Tuesday, 28 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 28.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं. सिद्धार्थ उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत, आणि देवशाली जिने, नजरिन सय्यद रफी, फिरोज खान इब्राहिम खान, सइनाज शेख जावेद या लाभार्थ्यांच्या हस्ते या यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. गरीब आणि वंचितांपर्यंत राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना पोहचवणं, ही आमची जवाबदारी असल्याचं, जी श्रीकांत यावेळी म्हणाले. २२ डिसेंबरपर्यंत ही यात्रा महानगरपालिकेच्या दहा झोन मधल्या ४७ ठिकाणी जाऊस केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणार आहे.

****

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषी, मदत आणि पुनर्वसन तसंच महसूल विभागाच्या वतीने वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचं काम सुरू असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शासनाची भूमिका असल्याचं, त्यांनी आज ट्विट संदेशात सांगितलं. राज्यातल्या सुमारे १६ ते १७ जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचं वृत्त आहे.

****


दरम्यान, राज्यात अनेक भागात आजही अवकाळी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही सर्वत्र पावसाळी वातावरण असून, धुक्याची दाट चादर पसरली होती. पहाटे कनेरगाव नाका भागात जोरदार पाऊस झाला. तर इतरत्र रिमझिम पाऊस झाला. वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

धाराशिव इथं आज पहाटे वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

अकोल्यात आज सकाळी दमदार पाऊस झाला, तर नागपूर इथंही सकाळी पाऊस झाला. रब्बी पीकांना या पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये देखील आज धुक्याची चादर पसरली होती. 

वाशिम जिल्ह्यात आज पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं.

सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यातल्या पडसाळी परिसरात आज पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यात रात्रभर जोरदार सरी बरसल्या. यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलं आहे. अवकाळी पावसात तब्बल १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाऊस आणि गारांमुळे ऊस, केळी, पपई या बागायती पिकांसह मका आणि तूर या पिकांना फटका बसला आहे. बुलढाणा जिल्यात रात्रभर पाऊस सुरू होता. खामगाव शहरात काल रात्री ५५ मिलीमीटर पाव साची नोंद झाली.

****

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. सर्व मोठ्या पक्षांचे नेते आज राज्यभरात प्रचार सभा घेत आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २६ हजार नागरीकांनी मतपत्रांच्या माध्यमातून घरुन मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे.

****

गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. समारोपाच्या सत्रात चित्रपटांसाठीच्या सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे, तसंच हॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते मायकेल डग्लस यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. समारोप सत्रात रॉबर्ट कोलोडनी दिग्दर्शित अमेरिकी सिमेना फेदरवेट दाखवण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सवात यावर्षी पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार देण्यात येणार आहे.   

****

राज्यात पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या इयत्तेपासून कृषि हा विषय शिकवला जाईल, अशी माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार इथं, केसरकर तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, काल शासकीय महापूजा झाली, त्यावेळी ते बोलत होते. बळीराजाचं संकट दूर होवो असं साकडं महापूजेवेळी घातल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

येत्या २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर इथं राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतून ऑलिम्पिक गाजवणारा स्पर्धक निर्माण करण्याचा आपला मानस आहे, असं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक स्पर्धक, प्रशिक्षक, आणि पालकांना मोफत ताडोबा पर्यटन दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments: