Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· जुन्या
चालीरीती मोडीत काढून नव्या संकल्पना स्वीकारणं आवश्यक-राष्ट्रपतींचं प्रतिपादन
· कांदा
प्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार
· भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड योजनेतून खतांसाठी १०० टक्के अनुदान
· औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बालिका गृह सुरु करण्यासाठी
बाल हक्क संरक्षण आयोग शासनाकडे पाठपुरावा करणार
· पायाभूत
सुविधा योजनांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं-केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव
दानवे यांचे निर्देश
· नागपूर-मुंबई
समृद्धी महामार्गावर छायाचित्रण करण्यास पोलिस प्रशासनाकडून मनाई
आणि
· आयएसएसएफ
नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघाला सुवर्ण पदक
सविस्तर
बातम्या
जुन्या चालीरीती मोडीत काढून
नव्या संकल्पना स्वीकारणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत
सैनिक पत्नी कल्याण संघटनेनं घेतलेल्या अस्मिता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशात
महिलांची संख्या ५० टक्के इतकी असून,
त्या देशाच्या
विकासाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पुरुषांच्या मदतीविना स्त्रिया
स्वतःच्या बळावर झुंजून प्रगती करून दाखवू शकतात, असे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी यावेळी काढले. प्रत्येक
यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, या म्हणीऐवजी आता प्रत्येक यशस्वी पुरुषाला एका स्त्रीची
साथ असते, अशी म्हण प्रचलित व्हायला हवी, असं मत त्यांनी मांडलं. राष्ट्रपतींनी
या प्रसंगी सर्व वीर महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान गौरवण्यात
आलेल्या वीर महिलांचं आणि त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संघटनेचं त्यांनी विशेष कौतुक
केलं.
****
राज्यसभेच्या नऊ नवनिर्वाचित
सदस्यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह
तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन,
सुखेंदू
शेखर रॉय, आदी मान्यवरांचा समावेश आहे.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसद भवनात या सर्वांना सदस्यत्वाची शपथ दिली.
****
कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा
करून राज्य सरकार तोडगा काढणार असल्याची ग्वाही, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री
दादा भुसे यांनी दिली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. याआधी
कांद्याचे दर क्विंटलमागे ३००ते ४०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यावेळी राज्य
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. आताही नागरिकांना कांदा मुबलक उपलब्ध होईल
आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल,
असा तोडगा
काढला जाईल असं आश्वासन भुसे यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ
केल्याच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही बाजार
समित्यांमध्ये लाक्षणिक बंद पुकारला असून, कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, विंचूर यासह काही बाजार समितीमध्ये
कांद्याचे किरकोळ लिलाव झाले मात्र बहुतांशी ठिकाणी लिलाव बंद होते. स्वाभिमानी शेतकरी
संघटनेच्या नेतृत्वाखाली व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी काल दिंडोरी तालुक्यातल्या
वणी इथं रस्ता रोको आंदोलन केलं. येवला इथं येवला कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ मनमाड
मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तर जिल्ह्यात ठिकठिकाणी तहसीलदारांना
निवेदनं देण्यात येत आली.
चांदवड तालुक्यात माजी आमदार
शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांनी निर्यात शुल्क कमी करावं, यासाठी निवेदन देण्यात आलं, तर नाशिक मध्ये स्वराज्य पक्षाचे
करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन दिलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार समित्या देखील या बंदला पाठिंबा देत असल्याचं
किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी सांगितलं.
****
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड
योजनेतून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी
काल फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा केली. या योजनेत १५ फळपिकांचा समावेश असून, याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना १००
टक्के अनुदान देण्यात येतं,
त्याचबरोबर
आता या योजनेतून आवश्यक खतांसाठीदेखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचं, मुंडे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
राज्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करत मुंडे
यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती
दिली.
****
लम्पी रोग नियंत्रणासाठी राज्यातल्या
सर्व गोवंशीय पशुधनाचं येत्या सात दिवसांत १०० टक्के लसीकरण करण्याचे निर्देश, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी दिले आहेत. राज्यातल्या लम्पी रोगाच्या संसर्ग आणि लसीकरणाच्या आढावा बैठकीत
ते काल बोलत होते. गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य आणि संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा
झालेला प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी, राज्यात आतापर्यंत ७३ टक्के लसीकरण झालं आहे. या रोगाने
मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणेचा सहभाग घ्यावा, केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक
सूचनांनुसार उपचार,
विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मृत
पशुधनाची विल्हेवाट इत्यादींबाबत काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
****
धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी
काळानुरुप सुधारणा आवश्यक असल्याचं,
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी म्हटलं आहे. काल मंत्रालयात यांसदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराऊ क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक
तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास,
या बांधवांच्या
सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा
शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल,
यादृष्टीने
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पवार यांनी केल्या.
****
राज्यभरात काल तलाठी भरती परीक्षा
दोन तास उशिराने सुरू झाली. टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर मध्ये बिघाड झाल्यानं हा उशीर
झाला. राज्यातल्या जवळपास ३० जिल्ह्यांतल्या ११५ केंद्रावर टीसीएसच्या माध्यमातून तलाठी
भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जात आहे. परीक्षार्थींना झालेल्या मनस्तापाबाबत टीसीएस
कंपनीच्या समन्वयकाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
याप्रकरणी विरोधी पक्ष नेते
विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत
सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्ट झाली आहे, असं ते म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे
‘एकनिष्ठतेची मोहीम’ राबवण्यात येत आहे. या एकनिष्ठतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी
सदस्याला वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे. यानंतर सदस्याला अधिकृत डिजीटल कार्ड जारी
होईल. ही एकनिष्ठतेची मोहीम गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत राबवण्यात येत आहे.
****
चांद्रयान -तीन मोहिमेतील लॅण्डर
मॉड्यूल चंद्रावर उतरवण्यासाठी सुरक्षित स्थान शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली
आहे. लॅन्डरवर कार्यरत असणाऱ्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं चंद्राच्या पृष्ठभागाची काही
छायाचित्र घेण्यात आली आहेत. हा कॅमेरा अहमदाबादच्या अंतराळ उपयोजिता केंद्रानं तयार
केला आहे. या कॅमेऱ्यानं टिपलेली चंद्राच्या पृष्ठभागाची ही छायाचित्रे इस्रोनं काल
प्रसारित केली. हे मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवारी संध्याकाळी सहा वाजून
चार मिनिटांनी उतरवण्यात येणार आहे.
दरम्यान, इस्रोचे अध्यक्ष डॉ एस सोमनाथ यांनी
काल अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची भेट घेऊन, चांद्रयान चंद्रावर उतरवण्यासाठीची
स्थिती आणि तयारी याविषयी माहिती दिली. सर्व यंत्रणा सुरळीतपणे काम करत असून, चांद्रयानाची अवतरण प्रक्रिया सुरक्षित
होईल, असा विश्वास जितेंद्र सिंह
यांनी व्यक्त केला.
****
मुंबईत १६ व्या आंतरराष्ट्रीय
खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिंपियाड २०२३ मध्ये चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवून
दुसरं स्थान पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात काल गौरव करण्यात आला.
सुवर्ण पदक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूरच्या आकर्ष राज सहाय या विद्यार्थ्याचा
समावेश आहे.
****
जपान दौऱ्यावर गेलेले राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रमुख उद्योजकांच्या बैठका घेतल्या. अधिकाधिक
जपानी कंपन्या महाराष्ट्रात आणणं,
मराठी विद्यार्थ्यांना
जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं आणि जपानमधल्या मराठी उद्योजकांच्या
विकासासाठी पावलं उचलणं,
इत्यादी
विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
औरंगाबाद,
जालना,
हिंगोली
आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात बालिका गृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
असल्याचं, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या
अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं काल महाराष्ट्र राज्य बाल हक्क
संरक्षण आयोगामार्फत ‘पोक्सो’ आणि बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा
घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या काल बोलत होत्या. बाल लैंगिक गुन्ह्यांच्या घटना घडल्यास
तातडीने नोंद घेतली जावी,
याबाबत पोलीस
प्रशासनाला सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.
येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल,
असं शहा
म्हणाल्या.
****
केंद्र सरकारच्या आवास, पाणीपुरवठा, शिक्षण, शहरी विकास अंतर्गत सर्व पायाभूत
सुविधा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, आणि दिशा समितीकडे अहवाल सादर करावा, असे निर्देश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
तथा जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी दिले
आहेत. काल औरंगाबाद इथं झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गृहनिर्माण मंत्री
अतुल सावे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल
सत्तार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे,
खासदार इम्तियाज
जलील यावेळी उपस्थित होते. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये सर्वांना ‘हर घर नल से जल’,
तसंच पंतप्रधान
आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडेल अशा घराची निर्मिती या योजनांचा गती देण्याबाबत
बैठकीत चर्चा झाली.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर
रील्स किंवा छायाचित्र काढण्यास पोलिस प्रशासनाकडून मनाई करण्यात आली असून, या आदेशाचं पालन न करणाऱ्यांना ५००
रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. वाहतूक विभागाकडून याबाबतचे
आदेश जारी करण्यात आले आहेत. औरंगाबादनजीक दौलताबादजवळील महामार्गाच्या पुलावर, हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचं
आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर,
वाहतुक पोलिसांनी
हा आदेश जारी केला आहे. या महामार्गावर गेल्या डिसेंबर पासून आतापर्यंत सुमारे ४००
पेक्षा अधिक अपघातांची नोंद झाली आहे.
****
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी
भारतीय क्रिकेट संघ काल जाहीर करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक
पंड्या यांच्यासह या संघात विराट कोहली, शुभमन गिल,
श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसन्न कृष्णा, आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे.
****
अझरबैजान मधल्या बाकु इथं सुरु
असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्ण
पदक पटकावलं आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात, रिदम सांगवान, इशा सिंग आणि मनु भाकर यांच्या संघानं, एक हजार ७४४ गुणांची कमाई करत अंतिम
फेरीत अझरबैजान संघाचा पराभव केला. तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पी सांघिक प्रकारात
अखिल शरवरन, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज
कुमार या भारतीय संघानं सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या वैयक्तिक ५० मीटर रायफल थ्री
पी प्रकारात अखिल शेओराननं ४५० गुणांची कमाई करत कांस्य पदक जिंकलं.
****
डेन्मार्क इथं सुरु असलेल्या
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉय आणि लक्ष्य
सेननं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात प्रणॉयनं फिनलँडच्या कल्ले
कोलजोनेन याचा २४ - २२,
२१ - १०
असा, तर लक्ष्यनं मॉरिशसच्या जॉर्जेस
ज्यूलियन पॉल चा २१ - १२,
२१ - ७ असा
पराभव केला. किदांबी श्रीकांतचं या स्पर्धेतलं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं.
****
काल पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्तानं
ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बीड जिल्ह्यात परळी
इथं वैद्यनाथ,
हिंगोली
जिल्ह्यात औंढा इथं नागनाथ,
तर औरंगाबाद
जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी काल पहाटेपासूनच मोठ्या रांगा
लागल्या होत्या.
****
नागपंचमीचं औचित्य साधून काल
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ गावात सापांविषयी लोकांच्या
मनातील अंधश्रद्धा दूर करत शेतकऱ्यांसाठी जागृती मोहिम राबवण्यात आली. सापांच्या विविध
जातींपैकी ९५ टक्के साप हे बिनविषारी असून फक्त पाच टक्के साप विषारी असल्याची माहिती
यावेळी देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या
प्रमाणात संसर्गात वाढ होत असून,
रोग नियंत्रणासाठी
पशुपालकांसह ग्रामपंचायत पातळीपर्यंत पशूसंवर्धन विभागाने योग्य ती दक्षता घेण्याचं
आवाहन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी
केलं आहे. लम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते काल बोलत
होते. नांदेड जिल्हा दोन राज्यांच्या सीमांवर असल्यामुळे जिल्ह्यात अन्य ठिकाणाहून
आजारी जनावरे येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी
दिल्या. आठवडी बाजाराच्या ठिकाणी लसीकरण शिबीरं भरवून पशुपालकांना जनावरांच्या निगा
आणि सुश्रृषेबाबत व्यापक मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. जिल्ह्यात सध्या ५१२ पशूंना या रोगाचा संसर्ग झाला असून
यात वासरांचं प्रमाण अधिक आहे.
****
बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरात
पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी
अग्रीम पीक विमा देण्यात यावा,
तसंच खरीप
हंगामातील कर्जमाफी करण्यात यावी,
अशी मागणी, आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे
पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांपासून पाऊस झाला नाही. पीकवाढीच्या
दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकांचं ५० टक्क्यांपेक्षा
अधिक नुकसान झाल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. याबाबतचा योग्य प्रस्ताव शासनाकडे
सादर करण्याची विनंती क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
****
No comments:
Post a Comment