Wednesday, 23 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतामुळे येत्या काळात जगाच्या प्रगतीला चालना मिळेल आणि भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं ब्रिक्सच्या व्यवसाय मंचाच्या नेत्यांच्या संवाद सत्राला ते संबोधित करत होते. जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता असतानाही भारत जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं त्यांनी नमूद केलं.

****

केंद्रीय रसायनं आणि खतं मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन खतांची उपलब्धता आणि वापर यांचा आढावा घेतला. सध्या देशात १५० लाख मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध असून, हा साठा सध्या सुरू असलेल्या खरीप आणि येत्या रबी हंगामासाठी पुरेसा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी दोन लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा देशांतर्गत बाजारपेठेसाठी उपलब्ध करून दिल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. या अतिरिक्त साखरेच्या पुरवठ्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात देशातले साखरेचे भाव नियंत्रणात राहतील. याआधी केंद्राने ऑगस्ट महिन्यासाठी साडेतेवीस लाख टन साखरेचा साठा उपलब्ध करून दिला होता.

****

जपानमधल्या कोयासन विद्यापीठानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य, या उल्लेखनीय कार्याबद्दल, त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे.

****

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळ इथं सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. या कायद्यान्वये सरकारतर्फे पिडीत व्यक्तीला दिली जाणारी मदतीची प्रलंबित रक्कम तातडीने दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

****

No comments: