Wednesday, 30 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.08.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 August 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० ऑगस्ट  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात दोनशे रुपये कपात;गृहिणींकडून समाधान व्यक्त

·      पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या कारचं काल नवी दिल्लीत अनावरण

·      राज्यातले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प कालबद्धरीत्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता लवकर वितरीत करणार-कृषीमंत्री धनंजय मुंडे

·      देशभरात पुढल्या एक वर्षात एक हजार खेलो इंडिया केंद्रं स्थापन केली जाणार

·      मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी जालन्यात जनआक्रोश मोर्चा

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात;शनिवारी भारत पाकिस्तान सामना

सविस्तर बातम्या

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रुपयांनी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या दरकपातीला मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत अधिक माहिती दिली. ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेतल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. ते म्हणाले...

Byte…

आज जब ओणम और रक्षाबंधन का त्यौहार है, तो मुझे कहते हुये प्रसन्नता है, की एक बार देश की लाखो बहनों के लिए फिर प्रधानमंत्री मोदीजी ने बडा तोहफा दिया है की पचहत्तर लाख बहनों के लिये, उज्वला गॅस योजना के अंतर्गत उनको गॅस कनेक्शन मिलेंगे। उनको एक रूपया भी नही देना पडेगा। प्रधानमंत्री मोदीजी ने निर्णय लिया है, की दो सौ रूपया गॅस सिलेंडर के दाम कम किये जायेंगे। सभी उपभोक्ताओं के लिये दो सौ रूपये दाम कम होंगे।

 

गॅस सिलिंडर दर कपातीच्या या निर्णयाचा लाभ देशभरातल्या सगळ्या गॅसधारकांना मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचाहत्तर लाख महिलांना नवीन गॅस जोडण्या देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी या दरकपातीमुळे होणाऱ्या परिणामाबाबत माहिती दिली. ते म्हणाले...  

 

Byte…

हा एक मोठा लाभ होणार आहे, सगळ्या गृहिणींना. आणि गृहिणींचा जर विचार केला तर रक्षाबंधनाचा मोठा जो उत्सव आहे मला वाटते त्या दृष्टीने एक मोठी भेट वस्तू दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याशिवाय सरकारने एक यो जना जाहीर केली आहे की उज्ज्वला योजनेद्वारे यानंतर अजून ७५ लाख लोकांना कनेक्शन देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ ७५ लाख कुटुंबांना या योजनेचा मोठा प्रमाणावर फायदा होइल आणि याचा जो लाभ आहे तो जास्तीत जास्त लोक घेतील आणि आनंदी होतील असा आपण म्हणू शकतो.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातल्या गृहिणींनी आनंद व्यक्त करत, आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली ही भेट असल्याचं सांगत, केंद्र सरकारचे आभार मानले. औरंगाबाद इथल्या अनिता मंडलिक, जालना इथल्या प्रतिभा डोईफोडे, बुलडाण्याच्या प्रतिभा पाठक आणि हिंगोली जिल्ह्यातल्या वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या.

बाईट एक  

मला तर आज खूपच आनंद  होत आहे. कारण अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु असं वाटत आहे. कारण मोदीजींनी हे महागाईचं सगळं लक्ष डोळ्यासमोर ठेवून गॅसचे २०० रुपये कमी केले, याबद्दल आम्हाला खूपच आनंद वाटत आहे. कारण सध्या दुष्काळ पण खूप वाटत आहे. त्यामुळे हे २०० रुपये आम्हाला खूप महत्त्वाचे वाटतात आणि मोदीजींनी खूप छान निर्णय घेतला, त्याबद्दल मोदीजीं चे खूप खूप धन्यवाद .

 

बाईट दोन

नमस्कार मी प्रयांका डोईफोडे राहणार जालना. मी या एक गृहिणी आहे. मुलांचे शैक्षणिक खर्च, घरांचे मासिक हप्ते, दूध भाजीपाला गॅस सिलिंडर यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. मात्र आता केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर थेट २०० रुपयांनी कमी करून गृहिणींना एकाप्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे मी आभार मानते.

 

बाईट तीन

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने एक निर्णय घेतला की गॅस सिलिंडरच्या किंमती त्यांनी कमी केल्या. त्यामुळे आता आम्हाला अकराशेच्या ऐवजी नऊशे रुपयांना सिलिंडर मिळणार आणि उज्ज्वला गॅस अंतर्गत येणाऱ्या महिलानां ते ७०० रुपयांनाच मिळणार. त्यामुळे आमची महिन्याची २०० रुपयांची बचत होणार . त्यामुळे आमचा बजेट आता बऱ्यापैकी मार्गा वर येणार. धन्यवाद मोदी जी.

 

बाईट चार

नमस्कार मी वैशाली प्रशांत सूर्यवंशी. राहणार आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली. केंद्र सरकारने आजपासून गॅसचे दर सर्वसामान्यांसठी २०० रुपयांनी तर उज्ज्वला गॅस धारकांसाठी ४०० रुपयांनी कमी केल्यानी आमच्या सारख्या गृहिणींचा महिन्याचं आर्थिक बजेट कमी होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात केंद्रशासनानी गॅसच दर कमी केल्यानी सामान्य जनतेना फार मोठा दिलासा मिळणार आहे. रक्षाबंधनानिमित्त सर्व गृहिणींनी केंद्र शासनाने अमूल्य अशी भेट दिली आहे. सर्व गृहिणींतर्फे केंद्र शासनाचे आभार.

****

पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या कारचं काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी अनावरण केलं. भारत स्टेज मानकांसहित फ्लेक्स फ्युएल, म्हणजे मिश्रित पेट्रोलवर तसंच विजेवर चालणारं वाहन तयार करून, देशानं ऐतिहासिक कामगिरी केल्याचं, गडकरी यावेळी म्हणाले. इंधन तेलाची आयात शून्यावर आणण्याची गरज असून, प्रदूषण कमी करण्यासाठी अशा गाड्यांची आवश्यकता असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एन सी ई आर टी च्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात, यावर्षीपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकावरचा एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स', अर्थात, शूर सैनिकांना आदरांजली, असं या धड्याचं नाव आहे. या धड्यामध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा इतिहास, महत्त्व आणि संकल्पना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

****

राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना तसंच सिंचन प्रकल्पांना तातडीनं गती देऊन, कालबद्धरीत्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुंबईत काल राज्यातल्या दहा महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने विविध मेट्रो प्रकल्प, सिंचन प्रकल्प आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत इकॉनॉमिक झोन या प्रकल्पांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

****

अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन आणि अनुषंगिक मागण्यांबाबत चार जणांनी काल मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उड्या मारुन आंदोलन केलं. पोलिसांनी तत्काळ या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. या प्रकल्पामुळे अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातली ४२ गावं बाधित झाली आहेत.

****

एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत, चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या, पाचशे चोवीस कोटी रुपये निधीच्या खर्चाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ते काल या योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

दरम्यान, प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर, राज्य शासनानं जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता, लवकरात लवकर वितरीत करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा, नमो महासन्मान योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे निर्देशही, मुंडे यांनी दिले आहेत.

****

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक उद्या आणि परवा मुंबईत होणार आहे. महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

देशभरात पुढल्या एक वर्षात एक हजार खेलो इंडिया केंद्र स्थापन केली जाणार असल्याची घोषणा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांची सुरुवात करताना बोलत होते. प्रत्येक केंद्राला साहित्य आणि उपकरण खरेदीसाठी पाच लाख रुपये, आणि केंद्र चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चापोटी दरवर्षी आणखी पाच लाख रुपये दिले जातील, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

****

औरंगाबाद मधल्या महानगरपालिका शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या विनाशुल्क जिम्नॅस्टिक प्रशिक्षणाचा काल नारेगाव इथल्या महापालिका शाळेत प्रारंभ झाला. मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय क्रीडा दिनी सुरू झालेल्या, कॅच देम यंग अभियानाअंतर्गत, हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणामुळे, या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेत सुधारणेसह खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.

****

बहीण भावाचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आज साजरा होत आहे. या निमित्तानं विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या असून, यामध्ये यंदा पर्यावरणस्नेही राख्यांची संख्या लक्षणीय आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या निरक्षर महिलांनी, बांबूपासून सुमारे अठ्ठेचाळीस हजार पर्यावरणस्नेही राख्या तयार केल्या आहेत. यातल्या साडेअकरा हजार राख्या लडाख, सियाचीन, कच्छ तसंच भुजमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना पाठवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमधल्या वर्ग चौथी ते दहावीच्या विद्यार्थिनी आपल्या आईवडिलांना राखी पौर्णिमेनिमित्त एक पत्र लिहिणार आहेत. या पत्रातून त्या, माझं वय अठरा वर्षं पूर्ण होईपर्यंत माझा विवाह करू नका, मला शिक्षण घेऊ द्या, अशी अनोखी ओवाळणी पालकांकडे मागणार आहेत. बालविवाह निर्मूलनासाठी अनेक उपक्रम राबवले जात असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून हा पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

****

कावड यात्रेत जनसमुदायासमोर हातात तलवार घेऊन ती फिरवल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून, हिंगोलीतल्या ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत, काल आमदार बांगर यांनी, हातात तलवार घेऊन हवेत फिरवली होती. तसंच डीजे लावण्यास प्रतिबंध केलेला असतानाही या यात्रेत डीजे लावल्याबद्दल डीजेचालक रवी शेषराव धुळे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं औरंगाबाद इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत.  बँकेच्या संचालकांना निधीची उलाढाल, गुंतवणूक, कर्ज नूतनीकरण, नवीन ठेवी स्वीकारणं आदींवर बंदी घालण्यात आली आहे. सहा महिन्यानंतर बँकेच्या कारभाराचा आढावा घेतला जाईल, त्यानंतर पुढील निर्णत घेण्यात येईल, असं रिजर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटलं आहे.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं किंवा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यात यावी, या आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी, जालना जिल्ह्यातल्या शहागड चौफुली इथं, काल मराठा समाजाच्यावतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या मराठा समाजबांधवांसह महिला आणि मुली मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं, त्यानंतर राष्ट्रगीतानं या मोर्चाची सांगता झाली.

****

लातूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून आपलं ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रीत करावं, असं आवाहन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. काल झालेल्या अंमली पदार्थविरोधी समितीच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. औषध विक्रेत्यांनी प्रिस्क्रिप्शन नसेल तर औषध नाही, या तत्वाचं पालन करावं, अशी सूचना त्यांनी केली.

****

हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं काल मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक, पोलीस अधिकारी, माजी सैनिक, निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत असून, पहिला सामना पाकिस्तानात मुल्तान इथं पाकिस्तान आणि नेपाळ संघादरम्यान खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना येत्या शनिवारी पाकिस्तानसोबत होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या परभणी, मानवत, सेलू आणि पूर्णा इथल्या मुलांच्या आणि मुलींच्या प्रत्येकी एक, तर गंगाखेड इथल्या मुलींच्या एक, अशा एकूण नऊ शासकीय वसतीगृहांसाठी प्रवेश देणं सुरू आहे. पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांनी यासाठी येत्या वीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर कालव्यात मालवाहू टॅम्पो पडून झालेल्या अपघातात एका तीस वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर त्याची तीन वर्षांची मुलगी वाहून गेली. गंगापूर - वैजापूर मार्गावर काल हा अपघात झाला.

****

जालना महानगरपालिकेतल्या नदीम अब्दुल रहेमान चौधरी या कनिष्ठ लिपिकाला, आठशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराचा, महापालिकेच्या रिव्हिजन रजिस्टरमधला उतारा देण्यासाठी, चौधरीनं एक हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

औरंगाबादमधल्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महावितरणनं तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून, या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, तसंच वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केलं आहे. 

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांची राज्य समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातल्या १६ अकृषी विद्यापीठांची उपकेंद्रं स्थापन करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. 

****

No comments: