Thursday, 24 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      इतर मागास प्रवर्गातल्या तरुणांना `गट कर्ज व्याज परतावा` योजनेचा लाभ घेण्याचं मंत्री अतुल सावे यांचं आवाहन.

·      शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांचं अपात्रता प्रकरणी सहा हजार पानी लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना सादर.

आणि

·      ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन.

****

नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून कांदा खरेदी सुरु असून कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाफेडची कांदा खरेदी केंद्रं वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे. सध्या नाफेडकडून ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे असलेला उपलब्ध कांदा पाहता या केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंती केंद्र सरकाएकडे पत्राद्वारे केल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

****

केंद्र सरकारनं ४० टक्के कांदा निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या बाजार समित्यांचे कामकाज आज सकाळी पूर्ववत सुरू करण्यात आले; मात्र नाफेडपेक्षाही कमी भाव पुकारल्यानं संतप्त शेतकरी कार्यकर्त्यांनी हे लिलाव बंद पाडले. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सटाणा इथं लिलाव बंद पाडतानाच येवला आणि चांदवड इथं रास्तारोको आंदोलन केलं तर कळवण इथं नाकोडा उपआवारात प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. चांदवड इथं पोलिसांना वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आंदोलकांवर बळाचा वापर करावा लागला. सिन्नर इथं मात्र लिलाव सुरळीत होऊन कांद्याला जास्तीत जास्त २ हजार २९९ रुपये भाव मिळाला.

****

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना तसंच श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक यशाचा बांगलादेशालाही मोठा आनंद झाला असल्याचं हसिना यांनी म्हटलं असून इस्त्रो आणि त्याच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात पुढच्या वाटचालीसाठी दक्षिण आशियातल्या सर्व देशांसाठी हा गौरव आणि प्रेरणेचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेला भारताच्या या ऐतिहासिक यशाचा गर्व असल्याचं श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुनावर्देना यांनीही या यशाबद्दल भारताचं अभिनंदन केलं आहे.

****

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं तीन दिवस चाललेल्या ब्रिक्स परिषदेची आज सांगता झाली. ब्रिक्स परिषदेचा विस्तार करण्यात येणार असून यात नविन सहा देशांना सदस्यत्व देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग इथं सांगितलं. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे सध्या या परिषदेचे सदस्य आहेत. अर्जेंटीना, मिस्र, इथोपिया, ईरान, सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमीरात हे नविन सदस्य देश असतील. भारतानं ब्रिक्स परिषेदेच्या विस्ताराचं नेहमीच समर्थन केलं असून या देशांच्या सहभागानं ब्रिक्स संघटना बळकट होईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

****

राज्यातल्या इतर मागास प्रवर्गाच्या उद्योजकांकरता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या 'गट कर्ज व्याज परतावा योजने'च्या ऑनलाईन पोर्टलचं उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आलं. राज्यातल्या इतर मागास प्रवर्गातल्या तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढं येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातल्या अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपलं योगदान द्यावं, असं आवाहन सावे यांनी यावेळी केलं. वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात येणार असल्याचं इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष, मंत्री सावे म्हणाले.

****

राज्यातल्या आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी आपलं सहा हजार पानी लेखी उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केलं आहे. या संदर्भात अधिक चर्चा न करता कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई केली जाईल, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडून राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. त्या विरोधात उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करावं, अशी ठाकरे गटाची याचिका होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं. गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना आपलं मत मांडण्यासाठी नोटीस बजावली होती.

****

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. १९५७ सालच्या "आलिया भोगासी" या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी ऐंशी पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. सीमा देव यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठीच्या लढतीमध्ये आज भारताच्या आर प्रज्ञानानंदला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसकडून चुरशीच्या लढतीनंतर परा‍भव स्वीकारावा लागला. अझरबैजानमध्ये बाकू इथं या स्पर्धेत काल प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातला दुसरा सामना अनिर्णित संपला होता. त्यानंतर आज खेळवण्यात आलेल्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला पहिला सामना गमावावा लागला. त्यानं दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधली पण पहिला सामना गमावल्यामुळं त्याचं विश्वविजेतेपद हुकलं.

****

वेळेत निवडणुका न घेतल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघटनेनं निलंबित केलं आहे. त्यामुळं जागतिक स्पर्धांमधे भारतीय कुस्तीपटुंना भारताच्या झेंड्याखाली खेळता येणार नाही. येत्या १६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना तटस्थ खेळाडू म्हणून भाग घ्यावा लागेल. भारतीय ऑलिंपिक संघटनेनं २७ एप्रिलला तदर्थ समिती नेमली होती. या समितीनं ४५ दिवसात निवडणुका घेणं अपेक्षित होतं, मात्र ही कालमर्यादा या समितीला पाळता आली नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूविकास बँकेच्या सर्व थकीत कर्जदार शेतकरी सभासदांचं संपूर्ण कर्ज माफ झालं असून शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरच्या भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करुन घ्यावा असं आवाहन बँकेचे अवसायक सुनील शिरापूरकर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या भूविकास बँकेच्या संपूर्ण दोन हजार ब्याऐंशी कर्जदार शेतकऱ्यांचे ६२ कोटी २८ लाख ९७ रुपये कर्ज माफ झालं आहे. या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूविकास बँकेच्या कर्जाची सातबारा उताऱ्यावरच्या बोजाची नोंद कमी करण्याबाबत सर्व तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

****

जालना इथल्या महावितरणच्या ग्रामीण उपविभाग तीन अंतर्गत कार्यरत सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे. चव्हाण यांची गत महिन्यात महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळात बदली झाली होती. बदली आदेश रद्द होऊन त्यांना पुन्हा जालना ग्रामीण उपविभाग तीनमध्ये पदस्थापना देण्यात आली. बदली रद्द झाल्यामुळं अभियंता चव्हाण यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी डिजे लावून फटाके वाजवत शहरातून मिरवणूक काढली. त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्यामुळं पोलिसांत जमाबंदी आदेशाचं उल्लंघन, तसंच विनापरवाना डिजे वाजविल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

****

'बालविवाह मुक्त नांदेड'साठी तयार आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी अत्यंत आवश्यक असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात नांदेड इथं आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते. या अभियानासाठी सर्व विभागांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी - चॅंपियन्स गावपातळीवर जबाबदारीनं काम करतील आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण बालविवाह मुक्त नांदेड' अशी ओळख निर्माण करू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

****

वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरण वीजजोडण्यांचे अर्ज झटपट निकाली काढत असून प्रलंबित वीज जोडण्या देण्यात औरंगाबाद परिमंडळात वेग आला आहे.

****

No comments: