Saturday, 26 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 26.08.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 26 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. बंगळुरु इथं आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. चांद्रयान - तीनच्या चंद्रावर यशस्वी अवतरणानंतर इसरोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान ग्रीस हून थेट बंगळुरु इथं आले होते. त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिक आणि सर्व संबंधितांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी चांद्रयानाची प्रक्षेपण प्रक्रिया जाणून घेतली. चांद्रयान तीन चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. चांद्रयान तीन चंद्रावर उतरण्याचा क्षण अविस्मरणीय असून, या यशानं भारताचा गौरव वाढला आहे. या यशामागे वैज्ञानिकांचं समर्पण, प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. 

तत्पूर्वी बंगळुरु इथं हिंदुस्थान एरॉनॉटिकल डिपार्टमेंट - एच ए एल च्या विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधानांनी तिथं जमलेल्या नागरीकांना जय जवान, जय किसान, जय विज्ञानचा नारा दिला.

****

सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं, एक नऊ चार सात, ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरु केली आहे. आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाइन चोवीस तास सुरु राहणार असून, नागरिकांना त्वरित सहाय्य मिळवण्यासाठी सोयीचं ठरणार आहे. या हेल्पलाईनवरून १२ भाषांमधून संवाद साधता येणार आहे.

****

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. त्यांनी शंभराहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे. लाल पत्थर, बाजीगर, हम आपके हैं कौन, मैंने प्यार किया, जुड़वा 2, मुसाफिर, शूट आउट एट लोखंडवाला, यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी कोहली यांनी लिहिलेली गाणी विशेष लाकेप्रिय ठरली.  

****

कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती संचालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याचं, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, महाजन यांनी आज लासलगाब बाजार समितीला भेट देऊन कांदा उत्पादक शेतकर्यांशी चर्चा केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे चारावा भाग असेल. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल.

****

परभणी इथं उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत, ‘शासन आपल्या दारीहा उपक्रम घेण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध विभागाच्या वीस लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहेत.

****

सातारा शहर आणि पाटण तालुक्यातल्या गोषटवाडी परिसरात झालेल्या दोन अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

सातारा शहरात प्रवासी वाहनाने टेम्पोला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथल्या एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य एका अपघातात गोषटवाडी इथं मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकीवरचे दोन युवक ठार झाले.

****

वाशिम जिल्ह्यातल्या लोणी जवळ रिसोड - औरंगाबाद या शिवशाही बसचं टायर अचानक निखळलं. चालत्या बसचं टायर निखळल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्यांनी बस थांबवली. चालकाच्या प्रसंगावधानाने सुमारे ४० प्रवाशी सुखरुप असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

डेन्मार्कच्या कोपनहेगन इथं सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज भारताच्या एच एस प्रणॉयचा सामना थायलंडच्या के कुलनावूत वितिदसर्न सोबत होणार आहे. काल झालेल्या सामन्यात प्रणॉयनं डेन्मार्कच्या विक्टर एक्सलसेनचा १२ - २१, २१ - १५, २१ - १६ असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली आहे.

पुरुष दुहेरीत मात्र सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीला डेन्मार्कच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...