Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 August
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ ऑगस्ट २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
चांद्रयान तीनच्या चंद्रावर यशस्वी
अवरतणासह भारतानं घडवला इतिहास, चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर पोहोचणारा
भारत ठरला जगातला पहिलाच देश
·
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल
जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव, पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं
अभिनंदन
·
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सचिन तेंडुलकर
यांची 'राष्ट्रीय सदिच्छा दूत' म्हणून नियुक्ती
·
मराठवाड्यात अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर
सर्व जिल्हा प्रशासनांनी पर्यायी उपाययोजनांचं नियोजन करण्याचे विभागीय आयुक्तांचे
निर्देश
·
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
जीवनसाधना पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना प्रदान
·
नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचा
कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय मागे आणि
·
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत आर
प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात आज होणार अंतिम फेरीतली निर्णायक लढत
सविस्तर
बातम्या
भारताच्या चांद्रयानानं अंतराळ
क्षेत्रात इतिहास घडवत,
चंद्राच्या
दक्षिण ध्रूवावर काल यशस्वी अवतरण केलं. काल सायंकाळी निर्धारित वेळेत बरोबर सहा वाजून
चार मिनिटांनी,
चांद्रयानातलं
विक्रम लँडर चंद्रावर उतरलं. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर पोहोचणारा भारत हा जगातला
पहिलाच देश ठरला आहे. तर अमेरिका,
रशिया आणि
चीन पाठोपाठ चंद्रावर पोहोचलेला भारत हा चौथा देश ठरला आहे. चांद्रयानाच्या यशस्वी
अवरतणाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोचे अध्यक्ष के सोमनाथ यांनी घोषणा केली.
Byte…
We have achieved soft landing on the moon, India is on
the Moon.
भारत मी आपल्या नियोजित स्थळी
पोहोचलो, आणि तुम्ही देखील, असा पहिला संदेश चांद्रयानानं चंद्रावर
उतरताच देशाला उद्देशून पाठवला.
विक्रम लँडरमधल्या प्रज्ञान
रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलं आहे. प्रज्ञाननं चंद्राच्या पृष्ठभागावर
इसरोचं प्रतिक चिन्ह आणि देशाचं राष्ट्रीय प्रतीक अशोक चक्राची खूण सोडून चंद्रावर
छाप उमटवली.
चंद्रावर आगामी १४ दिवस सूर्य
किरणं उपलब्ध असतील. त्या काळात सूर्याच्या उष्णतेपासून ऊर्जा घेऊन लँडर आणि रोव्हर
चंद्रावरचं वातावरण,
उष्णता, रासायनिक गुणधर्म, पृष्ठभागाची स्थिरता, चंद्रावरची जमीन याची माहिती विक्रम
लँडर चंद्रयानाकडे पाठवेल. चंद्रयान ही माहिती इस्रोच्या बंगळुरुमधल्या केंद्राला पाठवेल.
****
चांद्रयानाने यशस्वी अवतरण
करताच, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-
इस्रोच्या नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ विज्ञान
राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी या नियंत्रण कक्षात उपस्थित
होते. जितेंद्र सिंह यांनी या यशाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं.
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल
जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही
इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
चांद्रयान अवतरणाचं थेट प्रसारण पाहिलं, चांद्रयानातलं विक्रम लँडर चंद्रावर उतरताच पंतप्रधानांनी
तिरंगा फडकावून आनंद व्यक्त केला. इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून संवाद साधत पंतप्रधानांनी,
चांद्रयानाच्या
टीमसह इस्रोच्या शास्त्रज्ञांचं या शब्दांत अभिनंदन केलं.
Byte…
मेरे प्यारे परिवार जनों जब हम अपनी आंखो के सामने ऐसा इतिहास बनते हुये देखते
है, तो जीवन धन्य हो जाता है। ऐसी ऐतिहासिक घटनायें राष्ट्रजीवन की चिरंजीव चेतना बन
जाती है। मै तीन चंद्रयान को, इस्रो को, और देश के सभी वैज्ञानिकों को जी जान से बहोत
बहोत बधाई देता हूं।
****
चांद्रयान मोहिमेच्या या यशाबद्दल
सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी
यानाच्या अवतरणाचं थेट प्रसारण पाहिलं,
ही मोहीम
फत्ते झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना पेढे भरवून आनंद साजरा केला. चांद्रयानाचं
यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरलं आहे, या मोहिमेमुळे भारताचं अवकाश संशोधनातलं श्रेष्ठत्व पुन्हा
एकदा सिद्ध झालं आहे,
अशा शब्दांत
मुख्यमंत्र्यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी जपानमध्ये चांद्रयान अवतरणाचं थेट प्रसारण पाहिलं, फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्वांनी
या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या मोहिमेतून चंद्राची अनेक रहस्य उलगडतील, आणि भारत चंद्रावर मानव नक्की पाठवेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त
केला.
‘चांद्रयान-३’ च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला
अभिमान वाटेल,
अशी ही ऐतिहासिक
घटना असल्याचं,
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी म्हटलं आहे. या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही
कायम लक्षात ठेवलं जाईल,
असं ते म्हणाले.
या यानासाठी मुंबईतल्या गोदरेज
एरोस्पेसमध्ये काही भाग तयार करण्यात आले, तर सांगली इथं रॉकेटच्या भागांचं कोटिंग करण्यात आलं. पुण्यात
फ्लेक्स नोझल आणि बुस्टर,
तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात
आले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथली चांदी आणि थर्मल फॅब्रिक वापरण्यात आलं असून, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या दोन
शास्त्रज्ञांनी,
या मोहिमेत
प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.
****
मराठवाड्यातही चांद्रयानाच्या
यशाबद्दल जल्लोष करण्यात आला. औरंगाबाद इथं अनेक शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी
चांद्रयान अवतरणाचं थेट प्रसारण दाखवण्याची विशेष व्यवस्था केली होती.
हिंगोली जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये भारताच्या चांद्रयान
तीन च्या थेट प्रक्षेपणाचा विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे आनंद घेतला. यान चंद्रावर उतरताच
मोठा जल्लोष करण्यात आला. ठिकठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं भारतरत्न
सचिन तेंडुलकर यांची 'राष्ट्रीय सदिच्छा दूत' म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्य
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात
तेंडुलकर यांच्याबरोबर तीन वर्षांसाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं, त्यासाठी आपण सदिच्छा दूत म्हणून देशातल्या युवा शक्तीला
मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू,
असं तेंडुलकर
यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात दूध आणि दुग्धजन्य
पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाने राज्यभर जिल्हा
निहाय कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम
मुंढे यांनी विभागातल्या अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय पथके तयार करुन, दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक
कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं, पोलीस उपनिरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक
पदासाठी घेतलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल काल जाहीर केला. पात्र उमेदवारांची
यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या पात्र ठरलेल्या उमेदावारांपैकी
मुख्य परीक्षेसाठी विहीत कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच
मुख्य परीक्षेकरता प्रवेश दिला जाईल,
असं आयोगानं
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
मराठवाडा विभागात अपुऱ्या पावसाच्या
पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासनांनी आवश्यतेनुसार पर्यायी उपाययोजनांचं नियोजन करण्याचे
निर्देश, विभागीय आयुक्त मधुकर राजे
आर्दड यांनी दिले आहेत. विभागातल्या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी
यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. पीक नुकसानीचे पंचनामे, लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी
प्रशासनानं प्राधान्यानं कामं करावीत,
असंही आर्दड
यांनी या बैठकीत सांगितलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा विभागात
होत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने नियोजन करुन समाजाभिमुख तसंच लोकोपयोगी उपक्रमांचं
आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. येत्या १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद इथं राज्य
मंत्रिमंडळाची बैठक होण्याचं संभाव्य नियोजन आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने
आवश्यक ते प्रस्ताव तयार करुन सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हा प्रशासनांना
दिले आहेत.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार,
ज्येष्ठ
लोककलावंत प्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांना काल प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या
६५ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते, मधू कांबीकर यांचे गुरू पांडुरंग
घोटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मधू कांबीकर या कार्यक्रमाला
उपस्थित राहू शकल्या नाहीत. शाल,
श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. या पुरस्काराच्या उत्तरात केलेल्या भाषणात कांबीकर यांच्या कारकिर्दीचा
आढावा घेताना,
घोटकर यांना
भावना अनावर झाल्या. ते म्हणाले...
Byte…
१९६५ पासून
तासन् तास मी
तिच्याकडून रियाज करून घ्यायचो. ७२-७३
च्या दरम्यान मुंबईला लालबागला गेलो. गाईला
चटका गमावला पटका हे लोकनाट्य केलं. लावण्या
केल्या. अनंत माने
आले त्यांच्यासमोर आम्ही कुठवर पाहू वाट सख्याची ही लावणी सादर केली.
आणि अशी ही मुलगी हरेक जिद्दीने पुढे गेली.
कुलगुरू येवले यांनी विद्यापीठाच्या
वाटचालीचा आढावा घेत,
विविध प्रश्नांवर
मात करुन विद्यापीठाला पुढे नेऊ,
असा विश्वास
व्यक्त केला. विविध परीक्षातील गुणवंत विद्यार्थी तसंच कर्मचारी यांचा यावेळी सत्कार
करण्यात आला.
****
नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी
कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये
कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर
भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत
चर्चा केली. त्यात बाजार समित्या आजपासून सुरू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष
खंडू देवरे यांनी जाहीर केला. नाफेडच्या खरेदीत पारदर्शकता रहावी आणि शेतकऱ्यांना नाफेडची
खरेदी कुठे कुठे सुरू आहे,
याबाबत विस्तृत
माहिती मिळावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
कांदा निर्यातीसाठी लावलेलं
४० टक्के शुल्क रद्द करावं,
आणि उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून तत्काळ
वितरीत करावी,
अशी मागणी, भारतीय किसान संघानं केली आहे. यासंदर्भात
काल जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आलं.
दरम्यान, पावसाचे निकष न ठेवता पिकांच्या परिस्थितीचं
सर्वेक्षण करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी, आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे आहे. तसंच विमा
कंपनीबरोबरच आता राज्य सरकारने देखील एन डी आर एफ च्या निकषानुसार पंचनामे करण्याची
गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर
४० टक्के शुल्क लावल्याच्या निषेधार्थ,
स्वाभिमानी
संघटनेकडून काल हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात गोरेगाव इथं, कांद्याची होळी करण्यात आली. वाढीव
निर्यात शुल्क मागे घ्यावं,
अन्यथा केंद्रीय
वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा, संघटनेकडून देण्यात आला आहे.
****
अझरबैजानमधल्या बाकू इथं सुरु
असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतली निर्णायक लढत आज भारताचा
आर प्रज्ञानंद आणि जगात पहिल्या स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन यांच्यात होणार आहे.
अंतिम फेरीत काल या दोघांमध्ये झालेला दुसरा सामना अवघ्या तासाभरात ३० चालींमध्ये बरोबरीत
सुटला. प्रज्ञानंद आता जागतिक क्रमवारीत बॉबी फिशर आणि कार्लसन यांच्यानंतर उमेदवारांच्या
स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तिसरा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे.
****
भारत आणि आयर्लंड यांच्यातला
तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा टी - ट्वेंटी क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द करण्यात
आला. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकल्यानं भारतानं याआधीच दोन - शून्य अशी विजयी
आघाडी घेतली आहे. कर्णधार जसप्रीत बुमराह मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
****
बदली झाल्याबद्दल विना परवानगी
मिरवणूक काढल्याबद्दल जालना इथं महावितरणच्या सहायक अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. महिनाभरापूर्वीच रत्नागिरी इथं बदली झालेल्या या अभियंत्यांची पुन्हा जालन्यात
बदली झाल्याबद्दल ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे वाहतुकीस खोळंबा झाल्याबद्दल
संबंधित सहायक अभियंत्यासह सुमारे ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणात
होत असलेल्या कथित घुसखोरीच्या विरोधात औरंगाबाद इथं काल बंजारा समाजाच्या वतीनं विभागीय
आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात विशेष तपासणी पथक नेमून चौकशी
करावी, तसंच जातवार जनगणना करावी, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय
आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
बीड इथं काल रानभाजी महोत्सव
घेण्यात आला. या प्रदर्शनात करटोली,
चिवळ, पाथरी, अंबाडी, केना, तरोटा,
हातगा, अंबुशी, मायाळू, कुडा, अशा विविध ३४ प्रकारच्या रानभाज्यांची ओळख करून देण्यात
आली. डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी पौष्टीक तृणधाण्याचं आहारातलं महत्त्व, या बाबत मार्गदर्शन केलं, तर त्रिवेणी भोंडे यांनी रानभाज्यांची
पाककृती सांगून,
त्यातून
मिळणारी जीवनसत्व आणि त्याचे कार्य याबाबत माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं
काल मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत शहरातल्या चारशेहून विद्यार्थी सहभागी
झाले होत. हुतात्मा स्मारक इथं राष्ट्रगीत
गान आणि मतदारांसाठीची शपथ घेवून या फेरीचा समारोप करण्यात आला.
****
परभणी इथं भारतीय स्टेट बँक
आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान -उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने काल जिल्हाधिकारी
कार्यालयात कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. यावेळी ५०४ महिला बचत गटांना १० कोटी रुपये
कर्ज वाटप करण्यात आलं.
****
लातूर शहर महानगरपालिकेमार्फत
डेंग्यू प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना अंतर्गत घरोघरी जाऊन पाणीसाठे तपासले
जात असून, डासअळीनाशक औषध पाण्यात टाकलं
जात आहे. औषध टाकण्याची मोहीम पूर्ण झाल्यावर शहरात धूर फवारणी करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment