Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
आरक्षणासह राज्यातले विविध प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते कार्तिकवारीनिमित्त पंढरपूर, सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यावर कोणी शंका घेण्याचं कारण नाही. मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला भर राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विविध समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या सुरू आहे. मराठा, धनगर समाजाची आंदोलनं मोर्चे मेळावे सुरू आहेत. न्याय मागण्या मांडणं योग्य आहे, मात्र समाजा समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करणं किंवा एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा ठाकणं हे अयोग्य असल्याचं फडणवीस म्हणाले. आंदोलकांनी आपल्या पुजेला दर्शवलेला विरोध सोडून पूजा करण्यासाठी परवानगी दिली याबद्दल त्यांनी आभार मानलं. राज्यातली शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये यांची काळजी सर्वांनीच घ्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण- म्हाडाच्या विभागीय मंडळांनी रिक्त सदनिका विक्रीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. या निर्णयामुळं गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रिअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे. या माध्यमातून म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होईल तसंच उपलब्ध होणाऱ्या निधीमुळं म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना अधिक गती मिळणार असल्याचं जयस्वाल यांनी म्हटलं आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीनं सुचवलेल्या शिफारशींनुसार एक धोरण निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये पाच पर्यायांचा समावेश आहे. म्हाडानं घेतलेल्या आढाव्यानुसार प्राधिकरणातल्या विविध विभागीय मंडळांतल्या ११,१८४ सदनिकांची विक्री झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीचं बचाव कार्य हे अंतिम टप्प्यात आलं आहे. कामगारांपर्यंत पोहचण्यासाठी आता केवळ दहा मीटर खोदकाम बाकी आहे. या बोगद्यात १२ नोव्हेंबर पासून ४१ कामगार अडकलेले असून या कामगारांना आज सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे.
****
परभणी जिल्ह्यात उद्या विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. या यात्रेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात आंबेजवळगा इथं आज जनजागृती करण्यात आली. तसंच आंबेजवळगा या गावाला स्वच्छता अभियान अंतर्गत विशेष प्रमाणपत्र देऊन आदर्श गाव म्हणून सन्मानित करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला आज जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी प्रारंभ केला. या उपक्रमात जिल्ह्यातल्या १५ तालुक्यातल्या ८२५ ग्रामपंचातीमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात आज तसंच गडचिरोली जिल्ह्यातही या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ गावांमध्ये देण्यात येत आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या दहा शेतकरी कार्यकर्त्यांनी कर्जफेड करण्यासाठी अवयव विक्रीच्या आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यांनी या संदर्भातलं निवेदन तहसीलदारांना दिलं आहे. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळाला नाही तसंच पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली ऩसल्यानं निषेध नोंदवण्यासाठी हे निवेदन दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. यात पाच सामने खेळवले जाणार असून पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं संध्याकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. ऋतूराज गायकवाड पहिल्या तीन सामन्यांसाठी उपकर्णधार असेल.
****
मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी तर उद्यापासून तीन दिवस मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment