Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· महाराष्ट्र
हे देशाच्या आर्थिक विकासाचं प्रतीक;उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपालांचं प्रतिपादन
· कांद्याच्या
राखीव साठ्याची मर्यादा पाच लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचा केंद्राचा निर्णय तर
निर्यात शुल्क वाढ रद्द करण्याची कांदा उत्पादक संघटनांची मागणी
· जागतिक
खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून भारताचा दुसरा क्रमांक
· शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना प्रदान
· ४३
व्या मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जगदीश कदम यांची निवड
· दुसऱ्या
टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा पराभव करत भारताची विजयी आघाडी
आणि
· अशियाई
ज्युनिअर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंग हिला सुवर्णपदक
सविस्तर
बातम्या
महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक
विकासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. राज्यशासनाचे
पहिले उद्योग पुरस्कार काल मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. भारताला
विकसित राष्ट्र बनवण्यात महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजवावी, असंही राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यात
कोविडची लस विकसित करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार
प्रदान करण्यात आला. १५ लाख रुपये,
सन्मानचिन्ह
आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर
यांना उद्योगिनी पुरस्कार,
आणि विलास
शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्कारांचं
स्वरुप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
यावेळी केलेल्या भाषणात,
राज्याच्या
विकासात उद्योग क्षेत्राचं मोठं योगदान असल्याचं सांगत, या पुरस्काराच्या माध्यमातून उद्योग विश्वाचा सन्मान करता
आल्याची भावना व्यक्त केली. राज्यात उत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. ते म्हणाले..
Byte…
खरं म्हणजे आपलं
राज्य आहे, हे आता इंडस्ट्रीसाठी फेव्हरेट
डेस्टीनेशन झालेलं आहे. अनेक लोकं इच्छुक आहेत, या आपल्या राज्यामध्ये
गुंतवणूक करण्यासाठी. कारण आपल्याकडे चांगलं पोटेंशियल
आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्कील्ड मॅन पॉवर
आहे. आपल्याला एवढ्यावरच संतुष्ट होऊन चालणार नाही. तर आपल्याला राज्यामध्ये
मॅन्युफॅक्चरींग सेक्टर देखील अधिक वाढवायचंय. त्यासाठी आपल्या
लोकांचीच मदत आवश्यक आहे.
दरम्यान, या पुरस्काराअंतर्गतचा राज्याचा पहिला
उद्योग रत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते परवा शनिवारी प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठीचं
सन्मानचिन्ह टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना काल प्रदान करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी
यावेळी बोलताना,
राज्य सरकारच्या
प्रयत्नांतून महाराष्ट्र हे येत्या काळात प्रत्यक्ष गुंतवणूकीत देशात पहिल्या क्रमांकावरचं
राज्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर
उपमुख्यमंत्री पवार यांनी,
राज्यातल्या
तरुणांनी आजच्या पुरस्कार विजेत्यांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी
यावेळी बोलताना,
उद्योगाच्या
बाबतीत राज्य झपाट्यानं पुढं जात असून,
आतापर्यंत
१ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. यापैकी ७७ टक्के
करारांवर अंमलबजावणी झाली असून,
१ लाख ६
हजार कोटी रुपयांच्या उद्योगांना देकार पत्रही देण्यात आलं आहे.
****
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे यांनी पक्षाची नवी कार्यकारी समिती
काल जाहीर केली आहे. ३९ सदस्यांच्या
या समितीत खर्गे यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अधीर रंजन चौधरी, ए के अँटोनी, दिग्विजय सिंग, शशी थरुर, तर राज्यातून मुकुल वासनिक आणि अशोक
चव्हाण यांचा समावेश आहे. १८ कायमस्वरुपी निमंत्रितांमध्ये चंद्रकांत हंडोरे यांना
स्थान मिळालं आहे. तर १३ विशेष निमंत्रितांमध्ये यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांचा
समावेश आहे. १४ राज्य प्रभारी नियुक्त केले असून, त्यात माणिकराव ठाकरे आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे.
****
केंद्र सरकारनं कांद्याच्या
राखीव साठ्याची मर्यादा पाच लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं
यावर्षी ३ लाख मेट्रिक टन इतक्या प्राथमिक खरेदीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं, ते गाठल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. सध्या जिथे कांद्याच्या
किरकोळ किंमती राष्ट्रीय सरासरीपेक्षा,
किंवा या
आधीच्या महिन्यांच्या तुलनेत जास्त आहेत अशा ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये या राखीव साठ्यामधून
कांद्याची विक्री सुरू झाली असल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे.
****
दरम्यान, कांदा निर्यातीच्या शुल्कात ४० टक्के
वाढ केल्याच्या निर्णयाविरोधात नाशिक मधल्या बाजार समित्यांमध्ये आज लाक्षणिक बंद पुकारण्यात
आला आहे. तर नाशिक जिल्हा कांदा उत्पादक संघटनेच्या बैठकीत आज कांदा लिलाव बंद ठेवण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकसह राज्यातल्या कांद्याचे कंटेनर हे निर्यातीसाठी निघालेले
आहेत त्यांच्याबाबत शुल्काचा काय निर्णय होणार, तसंच शुल्कासंदर्भातल्या अन्य स्पष्टीकरणासाठी हा बंद पाळण्यात
येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
कांद्यावर निर्यात शुल्क वाढवण्याचा
निर्णय मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे
यांनी केली आहे. हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी
दिला आहे.
दरम्यान, देशातली कांद्याची स्थिती म्हणजेच
मागणी आणि पुरवठा बघूनच केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेतला असावा, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
भारती पवार यांनी म्हटलं आहे. कांदा निर्यात शुल्क वाढीसंदर्भात संबंधित मंत्रालयाशी
पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेच्या
प्रगतीसाठी केंद्र सरकारनं हरित हायड्रोजनविषयक मानकं निश्चित केली आहेत. यासंबंधीची
अधिसूचना नविन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं काल जारी केली. या अधिसूचनेनुसार उत्पादित
होणाऱ्या हायड्रोजनचं हरित हायड्रोजन असं वर्गीकरण करता यावं, यासाठी उत्सर्जनातले घटक आणि त्यांचं
प्रमाण काय असावं,
याची पातळी
आखून देण्यात आली आहे. तसंच विद्युत विघटन होणारा आणि जैव विघटनशील, अशा दोन्ही प्रकारात समाविष्ट होणाऱ्या
पदार्थांचा, हायड्रोजन उत्पादन पद्धतीमध्ये
समावेश केला जाऊ शकणार आहे. या अधिसूचनेमुळे, भारत हा हरित हायड्रोजन विषयक आपली व्याख्या आणि संकल्पना
जाहीर करणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांपैकी एक देश बनला आहे.
****
भारताचं चांद्रयान परवा बुधवारी
२३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार
आहे. या ऐतिहासिक घटनेचं,
भारतीय अंतराळ
संशोधन संस्था-इस्रोचं संकेतस्थळ,
फेसबूक पेज, यू ट्यूब चॅनल तसंच दूरदर्शनच्या
डीडी नॅशनल या वाहिनीवरून,
थेट प्रसारण
केलं जाणार आहे. सध्या हे यान आणि चंद्र यांच्यातलं सरासरी अंतर किमान २५ किलोमीटर, तर कमाल अंतर १३४ किलोमीटर इतकं असल्याचं
इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा ही
कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत अद्याप
कोणत्याही देशाला पोहोचता आलेलं नाही.
दरम्यान, रशियाचं लुना - २५ हे यान दक्षिण
ध्रुवाजवळ उतरताना अपघातग्रस्त झालं. त्यामुळे रशियाची ही मोहीम अपयशी ठरली आहे.
****
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र
आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेत,
भारतानं
चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून,
दुसरं स्थान
पटकावलं आहे. पोलंडच्या चोरझॉफ इथं दहा ऑगस्टपासून सुरू असलेल्या या ऑलिम्पियाडचा काल
समारोप झाला. या स्पर्धेत सहभागी भारताच्या संघातल्या महाराष्ट्रातल्या नागपूरच्या
आकर्ष राज सहाय याच्यासह,
राजस्थानच्या
कोटा इथला राजदीप मिश्रा,
आंध्र प्रदेशच्या
कुर्नूल इथला कोडूरु तेजेश्वर आणि पश्चिम बंगालच्या कोलकाता इथला मोहम्मद साहिल अख्तर
या चौघांना सुवर्णपदक,
तर कर्नाटकातल्या
बंगरुळूच्या सैनवनीत मुकुंद याला रौप्य पदक मिळालं आहे. युनायटेड किंगडमनं पाच सुवर्णपदकं
मिळवून पहिलं स्थान पटकावलं. पन्नास देशांमधून २३६ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला
होता.
****
पुण्यातल्या कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे
दिला जाणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार, काल ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला.
पुणे इथं झालेल्या या समारंभात,
राज्याचे
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सराफ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र
शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशेवं वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून
साजरं केलं जात असून,
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना, प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती
देण्यात येईल,
अशी घोषणाही
त्यांनी यावेळी केली.
****
४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश
कदम यांची एकमतानं निवड झाली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक
काल परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
येत्या दोन ते चार डिसेंबर दरम्यान हे संमेलन औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर इथं होणार
आहे. जगदीश कदम यांचे रास आणि गोंडर,
झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर हे कवितासंग्रह, मुडदे, आखर, मुक्क्याला फुटले पाय हे कथासंग्रह, बुडत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह ही नाटकं, यासह विपुल लेखन प्रसिद्ध आहे.
दरम्यान, नववं लेखिका साहित्य संमेलन हिंगोली
इथं घेण्याचा निर्णयही काल मसापच्या बैठकीत घेण्यात आला. हिंगोली इथल्या वामनराव देशमुख
बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं मसापला लेखिका संमेलनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार
जानेवारी २०२४ मध्ये हे संमेलन होणार आहे.
****
जालना इथल्या उर्मी ट्रस्टच्या
वतीनं देण्यात येणारा कविता गौरव पुरस्कार, यंदा कविवर्य प्राचार्य जयराम खेडेकर यांना जाहीर झाला
आहे. तर याच संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. दादा गोरे यांना त्यांच्या समग्र
वाङ्गमयीन कार्यासाठी जाहीर झाला आहे. उर्मीच्याच वर्ष २०२२ च्या गोदावरी राज्य काव्य
पुरस्कारासाठी,
माजलगावच्या
कवयित्री कविता बोरगावकर यांची,
तर वर्ष
२०२३ च्या पुरस्कारासाठी,
कवयित्री
सीमा पाटील-केजकर यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेचा विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय
कार्यासाठीचा वर्ष २०२३ चा जीवनगौरव पुरस्कार, आरोग्य क्षेत्रातील सेवेबद्दल, जगन्नाथराव खंडागळे यांना जाहीर झाला
आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी जालन्यात अग्रसेन भवन इथं हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते
प्रदान केले जाणार आहेत.
****
डबलिन इथं काल झालेल्या दुसऱ्या
टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं आयर्लंड ३३ धावांनी विजय मिळवला. भारतानं
प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात आलेला आयर्लंडचा संघ २० षटकात आठ गडी गमावत
१५२ धावाच करु शकला. या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य
अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
चीनच्या डालियान इथं झालेल्या
१७ वर्षाखालील अशियाई ज्युनिअर स्क्वॅश वैयक्तिक स्पर्धेत, भारताच्या अनाहत सिंग हिनं सुवर्णपदक
पटकावलं आहे. १५ वर्षीय अनाहतनं अंतिम फेरीत हाँगकाँगच्या इना क्वोंगचा तीन - एक असा
पराभव केला.
****
भारताचा बुध्दीबळपटू ग्रँडमास्टर
आर. प्रज्ञानंद याचं अझरबैजानमधल्या बाकू इथं सुरू असलेल्या फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ
स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला,
फँबियानो
करूआना विरुद्धचा आपला डाव बरोबरीत सोडवला आहे. ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद याच्यानंतर
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला तो दूसरा भारतीय आहे. भारताच्या एकूण
चार खेळाडूंनी या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत धडक मारली होती, त्यापैकी केवळ आर. प्रज्ञानंद याचं
स्पर्धेतलं आव्हान अजून कायम आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या घर चलो
या जन संपर्क अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. या अभियानातून भाजपानं एका महिन्यात
तीन कोटी जनतेशी संवाद साधण्याचं उद्दीष्ट ठेवलं असून, पहिल्या टप्प्यात २४ टक्के क्षेत्र तर उर्वरित क्षेत्र
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पूर्ण केलं जाणार आहे. मुंबई इथं अभियानाचा समारोप होणार
आहे.
औरंगाबाद इथं पक्षाचे प्रदेश
सरचिटणीस संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाला प्रारंभ झाला. मोदी सरकारने
गेल्या ९ वर्षांत केलेल्या विकासकामाची तसंच राबवलेल्या योजनांची माहिती देणारी पत्रकं
घरोघरी वितरित करण्यात आली.
****
केंद्र शासनाच्या सेवेला नऊ
वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन
भरवण्यात आलं आहे. भक्त निवास क्रमांक दोनमध्ये भरवलेलं हे प्रदर्शन २२ तारखेपर्यंत
चालणार आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती
घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी केलं आहे.
****
खासदाराची बनावट सही करून दहा
कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी,
पालघर जिल्हा
परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हबीब शेख यांना अटक करण्यात आली आहे. खासदार
राजेंद्र गावित यांच्या नावाचं बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर गावित यांची बनावट
सही करून, सरकारची १० कोटी रुपयांची फसवणूक
केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खासदार गावीत यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख यांच्यावर
ही कारवाई करण्यात आली.
****
लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या
ट्रकला झालेल्या अपघातातले,
सातारा जिल्ह्याच्या
फलटण तालुक्यातल्या राजाळे इथले मृत सैनिक वैभव भोईटे यांचा पार्थिव देह उद्या त्यांच्या
गावी आणला जाणार आहे. परवा संध्याकाळी सैनिकांचा ट्रक खोल दरीत कोसळून हा अपघात झाला
असून, यात भोईटे यांच्यासह नऊ सैनिकांचा
मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात तुर्काबाद
खराडी इथल्या ग्रामपंचायत सभागृहात काल महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचं
तालुका अधिवेशन घेण्यात आलं. २५ गावातील सुमारे २०० स्त्री पुरुष या अधिवेशनाला उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment