Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात
· लातूर,
हिंगोली जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात
· आरक्षणावरुन सुरू रणधुमाळी थांबवा- काँग्रेस पक्षाची सरकारकडे मागणी
आणि
· साईबाबा संस्थानला दिवाळी सुटीत साडे सतरा कोटी रुपयांहून अधिक देणगी प्राप्त
****
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्क्याराच्या
बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आली असल्याचं सरकारतर्फे
स्पष्ट करण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचं मनोबल वाढवण्यात येत आहे. त्यांची
दिनचर्या सुरळित सुरू आहे,
असं बचाव कार्यातल्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव कार्याची माहिती घेत आहेत. सरकारच्या सर्व यंत्रणा, विविध
राज्य सरकार बचाव कार्यात सहभागी आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे
देण्यात आलेल्या माहितीनुसार आवश्यक यंत्र सामुग्री प्राप्त व्हावी यासाठी विशेष व्यवस्था
करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास
प्राधिकरण म्हाडाची भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएसवर आधारित मालमत्ता आणि यादी व्यवस्थापन
प्रणाली नवीन वर्षापासून कार्यान्वित करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी
अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. म्हाडा मुख्यालयात संगणकीय विभागाच्या बैठकीत
त्यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणाच्या भविष्यातल्या गृहनिर्मिती आणि भूखंड हे व्यवस्थापन
क्षेत्रांमध्ये वरदान ठरणार आहेत. संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या
जमिनींची सद्यस्थिती,
जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेलं अतिक्रमण, आरक्षणनिहाय
रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचं जयस्वाल
यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या विकसित
भारत संकल्प यात्रेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मार्गस्त केलं. ही यात्रा
२६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात फिरणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत
नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेणं हा या यात्रेचा मुळ उद्देश
आहे. हिंगोली जिल्ह्यातही आजपासून यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी
योग्य नियोजन करुन या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित घटकापर्यंत याचा लाभ पोहोचवावा, अशा
सूचना केंद्रीय आरोग्य विभागाचे अव्वर सचिव कौस्तुभ गिरी तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी हिंगोली इथं दिल्या. नंदूरबार जिल्ह्यातल्या अभियानाची केंद्रीय मंत्री
नारायण राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींना माहिती दिली. ते म्हणाले -
घरकुल योजना असेल किंवा अन्नपूर्णा
योजना असेल, उज्ज्वला योजना, अशा ५४ योजनांमध्ये ज लाभार्थी आहेत, लाभ मिळालेल्या योजना
कशा राबवल्या जातात यासंबंधी चर्चा केली. समाधानकारक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम
या जिल्ह्याचे अधिकारी करतायत. त्यानंतर लोकांमध्ये आलो. काही लाभार्थी बोलले. एकंदरीत
ज्या योजना आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या अभियानाचा
औपचारिक प्रारंभ येत्या २८ तारखेला गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथं होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज एका
पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या अभियानात आठ रथ असतील, असं
त्यांनी सांगितलं. डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे रथ आज ग्रामीण भागासाठी
मार्गस्थ करण्यात आले.
****
दुधाला ३४ रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या
दूध दर समितीनं शासन आदेश काढला असून हा शासन आदेश राज्यातल्या दूध संघ आणि दूध कंपन्यांनी फेटाळला आहे. राज्यात आज २१ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर
शासनाच्या या संदर्भातल्या आदेशाची होळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी
या संदर्भात आंदोलनाद्वारे या आदेशाची होळी करण्यात आली.
****
राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली रणधुमाळी
सरकारनं थांबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली
आहे. त्यांनी आज नागपूर इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मराठा- इतर मागास
प्रवर्ग वाद सरकार प्रायोजित असल्याचा आरोप केला. या संदर्भात छगन भुजबळ यांच्या मागं
भारतीय जनता पक्षाची शक्ती असल्याचं ते म्हणाले. राज्यात महागाई, शेतकऱ्याचे
प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. शेतकऱ्यांना काय मदत देणार ते सरकारनं सांगावं, अशी
मागणीही त्यांनी यावेळी केली. राजस्थान, छत्तिसगडला ४५० रुपयांना गॅस
मिळतो मग महाराष्ट्रात येवढा महाग का, अशी विचारना त्यांनी केली. आरक्षणावर
काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर
समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, याचा
त्यांनी पुनरुच्चार केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री
साईबाबा संस्थानला दिवाळीच्या सुटीमध्ये १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या
कालावधीत १७ कोटी ५० लाख ५६ हजारांहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. संस्थानचे मुख्य
कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली.
हा निधी रोख,
धनादेश तसंच सोने, चांदीच्या स्वरुपात असल्याचं
शिवा यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं हाच पर्याय
असल्याचं मत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या हस्ते
आज नागपुरमध्ये `अॅग्रोव्हिजन`
प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी
देवव्रत बोलत होते. मुळात जमिनीची उगवण क्षमता लक्षात घेता निरनिराळ्या प्रयोगांचा
विचार होणं अपेक्षित होतं. पण, अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नांत मागच्या
काळात झालेल्या प्रयोगांनी नापिकी अधिक आली, असं त्यांनी सांगितलं. रासायनिक
शेतीमुळं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्राची संरचना बदलावी
लागेल असंही राज्यपाल देवव्रत यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं
तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारं पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला
बदनाम करण्याचा डाव असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पाणी
न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जलसंपदा विभागाला लिहिलेलं
पत्र समाजमाध्यमांवर सादर करताना त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. हे पत्र
कोणत्या कारणांमुळं लिहिलं गेलं, याचा राज्य सरकारनं तातडीनं खुलासा करावा.
राज्य सरकारनं राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विनाविलंब सोडावं, अशी
मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्यानं
सहा हजार ६७० घरकुलांना मंजुरी देऊन शंभर टक्के उद्दिष्ट्य
पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणा अध्यक्ष वर्षा मीना यांचा मुंबईत राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांना
गौरवण्यात आलं.
****
भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि
चिराग शेट्टी यांच्या जोडीनं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या
उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशीयाच्या
लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनीयल मार्टीन यांच्या जोडीवर २-० असा सहज विजय नोंदवला. पुरुष
एकेरीत उपउपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात भारताचा प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि
जपानच्या कोडाई नराओका दरम्यानचा सामना होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या परभणी-वसमत मार्गावर
खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीत दुकानांतलं सोयाबीन, कापूस
यासह इतर अन्नधान्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या पथकानं ही आग आटोक्यात आणली. पहाटे
चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये शेतमालासह नजिकच्या एका हॉटेलमधलं सामान
जळून खाक झालं.
****
गडचिरोली जिल्हा भयमुक्त होत असून, लॉयड
मेटल्सबरोबरच जिंदाल आणि अंबुजा हे प्रमुख उद्योग देखील इथं मोठी गुंतवणूक करणार असल्याचं
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा जिल्हा लवकरच राज्यात
अव्वल स्थानी दिसेल,
असा विश्वास त्यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत व्यक्त
केला. त्यांनी आज उद्योग विभागाशी संबंधित एक आढावा बैठकही घेतली.
****
यवतमाळमध्ये महावितरणच्या अभियंत्यांना मारहाणीच्या
घटनेनं संतप्त झालेल्या अभियंत्यांनी पुसद आणि यवतमाळ कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात
काळ्या फिती लाऊन ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार भावना गवळी यांनी आंदोलक अभियंत्यांशी
चर्चा केली. मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी विभागीय कार्यालयानं पोलिसांशी पत्रव्यवहार
केला नसल्याचा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला असून कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्यानं
कामबंद आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment