Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 21 August 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ ऑगस्ट
२०२३ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढिसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात
राज्यातल्या काही बाजारपेठा आज बंद आहेत. नाशिक मधल्या बाजार समित्यांमध्ये आज लाक्षणिक
बंद पुकारण्यात आला असून, कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कांद्याचा प्रश्न नाशिक जिल्ह्यामध्ये पेटला असून, स्वाभिमानी
शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आज दिंडोरी तालुक्यातल्या
वणी इथं रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
शेतमालाचे भाव वाढले की केंद्र सरकार हस्तक्षेप करुन भाव पाडते, महागाई
कमी होत नाही, मात्र तिकडे लक्ष न देता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालावर डोळा ठेवत असल्याचा
आरोप, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी यावेळी केला.
अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार समित्या देखील या बंदला पाठिंबा देत असल्याचं
किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी सांगितलं आहे.
मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये
व्यापार सुरळित सुरू आहे. या बंदला पाठिंबा देण्याबाबत आज संध्याकाळी बैठक घेवून निर्णय
घेतला जाईल, अशी माहिती, कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी दिली आहे. बाजार समितीमध्ये
आज ११० गाडी कांदा आवक झाली असून, दर १८ ते २२ रूपये दरम्यान असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, कांदा निर्यात शुल्क वाढवल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथं वार्ताहरांशी
बोलत होते. हा देश शेतकर्यांचा आहे की कारखानदारांचा असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित
केला.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौर्यासाठी आज सकाळी जपान
मध्ये दाखल झाले. या दौर्यात ते जपानमधल्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा
यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या ते भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्यांनाही भेटणार आहेत. जपानमधल्या बुलेट
ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सलासुद्धा या दौर्यात फडणवीस भेट देणार आहेत.
****
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आज बारा ज्योतिर्लिंगासह ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये
भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ इथं दर्शनासाठी भाविकांनी
मध्यरात्रीपासूनच मोठ्या रांगा लावल्या आहेत. मध्यरात्री दोन वाजता तहसीलदार विठ्ठल
परळीकर यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर मंदिर खुलं करण्यात आलं. भाविकांची
संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज नागपंचमीचा सण देखील साजरा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या
नाग आणि सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी करण्यात येते.
****
भारतीय जनता पक्षाच्या 'संपर्क से समर्थन' अभियानाअंतर्गत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरमध्ये आज रॅली
काढण्यात आली. या अभियानांतर्गत नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत त्यांना केंद्र सरकारच्या
विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. राज्यात ४५ हून अधिक जागा भाजपा आणि मित्र पक्षांना
मिळतील असा विश्वास, बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राजुर इथल्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ
स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाच्या
न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या हस्ते झालं. भारतीय संविधानाने आपणाला अधिकार
दिले आहेत किंवा त्यांच्यासाठी ज्या तरतुदी
करून दिल्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी सुद्धा अधिकार आहेत, मात्र
प्रत्येकाने कायदा पाळला पाहिजे, असं त्या यावेळी म्हणाल्या.
****
अझरबैजान मधल्या बाकु इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत
भारतानं पुरुष आणि महिला संघांनी आज सुवर्ण पदक पटकावलं आहे.
महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात रिदम सांगवान, इशा सिंग
आणि मनु भाकरे यांच्या संघानं एक हजार ७४४ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत अझरबैजान संघाचा
पराभव केला. तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पी सांघिक प्रकारात अखिल शरवरन, ऐश्वर्य
प्रताप तोमर आणि नीरज कुमार या भारतीय संघानं सुवर्ण पदक पटकावलं.
पुरुषांच्या वैयक्तिक ५० मीटर रायफल थ्री पी प्रकारात अखिल शेओराननं ४५० गुणांची
कमाई करत कांस्य पदक जिंकलं.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं
दिला आहे.
****
No comments:
Post a Comment