Wednesday, 23 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      भारताच्या चांद्रयानाचं चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर यशस्वी अवतरण.

· केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सचिन तेंडुलकर यांची 'राष्ट्रीय सदिच्छा दूत' म्हणून नियुक्ती.

·      डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांना प्रदान.

आणि

·      नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय मागे.

****

भारताच्या चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर यशस्वी अवतरण केलं आहे. आज सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयानातलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे.

and the History has been made. The lander module has landed at the South pole of the moon. and the water, watershed movement. The Honorable Prime Minister Shri Narendra Modi watching the proceedings live from Johansberg in South Africa.

भारत ने इतिहास रच दिया है। इस वक्त चंद्रयान - 3 चंद्रमा के दक्षिण पोल पर उतर चुका है। और भारत विश्व मे पहला देश बन गया है। जो यहां पर उसने लँडिंग की है भारत के चंद्रयान ने।

चंद्रयानाने यशस्वी अवतरण करताच, इस्रोच्या नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ विज्ञान राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जितेंद्र सिंह यांनी या यशाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

मेरे प्यारे परिवार जनों जब हम अपनी आंखो के सामने ऐसा इतिहास बनते हुये देखते है, तो जीवन धन्य हो जाता है। ऐसी ऐतिहासिक घटनायें राष्ट्रजीवन की चिरंजीव चेतना बन जाती है। मै तीन चंद्रयान को, इस्रो को, और देश के सभी वैज्ञानिकों को जी जान से बहोत बहोत बधाई देता हूं।

****

आगामी खरीप विपणन हंगाम २०२३-२४ मध्ये ५२१ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक तांदूळाची खरेदी केली जाईल, असा अंदाज आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तांदूळ खरेदीच्या बाबतीत पंजाब नंतर छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश ही राज्यं आघाडीवर असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची यावर्षीसाठी 'राष्ट्रीय सदिच्छा दूत' म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात तेंडुलकर यांच्याबरोबर तीन वर्षांसाठीच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये, विशेषत: पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं, त्यासाठी मी सदिच्छा दूत म्हणून देशातल्या युवा शक्तीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करेन, असं तेंडुलकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी भवनात आज झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी, मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींची सदिच्छा दूत म्हणून दरवर्षी नियुक्ती केली जाते.

****

राज्यात दूध आणि दुधजन्य पदार्थामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागानं राज्यभर जिल्हानिहाय कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी विभागातील अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय पथके तयार करुन दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय विकास विभाग दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आलेला आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक पदासाठी घेतलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या पात्र ठरलेल्या उमेदावारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहीत कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेकरता प्रवेश दिला जाईल, असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार ज्येष्ठ लोककलावंत प्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांना आज प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या ६५ व्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबाद इथं विद्यापीठाच्या  नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह या स्वरुपाचा हा पुरस्कार मधू कांबीकर यांचे गुरू पांडुरंग घोटकर यांनी कांबीकर यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मधू कांबीकर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. या पुरस्काराच्या उत्तरात केलेल्या भाषणात कांबीकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना, घोटकर यांना भावना अनावर झाल्या. कुलगुरू डॉ येवले यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेत, विविध प्रश्नांवर मात करुन विद्यापीठाला पुढे नेऊ, असा विश्वास व्यक्त केला. विविध परीक्षातील गुणवंत विद्यार्थी तसंच कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. जिल्ह्यातल्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे लिलाव उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. त्यात बाजार समित्या उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी जाहीर केला. नाफेडच्या खरेदीत पारदर्शकता रहावी आणि शेतकऱ्यांना नाफेडची खरेदी कुठे कुठे सुरू आहे, याबाबत विस्तृत माहिती मिळावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

****

कांदा निर्यातीसाठी लावलेले ४० टक्के शुल्क रद्द करावं आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून तत्काळ वितरीत करावी अशी मागणी भारतीय किसान संघानं उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पिक वाढीच्या आणि फुले लागण्याच्या अवस्थेत जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिला आहे, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पिकं करपत आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या पिकविम्याच्या रकमेतून २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पावसाचे निकष न ठेवता पिकांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. तसेच विमा कंपनीबरोबरच आता राज्य सरकारने देखील एनडीआरएफच्या निकषानुसार पंचनामे करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार करता जिल्ह्यात सर्वच मंडळामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती निश्चित करुन नुकसान भरपाई निकषानुसार २५ टक्के अग्रीम विमा द्यावा, अशीही मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

****

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी संघटनेकडून आज हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात गोरेगाव इथं कांद्याची होळी करण्यात आली. सदर निर्यात शुल्क मागे घ्या अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

****

दुबईत सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारताच्या भारोत्तोलकांनी सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. हनी डबास आणि राहुल जोग्राजिया यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डबास यांनं पुरुषांच्या ७२ किलो कनिष्ठ गटात १३२ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवलं. तर जोग्राजियानंही १३२ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा परिषदेच्या वतीनं इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं होत असलेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडचा सात खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी अवघ्या ३० चेंडूत हे लक्ष्य गाठलं.

उद्या बांगलादेशच्या संघाबरोबर भारतीय पुरुष संघाचा, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर महिला संघाचा सामना होणार आहे

****

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या, नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना, थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबत, सुधारीत एक रकमी योजना, ३१ मार्च २०२४ पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावं, असं आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केलं आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी, नांदेड जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, संपर्क साधावा, असं आवाहन महामंडळाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

****

बदली झाल्याबद्दल विना परवानगी मिरवणूक काढल्याबद्दल जालना इथं महावितरणच्या सहायक अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वीच रत्नागिरी इथं बदली झालेल्या या अभियंत्यांची पुन्हा जालन्यात बदली झाल्याबद्दल ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे वाहतुकीस खोळंबा झाल्याबद्दल संबंधित सहायक अभियंत्यासह सुमारे ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणात होत असलेल्या कथित घुसखोरीच्या विरोधात औरंगाबाद इथं बंजारा समाजाच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात विशेष तपासणी पथक नेमून चौकशी करावी, तसंच जातवार जनगणना करावी, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.

****

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचं आज निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. ते १९७२ च्या काळात जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर १७८ पासून तीन वेळा ते अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले होते. विधानसभेत अहिराणीत शपथ घेणारे ते पहिले आमदार होते.

****

No comments: