तर विधानसभेला दहा ते बारा जागा देण्यात याव्यात अशीही मागणी त्यांनी केली आहे. अमित शहा आणि जे पी नड्डां यांच्याशी बोलून मायावतींना राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएमध्ये आमंत्रित करणार असल्याची माहितीही आठवले यांनी यावेळी दिली. मराठवाडा विकासाचा विशेष आराखडा राज्य सरकारने तयार करावा, यंदा पाऊस कमी झाला असल्याने लगेच दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्याही आठवले यांनी यावेळी केल्या.

****

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविषयीची अंतिम अधिसूचना अद्याप काढलेली नसल्याचं, राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणार्या याचिकेसह अनेक रिट याचिकांवर काल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. जिल्हा आणि महसूल पातळीवर नामांतराची अंमलबजावणी करण्यात अद्याप अधिसूचना काढण्यात आली नाही, त्यामुळे ड्राफ्ट अधिसूचनेला आव्हान देणार्या याचिका निरर्थक असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नामांतरावर आक्षेप घेणार्या याचिका न्यायालयानं निकाली काढल्या. तसंच दोन्ही शहरांच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिकांवर येत्या ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली.

****

बहीण-भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यंदा पर्यावरणस्नेही राख्यांना अनेक ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं दिसून आलं. मराठवाड्यात अनेक ठिकाणी अभिनव पद्धतीने रक्षाबंधन साजरं झालं.

लातूर जिल्ह्यात झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या उपक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी पिंपळाच्या झाडाला राखी बांधून वृक्षांचं संवर्धन करण्याचा संदेश नागरिकांना दिला.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना व्यसनापासून मुक्त करावं, यासाठी राज्य नशा बंदी मंडळाचे जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी, जिल्हा समाज कल्याण अधिकार्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन राखी बांधली. जिल्ह्याला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना राखी बांधल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. पूर्वी बहीण भावाला संकट काळी माझं संरक्षण कर म्हणून, राखी बांधत असे, आता महिला सक्षमीकरण झालं आहे. त्यामुळे आता समाजासमोर असलेल्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी रक्षाबंधन करण्याची आवश्यकता बनसोडे यांनी व्यक्त केली.

उस्मानाबाद इथं स्वआधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्पात दिव्यांग मुलींनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या आमदार कैलास पाटील, तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना बांधून रक्षाबंधन साजरं केलं. अणदूर इथल्या जवाहर कला वाणिज्य महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा सण साजरा केला, तर परंडा इथं भाजपा महिला मोर्चाच्या वतीने बसस्थानकात एसटी बसचे चालक तसंच वाहक यांना राख्या बांधून शुभेच्छा दिल्या.

****

अहमदनगरमध्ये राखी पोर्णिमेनिमित्त भारत भारती संस्थेच्या महिला सदस्यांनी एम आय आर सी मधल्या अधिकारी आणि सैनिकांना राखी बांधून अनोख्यारितीनं सण साजरा केला.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात पाकिस्ताननं नेपाळवर २३८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने ५० षटकात सहा बाद ३४२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला नेपाळचा संघ २४व्या षटकार १०४ धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्देतला भारताचा पहिला सामना परवा शनिवारी पाकिस्तानशी होणार आहे.

****

औरंगाबाद इथं आता अंत्यविधी साठीचा परवाना थेट स्मशानभूमी किंवा कब्रस्तानात मिळणार आहे. उद्या एक सष्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हा परवाना याआधी महानगरपालिका कार्यालयातून घ्यावा लागत असे. ही गैरसोय लक्षात घेऊन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी हा परवाना थेट स्मशानभूमी किंवा कब्रस्तान इथं देण्याचा निर्णय घेतला आहे.

****

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून, जिल्ह्यातल्या मध्यम, लघु अशा सर्व पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार यंत्रणेच्या कार्यक्षेत्रातले सर्व पाणी साठे आरक्षित करण्यात आले आहेत.

****

मांजरा धरणातल्या पाणीपातळीत कमालीची घट होत असल्यानं, धरणातला पाणीसाठा हा फक्त नागरिकांच्या पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठीचं निवेदन अंबाजोगाई इथं उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं. या धरणातून लातूर औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा तसंच काळवटी तलावातून शेतकऱ्यांकडून अवैध रित्या होत असलेला पाणी उपसा बंद करावा, आणि दोन्ही ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

****

शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्यात परळी इथं, येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीबाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्यांच्या अनुषंगानं संबधित विभागांना करावयाच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

****

हिंगोली इथल्या पंचायत समितीमधल्या रोजगार हमी योजना कक्षात कार्यरत कंत्राटी पालक तांत्रिक अधिकारी जे.एम. पठाण याला, दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल सापळा रचून अटक केली. कनेरगाव इथल्या लाभार्थ्यांचा सिंचन विहिरींचा कुशलचा निधी देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

No comments: