Tuesday, 29 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 29.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आज राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय खेळांबाबतच्या नव्या उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त देशातल्या क्रिडापटुंना शुभेच्छा दिल्या आहेत. देशासाठी योगदान देणर्या क्रिडापटुंचा देशाला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

हवामानाचे अंदाज व्यक्त करण्यासाठी शासनाने महावेध प्रकल्प हाती घेतला असून, याद्वारे मंडळ स्तरावर हवामानाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना हवामानाचा अंदाज कळणार असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना संकटकाळात सतर्क राहता येणार आहे..

****

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्यावतीनं काल मराठवाड्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. 

औरंगाबाद इथं निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन राधाकृष्ण विधाते यांना संघटनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. पत्रकारिता क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना अधिस्विकृती पत्र देण्यात यावं, यासह अनेक मागण्यांचा यात समावेश आहे.

नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेनं धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.

बीड इथं पत्रकारांच्या धरणे आंदोलनाची खासदार प्रीतम मुंडे यांनी दखल घेतली. त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. जिल्हा प्रशासनालाही यावेळी निवेदन देण्यात आलं.

****

हिंगोली इथं जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातल्या कनिष्ठ लिपिकाला काल आठ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. बिभीषण विष्णुपंत पांचाळ असं त्याचं नाव असून, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला ५० हजार रुपये सरकारी अनुदानाचा लाभ देण्यासाठी, त्यानं लाचेची मागणी केली होती. संबंधितांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल समाजकल्याण विभागात सापळा रचून पांचाळ याला ताब्यात घेतलं.

****

No comments: