Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीबाबत
सात दिवसांत पंचनामे पूर्ण करून तालुका निहाय अहवाल सादर करण्याचे कृषिमंत्री धनंजय
मुंडे यांचे निर्देश
·
मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त पुढच्या
महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची औरंगाबाद इथं बैठक
·
पायाभूत स्तरावरील शैक्षणिक आराखडा
तयार करण्यासाठी तज्ज्ञांच्या उपसमितीला मंजूरी
·
परभणी इथं उद्या मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’
·
लातूर जिल्ह्यात लिंग निदान प्रतिबंध
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना
आणि
·
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक
अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसह ऑलिम्पिसाठी पात्र
सविस्तर
बातम्या
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीबाबत
सात दिवसांत पंचनामे पूर्ण करून तालुका निहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला
दिले आहेत. ते काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत
बोलत होते. या पंचनाम्यांसाठी कृषी,
महसूल विभागांसह
पिक विमा कंपनीलाही सोबत घ्या,
तसंच तालुकानिहाय
आपत्कालीन आराखडे तयार करून सादर करण्याची सूचना मुंडे यांनी केली.
या बैठकीत मदत आणि पुनर्वसन
मंत्री अनिल पाटील,
ग्रामविकास
मंत्री गिरीश महाजन,
क्रीडा मंत्री
संजय बनसोडे,
आरोग्य मंत्री
तानाजी सावंत,
बहुजन कल्याण
मंत्री अतुल सावे,
रोजगार हमी
मंत्री संदिपान भुमरे,
आमदार सतिश
चव्हाण, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह,
संबंधित
विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आठही जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत तालुकानिहाय
आढावा घेत शासनास अहवाल सादर करावा,
कोणताही
शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,
याची सर्वतोपरी
काळजी घेण्यात येईल,
तसंच केंद्रीय
पातळीवरही याबाबत शासन पाठपुरावा करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत
बोलताना मुंडे यांनी,
दुष्काळी
परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली. विभागात पिण्याचं पाणी तसंच जनावरांच्या
चाऱ्याचा प्रश्न उभा राहणार नाही,
यासाठी उपाययोजना
हाती घेणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले..
Byte…
आहे ही परिस्थिती
खरंच भयावह आहे. आपण एकटे नाहीत तर हे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहे. माझ्या
मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना आणि भगिनींना याठिकाणी विनंती करतो की, अशा संकटाच्या
काळात शासन सर्वतोपरी तुमच्या पाठीमागे आहे. गरज पडली तर वाट्टेल तेवढे पैस खर्च करील
पण या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणाने उभं राहील. आठवड्याला एक बैठक
आम्ही कृषी विभागाचा मंत्री या नात्याने घेणार आहे.
दुष्काळी स्थितीसाठी पावसाचा
सलग २१ दिवसांचा खंडकाळ ग्राह्य धरला जाईल, यासाठी प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात
आल्याचं कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितलं. शेती कर्जाची वसुली दुष्काळी काळात थांबवावी, असं सांगत, खरिप कर्जाचं पुर्नगठन करण्याबाबतचा
प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करणार असल्याचं, ते म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त
पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक औरंगाबाद इथं होणार आहे. यामध्ये आपत्कालीन, मध्य तसंच दीर्घकालीन उपायायोजना
करून, विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी
ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचं,
मुंडे म्हणाले.
मराठवाड्याला दीर्घकालीन फायदा देणाऱ्या तसंच अन्य सर्वच योजनांचे आराखडे, आणि रखडलेल्या कामांचे प्रस्ताव तयार
करून, संबंधित मंत्रिमंडळ बैठकीआधी
सादर करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
****
आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त
भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावं, अशी मागणी राज्याचे मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री
अनिल पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात
पाटील यांनी काल नवी दिल्लीत सीतारामन यांची भेट घेतली. राज्यात काही ठिकाणी दुष्काळग्रस्त
परिस्थिती आहे,
तर काही
ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. यासंदर्भात राज्याकडून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवणार
असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांची देखील भेट घेणार असल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं.
****
राज्यात आतापर्यंत एकूण १६
ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी
कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल
यांच्याकडे केली,
त्यावर गोयल
यांनी ही माहिती दिली.
****
मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित
करण्यासाठी स्थापन समितीच्या अध्यक्षपदी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. या समितीत सागरी जिल्ह्यांमधले तसंच भूजलाशयीन जिल्ह्यातले प्रत्येकी
दोन विधानसभा सदस्य आणि एक विधानपरिषद सदस्यांच्या नावांचा, समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात
आला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्य व्यवसाय विकास धोरण तयार होत असून, मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास
होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे.
****
पायाभूत स्तरावरील शैक्षणिक
आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांच्या उपसमितीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी
मंजूरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी
गठीत सुकाणू समितीच्या बैठकीत केसरकर यांनी या उपसमितीला मंजूरी दिली.
ही समिती बालवाडीची तीन वर्षे
आणि इयत्ता पहिली तसंच दुसरी असा पाच वर्षांचा आराखडा तयार करेल. आराखड्याचं काम नियोजनबद्ध
पद्धतीने पूर्ण व्हावं,
आणि चालू
वर्षीच पूर्व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम उपलब्ध व्हावा, असं केसरकर यांनी सांगितलं. ही उपसमिती
तिसरी ते पाचवी,
सहावी ते
आठवी आणि नववी ते बारावी,
अशा तीन
टप्प्यांमध्येही आराखडा तयार करणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याची पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण, अशा चार टप्प्यांमध्ये निर्मिती करण्यात
येणार आहे. त्याच धर्तीवर राज्य शैक्षणिक आराखडा तयार करण्यात येत आहे.
****
बनावट पावत्यांच्या आधारे इनपुट
टॅक्स क्रेडीट घेतल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने नवी मुंबईत सहा
कंपन्यांच्या मालकांना तसंच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बनवण्यात
आलेल्या या पावत्या सुमारे तीस कोटी रुपयांच्या असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुढच्या वर्षी २० ते २८ जानेवारी
२०२४ या कालावधीत,
मुंबई आंतरराष्ट्रीय
महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी काल ही माहिती
दिली. दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर होणाऱ्या या महोत्सवाच्या मंडळाची स्थापना
उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या महोत्सवात राज्याच्या
कला आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात येणार आहे.
****
कष्टकरी आणि शेतकरी हिताच्या
आड येणाऱ्याला आमचा पाठिंबा नाही,
असं राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल सातारा जिल्ह्यात दहिवडी
इथं एका शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी हितासाठी एकत्र येऊन संघर्ष करण्याचं
आवाहन पवार यांनी यावेळी केलं. जनतेच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचं लक्ष नसल्याची
टीका त्यांनी केली.
पवार यांनी काल कोल्हापूर इथं
देखील सभा घेऊन केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे चारावा भाग असेल. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या
यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल.
दरम्यान, ग्रीसचा दौरा आटोपून पंतप्रधान आज
सकाळी बंगळुरु इथं दाखल झाले. ते आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रोच्या शास्त्रत्रांची
भेट घेणार असून,
चांद्रयान
- तीन च्या यशस्वी अवतरणाबद्दल त्यांचं अभिनंदन करणार आहेत.
****
परभणी इथं उद्या मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत, ‘शासन आपल्या दारी’
हा उपक्रम
घेण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या
कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध विभागाच्या वीस लाभार्थ्यांना
लाभ वितरण केलं जाणार आहे,
शासकीय विभागातल्या
विविध योजनांची माहिती देण्यासाठी ऐंशी दालनं उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत
महारोजगार मेळाव्याचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे.
****
लातूर इथं परवा 'महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत
महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन
भवन सभागृहात सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार असून, अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असं आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली
चाकणकर यांनी केलं आहे.
****
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची
चर्चा होऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज, भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश
प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केली. ते काल उस्मानाबाद इथं मराठवाडा मुक्ती संग्राम
अमृत महोत्सव समितीच्या वतीनं,
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक वार्तापत्र, या पाक्षिकाच्या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिक भास्करराव
नायगावकर, बुवासाहेब जाधव आणि शेषराज
बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित
जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु शासनाकडून शिष्यवृत्ती प्राप्त न झाल्यामुळे
विद्यार्थ्यांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रांसाठी महाविद्यालयाकडून अडवणूक करण्यात येत
असल्याचं निदर्शनास आले आहे. तरी महाविद्यालयांनी अडवणूक न करता विद्यार्थ्यांना त्यांचे
आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत,
असं आवाहन
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
हिंगोली इथं काल एकता दौड घेण्यात
आली. संत नामदेव पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेल्या या दौडमध्ये खेळाडू, पोलीस अधिकारी, सर्व प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या
संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या
हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात लिंग निदान
प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या भागात
संशयित सोनोग्राफी केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी दिल्या. त्या काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत जिल्ह्यातल्या सर्व
शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये आणि सर्व आरोग्य संस्था
तंबाखूमुक्त ठेवण्याच्या सूचना दिल्या.
****
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात
काल राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याचं उद्घाटन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आर.व्हि.गलांडे यांच्या
हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. नागरिकांमध्ये मरणोत्तर धार्मिक विधीप्रमाणेच
मृत व्यक्तीचं नेत्रदान करण्याबाबतचा वैज्ञानिक विधी रुजवणं आवश्यक असल्याचं मत, दोमकुंडवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
जिल्हा शल्यचिकित्सक गलांडे यांनी,
जिल्ह्यातच
नेत्रपेढी आणि प्रत्यारोपण केंद्र कार्यान्वित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे
आदेश दिले.
****
राष्ट्रीय अंधत्व निवारण मोहिमेंतर्गत
हिंगोली इथं काल रांगोळी तसंच भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. नितीन तडस यांनी यावेळी नागरिकांना नेत्रदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.
****
हंगेरीमधल्या बुडापेस्ट इथं
सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता
भालाफेकपटू नीरज चोप्रा अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. यासोबतच पॅरीस इथं होणाऱ्या
ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही नीरजनं पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेतला अंतिम सामना उद्या
२७ ऑगस्टला होणार आहे.
****
डेन्मार्कमधल्या कोपनहेगन इथं
सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या
एच एस प्रणॉयनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या
सामन्यात प्रणॉयनं डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेन चा १३ - २१, २१ - १५, २१ - १६ असा पराभव केला.
****
बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या
आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा संघटनेच्या जागतिक स्पर्धेत भारतीय महिला अंध क्रिकेट संघ
अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारतीय अंध महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा १६३ धावांनी
दणदणीत पराभव करत इतिहास घडवला आहे. आज इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना होणार आहे.
****
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे
अभिव्यक्ती मताची “व्हाईस ऑफ वोट” या अंतर्गत जाहिरात निर्मित ध्वनिचित्रफित, भित्तीपत्रक आणि घोषवाक्य या स्पर्धेचं
आयोजन करण्यात आलं आहे. जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालय तसंच सर्जनशील
कलाशिक्षण महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन, बीडचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवकुमार
स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केलं आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र-ईव्हीएमद्वारे
मतदान प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याचा आरोप डॉ आंबेडकर सेना या संघटनेनं केला आहे.
पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावं, किंवा ईव्हीएम आणि मतपत्रिका दोन्ही द्वारे मतदान घेऊन, ज्यावर अधिक मतदान नोंदवलं जाईल, ते ग्राह्य धरावं, अशी मागणी आंबेडकर सेनेनं केली आहे.
या मागणीचं पत्र संघटनेच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आलं
आहे.
****
लातूर इथं काल जिल्हास्तरीय
रानभाज्या महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात आहारतज्ज्ञ प्रियंका शेंडगे यांनी रानभाजांच्या
गुणधर्माबद्दल माहिती दिली. ‘ओळख रानभाज्यांची’ या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment