Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· राज्यात आजही अनेक भागात अवकाळी पाऊस, हिंगोलीत वीज पडून एकाचा मृत्यू
· नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
· चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये आरोग्यासंदर्भात
तयारीचा आढावा घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
आणि
· जालना इथं विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात
****
राज्यात आजही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु
आहे. मुंबई शहर,
उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, नांदेड, छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
****
नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू झालेल्या
जोरदार पावसामुळे नांदेड,
अर्धापूर, कंधार, लोहा आणि हदगाव या पाच
तालुक्यांमधल्या बारा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यात सर्वाधिक म्हणजे
नव्व्याण्णव मिलीमीटर पाऊस लिंबगाव मंडळात झाला असून, तरोडा
ब्याऐंशी पूर्णांक तीस,
अर्धापूर सत्त्याहत्तर पूर्णांक पन्नास आणि नांदेड शहर मंडळात
अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात सरासरी ३६ पूर्णांक ५० मिलीमीटर
पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे वातावरणातला गारठा कमालीचा वाढला असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मुदखेड, किनवट
आणि नांदेड तालुक्यात एकूण चार जनावरं दगावल्याचं आणि एका घराची अंशत: पडझड झाली असल्याचं
प्रशासनानं कळवलं आहे.
परभणीत पूर्णा नदीला पूर आला असून, शेतात
पाणी साचलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक भागात
ओढ्यांना, नदीला पूर आला आहे. सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा
या सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारी, तुर, हरभरा, गहू
या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्याने
राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
जालना शहरासह जिल्ह्यात काल रात्री झालेल्या
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामतल्या शेतीपिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं. भोकरदन
आणि घनसावंगी तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्वारी आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचं
नुकसान झालं. बदनापूर तालुक्यात वीज कोसळून ५० शेळ्या-मेंढ्या दगावल्या, तर
जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये सात मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यातल्या धुळयासह शिरपूर, शिंदखेडा
आणि साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
वाशीम जिल्ह्यातही काल मध्यरात्रीपासून आज
सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे सुमारे ४६२ हेक्टर क्षेत्रावरच्या कपाशी पिकाचं नुकसान
झालं असून एका व्यक्तीचा आणि एक्क्याण्णव पशुंचा मृत्यू झाल्याचं जिल्हा प्रशासनानं
कळवलं आहे.
****
पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आज ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले -
गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला
आहे, त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये
गारपिट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे,
अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत
देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना,
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची
पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज नागपूर इथं बोलताना त्यांनी, कुठल्याही
परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याचीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं
आश्वासन दिलं.
****
राज्यात पुढच्या दोन दिवसांसाठी मराठवाड्यातल्या
जालना, बीड, परभणी,
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपिटीचा
'येलो अलर्ट'
देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात
जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा यलो ॲलर्ट हवामान विभागानं दिला आहे. राज्यातलं ढगाळ
हवामान येत्या तीस तारखेनंतर निवळणार असून, त्यानंतर थंडीमध्ये वाढ होण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे
निफाड तालुक्यातल्या कसबे सुकेणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन द्राक्षबागांचं
मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी
कसबे सुकेणे इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश
जिल्हा प्रशासनाला दिले.
****
चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात
तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या उत्तर भागात लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेसंबंधित
आजार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशातल्या स्थितीवर बारकाईनं
लक्ष ठेवून आहे आणि सध्यातरी भारतात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असं
मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून सगळ्या राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांनी कोविड प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारित नियमांची आणि मार्गदर्शक
तत्त्वांची अंमलबजावणी करावी आणि इन्फ्लूएंझासदृष आजार असलेल्या रुग्णांचं बारकाईनं
निरीक्षण करावं,
अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
****
जालना इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेला
सुरुवात झाली. जिल्हा परिषद कार्यालयापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी
संकल्प रथास हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २५ वर्षांमध्ये
भारताला विकसनशील देशांच्या यादीतून विकसित देशांच्या यादीत नेण्याचा संकल्प केला आहे.
त्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचं दानवे यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारनं २०१४ पासून राबवलेल्या विविध लोकोपयोगी योजना गावगावात पोहचवण्याचं
काम या संकल्प यात्रेच्या माध्यमातून होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या विकसित भारत
संकल्प यात्रेची सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या
उपस्थितीत होणार आहे.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या उपोषणस्थळी
भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला उद्धव
बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा असून येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्येही आपण याबाबत प्रश्न
मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली.
****
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं
समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त पैठण इथं सुरू
असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची आज सांगता झाली. एकनाथ
महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सांगतेचं काल्याचं कीर्तन केलं.
त्यापूर्वी या सोहळ्यात आज सकाळी गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. एकनाथी
भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधल्या एकनाथ मंदिरामध्येही
भागवत जयंतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस
तालुक्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे पाठवलेला निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव
मदत करण्यात येईल,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज बारामतीमध्ये
पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय, दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये
राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाहीही पवार यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या जालना-छपरा-जालना
विशेष साप्ताहिक गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. जालना ते छपरा या गाडीला २९ नोव्हेंबर
ते तीन जानेवारी २०२४ पर्यंत, तर छपरा ते जालना गाडीला एक डिसेंबर ते ०५
जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं
आहे.
****
रेल्वेच्या सिकंदराबाद आणि नांदेड विभागात
सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामांमुळे येत्या दोन आणि तीन डिसेंबरपर्यंत
काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरा
धावणार आहेत. यात दौंड निझामाबाद गाडी मुदखेड ते निझामाबाद दरम्यान, निझामाबाद
पंढरपूर गाडी निझामाबाद ते मुदखेड दरम्यान आणि धर्माबाद मनमाड गाडी धर्माबाद ते नांदेड
दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment