आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 November 2023
TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते बनण्याचा मार्ग
मोकळा करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
·
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला अनुसरत वाटचाल
केली - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
·
राज्यात अवकाळी पावसामुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं
नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
आणि
·
जालना, लातूर,
धुळे जिल्ह्यात
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
****
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते
बनण्याचा मार्ग मोकळा करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून
अधिक उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने नियुक्तीपत्रांचं वितरण
करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या उमेदवारांनी नागरिकांसाठी
जीवन सुलभतेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य पूर्ण बांधिलकीने पार पाडलं
पाहिजे, ज्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला
नाही अशा लोकांपर्यंत त्यांनी लाभ पोहोचवले पाहिजे,
असं पंतप्रधानांनी
यावेळी सांगितलं. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते.
****
दरम्यान,
विकसित भारत संकल्प
यात्रेअंतर्गत पंतप्रधानांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी
दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं
स्वरुप दिलं असून, यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या नऊ वर्षात
मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं, ते यावेळी म्हणाले.
महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या
हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या तीन वर्षांत १५ हजार ड्रोन्स तसंच ड्रोन
वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना पुरवण्यात येणार आहे. २५ हजार जनौषधी केंद्र स्थापन
करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झाला.
****
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला
अनुसरत वाटचाल केली असून, देशाच्या एकता आणि अखंडतेला सर्वोच्च प्राधान्य
दिलं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं
आहे. पुण्याजवळच्या खडकवासला इथं, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एन डी ए च्या
१४५ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. यावर्षी संचलनात पहिल्यांदाच
महिला छात्र सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
त्यानंतर राष्ट्रपतींनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या
शनीशिंगणापूर इथल्या शनैश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती
होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा
सत्कार केला.
उद्या,
राष्ट्रपती मुर्मू, पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स
कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे - परशूराम
औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड
कंपनीच्या प्लांटचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. दोन हजार
५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून दोन
हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना
रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,
सिंधुदुर्ग किल्ल्यावर
येत्या चार तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या नौदल दिन कार्यक्रमाच्या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज किल्ल्याची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.
****
राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा
प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ७८३ हेक्टर, हिंगोली ७९ हजार ४०२, परभणी एक हजार, बीड २१५, तर नांदेड जिल्ह्यात ५० हेक्टर क्षेत्रावरच्या
शेतजमिनींचं नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं
आज जालना जिल्ह्यातल्या ढासला, बधापूर,
रेवगाव, बेथलम, पिंपळगाव थोटे इथं उत्साहात स्वागत करण्यात
आलं. यानिमित्त ढासला इथं आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
एलसीडी स्क्रीनवर शासकीय योजनांची चित्रफितही दाखवण्यात आली.
****
लातूर तालुक्यातल्या नागझरी इथं देखील नागरीकांनी
आज विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली.
'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते.
****
धुळे जिल्ह्यातल्या बोराडी आणि निजामपूर
गावात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या कृषी, आरोग्य, शेतकरी,
महिला, युवा यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत
देण्यात आली. तसंच लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान
झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या
राजेवाडी इथल्या कचरुसिंग गुसिंगे आणि हरिदास अंभोरे यांच्या शेतातल्या नुकसानग्रस्त
मोंसबी आणि डाळिंब फळबागेची सावे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. संबंधित
अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले.
****
मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा
दिलेले यवतमाळचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.
त्यांना चार डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासदार हेमंत पाटील
हे लोकसभेतल्या अनेक समित्यांवर सदस्य आहेत. मात्र २९ ऑक्टोबर रोजी त्यांनी राजीनामा
दिल्यामुळे ते एकाही बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आता चार तारखेला हजर राहून मराठा
आरक्षणाबाबत भूमिका मांडू, आपण राजीनाम्यावर ठाम आहोत, राजीनामा मंजूर झाला नाही तर संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित
करणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश
करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धाराशिव इथं धनगर समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला.
शहरातल्या आर्य समाज लेडीज क्लब पासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर
धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपारिक व्यवसायाचं साधन असलेल्या
मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसंच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपारिक पोशाख
घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
****
हिरडा आणि दुधाला रास्त भाव द्या या मागणीसाठी
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज भव्य
मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढवण्याच्या निर्णयाचा
विरोध करण्यात आला. हिरड्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, यासाठी आवश्यक असलेल्या १०६ पेसा गावांचे ठराव आंदोलकांना गेल्या तीन दिवस सुरू
असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त करून देण्यात आले. राहत्या घरांच्या
तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणं २० डिसेंबर पर्यंत तपासण्यात
येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव ते हिंगोली मार्गावरील
रिधोरा पाटीजवळ एस टी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र स्वत:ला सावरत बस
रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना घडली. मारोती
नेमाणे असं या चालकाचं नाव असून, त्यांच्या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे
प्राण वाचले.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य
रेल्वेनं काचीगुडा-लालगढ-काचीगुडा, हैदराबाद-जयपुर- हैदराबाद आणि नांदेड ते
इरोड दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा,
हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावतात. काचीगुडा - लालगड ही
गाडी २७ जानेवारी पर्यंत, लालगढ-काचीगुडा ३० जानेवारी पर्यंत, हैदराबाद - जयपूर गाडी २६ जानेवारी पर्यंत, तर जयपूर - हैद्राबाद आणि नांदेड - इरोड
गाडीला २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान,
लाईन ब्लॉकमुळे
दौंड ते निझामाबाद जलदगती गाडी ३ ते १६ जानेवारी दरम्यान तर निझामाबाद - पंढरपूर गाडी
४ ते १७ जानेवारी दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
Wednesday, 29 November 2023
TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज चार दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात
दाखल
·
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक जानेवारीपासून पाच
वर्षं मुदतवाढ
·
राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाच्या नुकसानाचे एकत्रित
पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
आणि
·
विकसित भारत संकल्प यात्रेला छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात
उत्स्फुर्त प्रतिसाद
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज चार दिवसांच्या
दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाल्या. वायुदलाच्या विशेष विमानानं आज दुपारी त्यांचं लोहगाव
विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट
जनरल अजय कुमार सिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात लोणावळा, पुणे आणि नागपूरमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग
संस्था आणि संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते
होणार आहे. उद्या सकाळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५व्या तुकडीच्या दीक्षांत
संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतील. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेला
७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्तानं विशेष टपाल तिकीटाचं आणि
नाण्याचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
****
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या
तुकडीचा पदवी प्रदान समारंभ आज झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर
सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात एकूण ३५३ कॅडेट्सना
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये बारा परदेशी
कॅडेट्सचा समावेश आहे.
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक
जानेवारी २०२४ पासून पुढे पाच वर्षं मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी
दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी नवी दिल्लीत
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेतून देशभरातल्या एक्क्याऐंशी कोटी गरीबांना
दरमहा पाच किलो धान्य मोफत देण्यात येतं.
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांच्या स्वयं
सहाय्यता गटांना ड्रोन पुरवण्याच्या योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या योजनेअंतर्गत
२०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांमध्ये देशातल्या निवडक पंधरा हजार महिला बचत गटांना ड्रोन्स
पुरवण्यात येणार असून ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीत
फवारणी करण्यासाठी ही ड्रोन्स भाडेतत्वावर देण्यात येतील. ड्रोन उडवणाऱ्या महिलांना
दरमहा पंधरा हजार रुपयांचं मानधन देण्यात येईल, असं ठाकूर यांनी सांगितलं.
विशेष फास्ट ट्रॅक अर्थत जलदगती न्यायालयांना
तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सोळाव्या वित्त आयोगाच्या
उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृष्यप्रणालीच्या
माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान
महिला किसान ड्रोन केंद्राचा ते शुभारंभ करणार आहेत. यातून महिला बचत गटांना येत्या
तीन वर्षात पंधरा हजार ड्रोन्स पुरवली जाणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देवघर इथल्या एम्स मधल्या जनऔषधी केंद्राचं लोकार्पण करतील. हे देशातलं
दहा हजारावं जनऔषधी केंद्र असेल. देशातल्या जनऔषधी केंद्रांची संख्या पंचवीस हजारापर्यंत
वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही पंतप्रधान उद्या शुभारंभ करतील.
****
राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने
झालेल्या नुकसानाचे तातडीनं एकत्रित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
आज ही बैठक झाली. तीन हेक्टरपर्यंत ही नुकसानभरपाई देण्यात येणार असून, यासंदर्भात युद्धपातळीवर काम करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे.
राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान राबवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत
घेण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी चारशे अठ्ठ्याहत्तर शाळांची निवड करण्यात
आली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकांच्या
हस्तांतरण शुल्कात पन्नास टक्के कपात करण्याचा तसंच औद्योगिक आणि कामगार न्यायालयांच्या
न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी
शासन हमी वाढवण्याचा आणि मराठी भवनाची उभारणी गतीनं करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत
घेण्यात आला.
राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३' राबवण्यालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
राज्य विधीमंडळानं हिवाळी अधिवेशन येत्या
सात ते २० डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विधिमंडळाच्या
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन आठवड्यांच्या या अधिवेशनात
प्रत्यक्ष दहा दिवसांचं कामकाज होण्याची शक्यता आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एका
जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता
दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत
न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर,
कन्नड, खुलताबाद, सिल्लोड,
छत्रपती संभाजीनगर
आणि फुलंब्री तालुक्यातल्या विविध गावांत पोहोचली. या गावांमध्ये नागरिकांना शासकीय
योजनांची माहिती देण्यात आली. विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थींनी आपले अनुभव
कथन केले. फुलंब्री तालुक्यातल्या बिल्डा इथल्या आशा पगडे, सोमीनाथ मते यांनी आपल्या अनुभवाबाबत अधिक माहिती दिली.
बाईट - सोमीनाथ
मते आणि आशा पगडे
जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी, खडकवाडी इथं केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं आज स्वागत करण्यात आलं.
यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
चंद्रपूर इथल्या महाऔष्णिक विद्युत केंद्रानं, वीज निर्मितीबाबतच्या आपल्या चौदा वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुन्हा बरोबरी केली
आहे. या केंद्राच्या ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ८नं सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज
निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हा संच यावर्षीच्या दहा मे पासून अखंडपणे
वीज निर्मिती करत आहे.
****
'उडान-पाच' या मोहिमेअंतर्गत पुढच्या वर्षापासून जळगाव
इथून पुणे, गोवा आणि हैदराबाद या तीन मार्गांवर विमान
सेवा सुरू करण्यात येणार आहे. फ्लाय-91 ही खाजगी कंपनी या सेवा सुरू करणार असून, पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जळगाव-पुणे मार्गावर, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव-गोवा मार्गावर आणि मार्चमध्ये जळगाव-हैदराबाद
मार्गावर विमानसेवा सुरू होईल.
****
नांदेड जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत
झालेल्या पावसामुळे तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी
वीस पूर्णांक नव्वद मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा इथं, बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथे आणि लोहा तालुक्यात माळाकोळी इथे अतिवृष्टी
झाली.
आज सकाळीही जिल्ह्यातल्या अनेक भागात हलक्या
ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर
शहर परिसरात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 29.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा, पुणे आणि नागपूरमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्था आणि संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचा अंतर्भाव करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी कैवल्यधाम इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतील. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्तानं विशेष टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीने ५१ हजार नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे होणार आहेत.
****
राज्य विधीमंडळानं हिवाळी अधिवेशन येत्या सात ते २० डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातल्या महत्वाच्या शहरांमध्ये गुलाबी रिक्षा ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. काल मंत्रालयात या विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. प्रायोगिक तत्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला विद्यार्थी आणि महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रातले विद्यार्थी तसंच खरपुडी गावातल्या महिलांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेऊन, केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. या संकल्प यात्रेत स्थानिक तेजस गॅस एजन्सी यांनी लावलेल्या स्टॉलला महिलांनी भेट देत गॅस जोडणी मिळवण्यासाठीची माहिती घेतली. त्यापूर्वी जालना पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तसंच पंतप्रधान योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या योजनांबद्दल समाधान व्यक्त करत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
****
वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी देशभरात राबवण्यात येत असलेल्या आर डी एस एस योजना धाराशिव जिल्ह्यात वीज सेवा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं एम एस ई बी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. धाराशिव इथं काल महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. वीज सेवा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या, नवीन उपकेंद्रं उभारणं, वीज जाळे मजबूत करणं, नवे अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणं अशा सूचना महत्त्वाच्या आहेत, ही कामं आगामी अठरा महिन्यात पूर्ण होतील, असं पाठक यांनी सांगितलं.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य सतरा मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातले शासकीय कर्मचारी येत्या चौदा डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या मागण्यांसाठी या वर्षीच्या मार्च महिन्यात केलेल्या आंदोलनाला शासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे दुस-या टप्प्यातलं हे आंदोलन होणार असल्याची माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या बीड शाखेचे सरचिटणीस रामचंद्र ठोसर यांनी दिली.
****
लातूर शहरासह निलंगा, रेणापूर, औसा, अहमदपूर, उदगीर, चाकूर तालुक्यातल्या अनेक गावात काल रात्री मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. लातूर तालुक्यातल्या गाधवड इथं विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. अवकाळीने रब्बी पिकांचं नुकसान झालं नसलं, तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
****
उत्तर मध्य रेल्वेने काळवल्यानुसार लाईन ब्लॉक मुळे जालना-छपरा-जालना विशेष रेल्वे काही दिवस रद्द करण्यात आली आहे. जालना ते छपरा गाडी येत्या तीन जानेवारी पर्यंत, तर छपरा ते जालना गाडी पाच जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...